मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ करून आघाडी सरकारने कर्मचार्यांना गुढीपाडव्याची भेट दिली. राज्यातील महागाई भत्ता 28 टक्क्यांवरून 31 टक्के झाला आहे. विशेष म्हणजे बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळानेही आपल्या कर्मचार्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला. याचा अर्थ नजीकच्या काळात हा वाढीव तीन टक्के भत्ताही राज्य सरकारच्या कर्मचार्यांना मिळू शकतो.
राज्याच्या वित्त विभागाने बुधवारी महागाई भत्ता वाढीचा शासन निर्णय जारी केला. सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन रचनेत 1 जुलैपासून पूर्वलक्षी प्रभावाने तो लागू होईल. 1 जुलै 2021पासून थकबाकीसह मार्च 2022च्या वेतनासोबत हा भत्ता रोखीने देण्यात येईल, असे वित्त विभागाने म्हटले आहे.
केंद्राचीही 3 टक्के वाढ
महाराष्ट्रातील महागाई भत्ता आता 31 टक्के झाला असताना केंद्राने केलेल्या तीन टक्के वाढीमुळे केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता 31 वरून 34 टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्राप्रमाणे आणखी तीन टक्के महागाई भत्ता मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील कर्मचारी केंद्राच्या बरोबरीत येवू शकतील. नियमानुसार केंद्रीय कर्मचार्यांचा डीए, डीआर हा वर्षातून दोनदा वाढवला जातो. जानेवारी आणि जुलै महिन्यात हा दर वाढवला जातो. ही वाढ कर्मचार्यांना अपेक्षित होती.
आता डीए, डीआरमध्ये वाढ होणार असल्याने 50 लाख कर्मचारी, 65 लाख निवृत्ती वेतनधारकांना केंद्राकडून दिलासा मिळाला आहे. महागाई भत्ता हा कर्मचार्यांच्या शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील कार्यस्थळावर अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या पदानुसार आणि कामाच्या ठिकाणानुसार तो कमी-जास्त असू शकतो. केंद्राच्या या निर्णयाचा फायदा 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे.