Latest

राजर्षी शाहू महाराज कार्याचा वसा आणि वारसा

Arun Patil

राजर्षी शाहू महाराजांनी जे महान ऐतिहासिक कार्य केले; त्याची नोंद अर्वाचीन काळातील महाराष्ट्राचा, एवढेच नव्हे, तर भारताचा इतिहास लिहिणार्‍यांना करावीच लागेल. येत्या 6 मेपासून राजर्षी शाहू स्मृती शताब्दीस प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने राजर्षी शाहू यांच्याविषयी, तसेच जन्मशताब्दी ते स्मृती शताब्दीदरम्यान झालेल्या विविधांगी कार्याचा आढावा.

महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मोगलांच्या जुलमी राजवटीपासून मुक्ती प्राप्त करून देणारे पहिले छत्रपती म्हणून शिवाजी महाराज यांचा गौरव केला जातो. त्यांच्या मृत्यूनंतर काही कालखंड गेल्यावर महाराष्ट्रातील बहुजनांच्या वाट्याला उच्चवर्णीयांची धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरी आली. त्या गुलामगिरीतून शूद्रातिशूद्रांची मुक्तता करण्यासाठी प्रस्थापितांच्या विरोधात सामाजिक क्रांतीची पताका महात्मा जोतीराव फुले यांनी प्रथम फडकवली. तीच पताका स्वत:च्या खांद्यावर घेऊन महाराष्ट्रातील बहुजनांची उच्चवर्णीयांच्या सर्वंकष गुलामगिरीतून मुक्ती करणारे दुसरे छत्रपती म्हणून कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपतींचा गौरव केला जातो.

यशवंतराव उर्फ शाहू छत्रपती यांचा जन्म कोल्हापूर येथे 26 जून 1874 रोजी झाला. बडोद्याचे सरदार गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई नावाच्या अकरा वर्षांच्या कन्येशी 1 एप्रिल 1891 रोजी शाहूराजांचा वयाच्या सतराव्या वर्षी विवाह झाला. 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या गादीचे अधिकार आपल्या हाती घेतले आणि शाहूराजे खर्‍या अर्थाने त्या दिवशी कोल्हापूरचे छत्रपती झाले. 3 एप्रिल 1894 रोजी शाहू छत्रपतींनी आपल्या रयतेस लोककल्याणाची पूर्ण हमी देणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

मध्यंतरी पेशवाईत नाना फडणीस यांनी बंद केलेला 'राज्याभिषेक शक' त्याचवेळी त्यांनी पुन्हा सुरू करून लोकनेते शिवछत्रपतींची स्मृती सदैव जागृत राहील, याची व्यवस्था केली. 1896-97 च्या या महाभयंकर दुष्काळात संपूर्ण देशात 10 लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. परंतु कोल्हापूर संस्थानात मात्र एकही भूकबळी पडलेला नव्हता. शाहू छत्रपतींनी सर्वस्व पणाला लावून महादुष्काळाशी दिलेल्या लढतीचे ते अपूर्व यश होते! त्यानंतर लगेच प्लेगची साथ रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय योजण्यात आले.

शाहू छत्रपतींच्या जीवनातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात आमूलाग्र क्रांती घडवून आणणारे एक वादळी प्रकरण म्हणून 'वेदोक्त प्रकरणा'चा विचार करावा लागतो. इसवी सन 1900 ते 1922 या कालखंडात शाहू छत्रपतींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात घडून आलेल्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीचे उगमस्थान म्हणून वेदोक्त प्रकरणाकडे लक्ष द्यावे लागते. शाहू छत्रपतींनी आपल्या संस्थानातील नोकर्‍यांमध्ये मागासलेल्या जाती जमातीच्या लोकांसाठी 50% जागा राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय दि. 26 जुलै 1902 रोजी घेतला.

लोकांच्या खासगी आणि सार्वजनिक जीवनातील अस्पृश्यतेचे पूर्ण उच्चाटन व्हावे म्हणून शाहू छत्रपतींनी समाजातील अस्पृश्य लोकांचा दर्जा वाढविण्याच्या द़ृष्टिकोनातून विविध प्रकारचे प्रयत्न केले. सरकारी कचेर्‍या, दवाखाने, शाळा, सरकारच्या मदतीवर चालणार्‍या खासगी शाळा, पाणवठे या सर्व ठिकाणी अस्पृशांना मुक्त प्रवेश राहील; त्याचप्रमाणे कचेर्‍यांतून असणार्‍या अस्पृश्य नोकरांना सवर्ण अधिकारी किंवा इतर अधिकारी यांनी अस्पृश्य म्हणून अपमानकारक वागणूक दिल्यास, त्यांना राजीनामा द्यावा लागेल.

सरकारी किंवा सरकारी मदतीवर चालणार्‍या शाळांमधून अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मानहानीकारक वागणूक दिल्यास, त्यांना नोकरी सोडावी लागेल. तर एखाद्या डॉक्टरने अस्पृश्य रोग्याला तपासण्यासाठी स्पर्श करण्यास नकार दिल्यास, त्याला आपल्या नोकरीचा त्याग करावा लागेल. अशा महत्त्वाच्या तरतुदी त्यांनी आपल्या संस्थानात चार वटहुकूम काढून केल्या. न्यायदान व्यवस्थेतही अस्पृश्यांना दर्जा प्राप्त व्हावा यासाठी शाहू छत्रपतींनी काही अस्पृश्य व्यक्ती अल्पशिक्षित असतानादेखील जाणीवपूर्वक त्यांना वकिलीच्या सनदा दिल्या.

बहुजन समाजाची अमर्याद आर्थिक आणि राजकीय पिळवणूक करणारे कुलकर्णी वतन 2 मार्च 1918 रोजी शाहू छत्रपतींनी एक वटहुकूम काढून रद्द केले आणि त्या जागी तलाठी पद्धत स्वीकारून त्यामध्ये ब्राह्मणेतरांना नोकर्‍यांची संधी उपलब्ध करून दिली. परंतु त्यासंबंधी सरकारी नोकरी सर्वांस मोकळी असावी, अस्पृश्य नोकर कर्तबगार असेल तर त्यास बढती द्यावी आणि अस्पृश्यांना तलाठ्याच्या पदावर प्रथम पसंती; पण पुढे अधिकार्‍यांच्या इतर पदांवर त्यांच्या कर्तबगारीने बढती, असे तीन आदेश काढून वर्णव्यवस्थेवर आणखी एक जोराचा आघात त्यांनी केला.

परंतु त्याचवेळी व्यक्तीच्या कर्तृृत्वाच्या आड पारंपरिक जातिसंस्था येणार नाही याची दक्षता शाहू छत्रपतींनी घेतली, तर पिढ्यान्पिढ्या वरिष्ठ जातींच्या गुलामगिरीत अडकवून ठेवणारी महार वतनाची अमानुष पद्धत त्यांनी 18 सप्टेंबर 1918 रोजी कायद्याने पूर्णपणे बंद केली.

मांगगारुडी यांच्यासारख्या गुन्हेगार जातीना दररोज रात्री कोणत्याही परिस्थितीत चावडीवर जाऊन जी हजेरी द्यावी लागत होती, ती क्रूर पद्धत 31 ऑगस्ट 1918 रोजी एक राजाज्ञा काढून बंद केली. इतकेच नव्हे, तर कोल्हापूरच्या भरवस्तीत गंगाराम कांबळे या महार समाजातील गृहस्थास हॉटेल काढून देऊन, त्या हॉटेलात आपल्याबरोबर तथाकथित उच्चकुलीन खानदानी मराठा सरदारांना घेऊन जाऊन स्वत:सह सर्वांना चहापान करण्यास भाग पाडणारा एक आगळा प्रयोग शाहू छत्रपतींनी राबविला.

1901 ते 1922 या बावीस वर्षांच्या कालखंडात शाहू छत्रपतींनी आपल्या संस्थानात भिन्नभिन्न जातींची तेवीस वसतिगृहे स्थापून, त्या त्या जातींच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोलाची मदत केली. आपल्या जातीचे नेतृत्व दुसर्‍या जातीच्या पुढार्‍यांच्या हाती जाणार नाही याची दक्षता सुरुवातीस काही काळ प्रत्येक जातीने घेतली पाहिजे, हा शाहू छत्रपतींचा आग्रह होता. म्हणूनच त्यांनी माणगाव येथे भरलेल्या दलितांच्या परिषदेस आपणहून हजर राहून दलितांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा गौरव केला. तर उच्च शिक्षणासाठी आंबेडकर परदेशात असताना शाहू छत्रपतींनी त्यांना आर्थिक मदत केली.

इतकेच नव्हे, तर आंबेडकरांच्या 'मूकनायक' या नियतकालिकाला शाहू छत्रपतींची 2500 रुपयांची देणगी मिळताच, ते खर्‍या अर्थाने बोलू लागले. जातिसंस्था नष्ट करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आंतरजातीय विवाह घडवून आणणे हा आहे, हे त्यांचे ठाम मत होते. त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाचा कायदा केला. या प्रयोगाची सुरुवात म्हणून सुमारे 25 हजार रुपये खर्च करून शाहू छत्रपतींनी धनगर आणि मराठे यांचे पंचवीस आंतरजातीय विवाह घडवून आणले. इतकेच नव्हे, तर आपल्या चुलत बहिणीचा, म्हणजेच काकासाहेब घाटगेे (ज्युनिअर चीफ ऑफ कागल) यांच्या कन्येचा इंदूरच्या होळकर महाराजांच्या मुलाशी विवाह घडवून आणला.

"शिक्षणच आमचा तरणोपाय आहे, असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो." हा शाहू छत्रपतींनी शिक्षणाबाबत मांडलेला विचार त्यांच्या शैक्षणिक धोरणावर प्रकाश टाकतो. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याची घोषणा करून तसे प्रयत्न केले होते. 30 सप्टेंबर 1917 रोजी कोल्हापूर संस्थानात मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. हरित क्रांतीची बीजे प्रथम शाहू छत्रपतींनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये 1908-09 लाच रोवली होती.

कोल्हापूर संस्थानामध्ये दर तीन वर्षांनी पडणार्‍या दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊनच, शाहू छत्रपतींना राधानगरी धरणाची संकल्पना सुचली असावी, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. शेतीसंबंधी चहा-कॉफीसारखी पैशाची पिके घेण्याचा अभिनव प्रयोग शाहू छत्रपतींनी पन्हाळा आणि भुदरगड भागात राबविलेला दिसून येतो. शाहू छत्रपतींनी आपल्या संस्थानातील शेतीला कायमचा पाणीपुरवठा व्हावा म्हणून पाणी पुरवठ्याच्या लहान-मोठ्या योजना कार्यवाहीत केल्या होत्या.

शाहू छत्रपतींनी विवाह, घटस्फोट स्त्रियांच्यावर होणारे शारीरिक अत्याचार, अनौरस संततीला मालमत्तेत हक्क इत्यादी बाबतीत स्त्रियांना स्वातंत्र्य देणारे आणि समानतेचे हक्क देणारे अनेक कायदे करून ते कोल्हापूर संस्थानामध्ये अंमलात आणले होते. कोल्हापूर संस्थानात स्त्री शिक्षणासाठी एक खास अधिकारपद निर्माण करण्यात आले होतेे. त्या पदावर फेमिल ट्रेनिंग स्कूलमध्ये कार्यरत असणार्‍या सौ. रखमाबाई केळवकर या बुद्धिमान आणि कर्तव्यदक्ष स्त्रीची 1 सप्टेंबर 1895 रोजी नेमणूक केली होती. शाहू छत्रपतींनी त्यांच्या सून इंदूमती राणीसाहेबांना त्यांचे पुढील आयुष्य अधिक सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगता यावे म्हणून वा. द. तोफखाने यांच्या देखरेखीखाली त्यांच्या शिक्षणाची सोय केली.

गानसम्राट अल्लादिया खाँ, त्यांचे पुत्र भूर्जी खाँ, शाहीर लहरी हैदर, चित्रकला तपस्वी आबालाल रहेमान, कुस्तीमधील त्यांचे गुरू बालेखान वस्ताद, फोटोग्राफर मरहूम पठाण आणि गामा, गुंगा, इमाम बक्ष, भोला पंजाबी इत्यादी अनेक पंजाबी मल्लांना त्यांचा लाभलेला उदंड आश्रय आणि प्रेम शाहू छत्रपतींच्या उमद्या मनाचे उदात्त दर्शन घडवते! 1907 साली मराठा समाजातील प्रसिद्ध विचारवंत आणि इतिहासकार कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांचे मराठीतील पहिले साधार बुहद् शिवचरित्र प्रसिद्ध झाले.

त्या शिवचरित्राला त्यांनी 1000 रुपयांचे पारितोषिक देऊन खास गौरव केला होता आणि त्या अभिजात ग्रंथाच्या 1000 रुपयांच्या प्रती शाहू छत्रपतींनी विकत घेतल्या होत्या. जे ब्रिटिश शिवछत्रपतींचा सदैव अवमानकारक उल्लेख करीत असत, त्या ब्रिटिशांच्या प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते पुण्यामध्ये 19 नोव्हेंबर 1921 रोजी भांबुर्डे भागात शिवछत्रपतींच्या पुतळ्यांच्या चौथर्‍याची पायाभरणी घडवून आणून ब्रिटिशांना शिवछत्रतींना मुजरे करण्यास भाग पाडले होते.

शेती, उद्योग, धर्म आणि जातिसंस्था इत्यादी अनेक क्षेत्रांत शाहू छत्रपतींनी अनेक प्रयोग केले होते. तसाच एक अनोखा प्रयोग शाहू छत्रपतींनी या भटक्या जमातीबाबत केला. शाहू छत्रपतींनी आपल्या संस्थानातील फासेपारध्यांना खासगीत नोकर्‍या दिल्या. त्यांच्यासाठी सोनतळी (रजपूतवाडी) येथे गरज नसतानाही विविध प्रकारची बांधकामे सुरू करून त्यांना रोजगार दिला. कोल्हापुरातील कोटीतीर्थ माळावर 25 फासेपारधी कुटुंबांना झोपड्या बांधून राहण्यासाठी 1200 रुपये मंजूर केल्याचा 15 नोव्हेंबर 1912 चा हुकूम पाहावयास मिळतो. त्याही पुढे जाऊन शाहू छत्रपतींनी 20 ऑगस्ट 1918 रोजी फासेपारध्यांची दररोज हजेरी देण्याची अमानुष पद्धत बंद केली.

असा हा मानवतावादी राजा सनातनी हिंदू धर्म आणि त्या धर्माच्या पाठिंब्यावर उभी असणारी जातिसंस्था मोडून काढावी, यासाठी सतत कार्यरत होता. शाहू स्पिनिंग आणि वीव्हिंग मिल स्थापून आधुनिक उद्योगांना चालना देत होता. बालगंधर्व, केशवराव भोसले, अल्लादिया खाँ, भूर्जी खाँ, गोविंदराव टेंबे, अंजनीबाई मालपेकर, केसरबाई यांसारख्या संगीत-नाट्यकलेतील कलाकारांना उदार आश्रय देत होता.

कुस्तीवर तर त्यांचे खूप प्रेम होते. साहित्य आणि इतिहास ही त्यांच्या खास आवडीची क्षेत्रे होती. कृष्णाजी अर्जुन केळूसकर, प्रबोधनकार ठाकरे, द. ब. पारसनीस, अण्णासाहेब लठ्ठे यांसारख्या इतिहास संशोधकांना त्यांनी सदैव आर्थिक मदत केली; तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी शिवचरित्र लिहावे म्हणून त्यांना खास आग्रह केला.

या सर्व इतिहास संशोधकांनी सत्य हेच मांडावे म्हणून त्यांना अभय दिले. 'संदेश'कार कोल्हटकर, 'जागृती'कार पाळेकर, 'विजयी मराठा'कार श्रीपतराव शिंदे, 'जागरूक'कार कोठारी, 'दीनमित्र'कार मुकुंदराव पाटील, 'भवानी तलवार'चे दिनकरराव जवळकर यांच्यासारख्या बहुजनांच्या पत्रकार, संपादक व लेखक या मंडळींना त्यांनी 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हेच सूत्र लक्षात ठेवून सतत लिहिते ठेवले.

अशा या राजात 'माणूस' आणि माणसात 'राजा' असणार्‍या लोकराजाचे मुंबई येथील खेतवाडी बंगल्यात 6 मे 1922 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तर 'सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ' या शब्दांत त्यांचा गौरव करतात. य. दि. फडके त्यांचा उचित गौरव करताना लिहितात, "गेल्या शतकात महात्मा फुले यांनी स्वाभिमानाचे व समतेचे बी पेरून जे झाड लावले, त्याला खतपाणी घालून ते काळजीपूर्वक वाढविले शाहू छत्रपतींनी! या झाडाला भाऊराव पाटील, केशवराव जेधे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाच्या रूपाने पुढील काळात नवनवीन धुमारे फुटले.

शतकानुशतके ज्यांना अन्यायी व विषम समाज व्यवस्थेमुळे अपार दु:ख व अपमान सोसावे लागले, त्या अस्पृश्य समजल्या जाणार्‍या तसेच मागास जातींच्या लोकांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावे, शिकता यावे आणि विकासाच्या वाटा त्यांना खुल्या व्हाव्यात यासाठी शाहू छत्रपतींनी जे महान ऐतिहासिक कार्य केले; त्याची नोंद अर्वाचीन काळातील महाराष्ट्राचा, एवढेच नव्हे, तर भारताचा इतिहास लिहिणार्‍याला करावीच लागेल."

1974 हे वर्ष देशाच्या सामाजिक इतिहासातलं महत्त्वाचं वर्ष होतं. राजर्षी शाहू महाराजांची ही जन्मशताब्दी. पण बसता-उठता शाहूरायांचे नाव घेणार्‍या राज्यकर्त्यांना, कार्यकर्त्यांनाच काय, पण शाहूरायांच्या वंशजांनाही महाराजांच्या जन्मशताब्दीचे विस्मरण झाले होते. पण याचे भान असणारा एकच द्रष्ट्रा माणूस जागा होता, त्यांचे नाव प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब जाधव! तेव्हा ते कार्यकारी संपादकपदाची धुरा सांभाळत होते. त्यांनी 10 मार्च 1974 रोजी कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात निमंत्रक म्हणून व्यापक बैठक बोलावली. महोत्सव भव्य प्रमाणावर साजरा करण्यासाठी व्यापक समिती स्थापन झाली.

सर्व सदस्यांनी त्या समितीचे अध्यक्षपद बाळासाहेबांनीच स्वीकारावे, असा आग्रह धरला. पण या आग्रहाला नम्रपणे नकार देऊन दलित समाजातील जिल्हाधिकारी शशिकांत दैठणकर यांनाच व्यापक समितीच्या अध्यक्षपदाचा मान द्यावा. तो खर्‍या अर्थाने राजर्षींच्या विचारांचा विजय असेल, असे त्यांनी सांगितले. त्यांचे म्हणणे समितीने मानले, मात्र कार्याध्यक्षपद त्यांनाच स्वीकारायला लावले. समितीमध्ये जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांचा समावेश होता. त्याचबरोबर साखर कारखाने, सहकारी संस्था, तालीम मंडळे, शिक्षण संस्था, उद्योग अशा सर्व क्षेत्रांतील मान्यवरांना समितीत सहभागी करून घेण्यात आले.

बाळासाहेबांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची भेट घेऊन शिवजयंतीप्रमाणे शाहूजयंतीही राज्यस्तरावर साजरी झाली पाहिजे, तसेच कोल्हापुरातील शाहू जन्मशताब्दी सोहळ्याला सगळे मंत्रिमंडळ हजर राहिले पाहिजे, असा आग्रह धरला. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने त्याला सहर्ष मान्यता दिली. शासकीय पातळीवर शाहू जयंती साजरी करण्यासाठी शासनाला अध्यादेश काढणे बाळासाहेबांनी भाग पाडले. लोकमान्य टिळकांच्यामुळे शिवजयंती साजरी होऊ लागली. त्याचप्रमाणे बाळासाहेबांच्यामुळे शाहू जयंती साजरी होऊ लागली.

शाहू जन्मशताब्दी सोहळ्याला सारे मंत्रिमंडळ उपस्थित राहिले. शाहू स्टेडियमवर लाखोंच्या उपस्थितीत भव्य जन्मशताब्दीचा मुख्य सोहळा झाला. सोहळ्यानिमित्त अतिप्रचंड मिरवणूक निघाली. ही मिरवणूक पाच तास चालली होती. या शाहू जन्मशताब्दीच्या सोहळ्याचे श्रेय बाळासाहेबांना आहे, असे जिल्हाधिकारी शशिकांत दैठणकर यांनी त्यांच्या लेखामध्ये नमूद केले आहे. शाहू जन्मशताब्दी सोहळ्याच्या दरम्यानच कोल्हापुरात राजर्षींच्या कर्तृत्वाला साजेसे स्मारक झाले पाहिजे, असा प्रस्ताव बाळासाहेबांनी मांडला होता.

हे स्मारक उभे करण्यासाठी पन्नास लाखांचा निधी आवश्यक होता. तो उभा करण्याची कामगिरीही बाळासाहेबांनी आपल्या शिरावर घेतली आणि तो जमा करूनही दाखवला. त्याच निधीतून दसरा चौकात 'राजर्षी शाहू स्मारक भवन' ही वास्तू निर्माण झाली. 3 फेब्रुवारी 1981 रोजी 'राजर्षी शाहू स्मारक भवन'चे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या हस्ते करण्यात आले.

1990 मध्ये कि. का. चौधरी नामक नतद्रष्ट माणसाने संपादित केलेल्या कोल्हापूर गॅझेटियरमध्ये शाहू महाराजांची निंदानालस्ती करण्यात आलेली आढळल्यावर बाळासाहेबांनी संपादक मंडळाबरोबरच तत्कालीन सरकारवरही तोफांची सरबत्तीच केली. मग त्यांनी कोल्हापूरकरांची एक लढाऊ फळीच उभी केली आणि सरकारला गॅझेटियरमधली सगळी वादग्रस्त पाने रद्द करायला भाग पाडले. हे सामर्थ्य होते बाळासाहेबांचे आणि त्यांच्या 'पुढारी'चे!

1993 मध्ये बाळासाहेबांनी मला भेटीचा निरोप दिला. मी भेटलो. त्यांनी माझ्यापुढे 'पुढारी'ची लोकप्रिय पुरवणी 'बहार'मध्ये राजर्षी शाहू महाराजांच्यावर दीर्घ मालिका लिहिण्यास सांगितले. बाळासाहेबांच्या या दूरदर्शीपणामुळेच माझ्या हातून 'लोकराजा राजर्षी शाहू महाराज' ही मालिका लिहून झाली. ही मालिका दीड वर्षे चालली. त्याचा ग्रंथही निघाला. त्याच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. याचे सर्व श्रेय बाळासाहेबांचेच!

6 मार्च 1997 हा दिवस उत्तर प्रदेशासाठी तसाच महाराष्ट्रासाठीही ऐतिहासिक स्वरूपाचा होता. याच दिवशी कानपूरमध्ये अतिभव्य असा 'शाहू महोत्सव' साजरा करण्यात आला, तोही मायावती या एका दलित नेतृत्वाच्या पुढाकाराने! या महोत्सवाची प्रेरणा मात्र 'पुढारी'चीच होती, हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. ही गोष्ट प्रत्यक्ष बहुजन समाज पार्टीचे सर्वेसर्वा कांशीरामजी यांनी वेळोवेळी अगदी दिलखुलासपणे मान्य केली होती. उत्तर प्रदेशात सत्तेवर आल्यावर शाहू महाराजांच्या नावे जिल्हा करावा, अशी सूचना बाळासाहेबांनी कांशीराम यांना केली व त्यांनी ती मान्य केली आणि त्यांची सत्ता आल्यावर त्यांनी ते करूनही दाखवले. कानपुरात झालेल्या या महोत्सवासाठी कोल्हापुरातून खास रेल्वेने बाराशेहून अधिक प्रतिनिधी पाठवण्यात आले आणि त्याचा सर्व खर्च 'पुढारी'ने उचलला!

बाळासाहेब कामानिमित्त नेहमी दिल्लीला जातात. त्यांच्या असे लक्षात आले, की संसदेच्या प्रांगणात अनेक नेत्यांचे आणि महापुरुषांचे पुतळे आहेत; पण तिथे राजर्षींचा मात्र पुतळा नाही. त्यांनी संसद प्रांगणात शाहूरायांचा पुतळा उभा करण्याचा चंग बांधला. 17 फेब्रुवारी 2009 रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते संसद भवनातील हिरवळीवर राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्याच वेळी कोल्हापुरात बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली भव्य 'शाहू महोत्सव' साजरा करण्यात आला. राजर्षी शाहूरायांच्या स्मृती शताब्दीच्या औचित्याने बाळासाहेब जाधव यांनी केलेल्या महत्कार्याच्या या स्मृतींना उजाळा देणेही औचित्यपूर्णच ठरेल!

प्रा. रमेश जाधव
(शाहू चरित्रकार व ज्येष्ठ इतिहास संशोधक)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT