Latest

राजकीय : ‘यात्रे’ची फलनिष्पत्ती काय?

Arun Patil

काँग्रेस आणि इतर बिगरभाजप पक्षांचे भवितव्य 2024 च्या लोकसभा निवडणुकीशी जोडले गेले आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणूक ही काँग्रेसची लिटमस टेस्ट आहे. राजकीयदृष्ट्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेमचेंजर ठरेल की नाही, हे सांगता येत नाही; पण एक विश्वासार्ह राजकारणी म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यात या यात्रेमुळे निश्चित यश आले आहे.

काँग्रेसच्या 24, अकबर रोड येथील कार्यालयात महात्मा गांधींची अनेक वचने लावण्यात आली आहेत. त्यातील एकात असे म्हटले आहे की, कभी कभी हम अपने विरोधियों के कारन आगे बढते हैं। (कधी कधी आपण आपल्या विरोधकांमुळे प्रगती साधतो.) आणखी एक अवतरण असे आहे की, पहले वह आप पर ध्यान नहीं देंगे, फिर वह आप पर हसेंगे, फिर आपसे लडेंगे, और तब आप जीत जाएंगे. (म्हणजे आधी ते तुम्हाला दुर्लक्षित करतील, नंतर तुम्हाला हसतील. नंतर तुमच्याशी लढतील आणि हे सगळे टप्पे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला विजय प्राप्त होईल.) राहुल गांधींच्या सुरू असलेल्या अमूर्त तरीही कठीण अशा भारत जोडो यात्रेच्या संदर्भात ही अवतरणे काही प्रमाणात प्रासंगिकता आणि आशा उत्पन्न करणारी आहेत.

राहुल यांचे विरोधक आणि हितचिंतक यांच्यात एक व्यापक आणि वाढते एकमत असे आहे की, अखेरीस गांधी घराण्याचे हे वंशज त्यांच्या 2004 मध्ये सुरू झालेल्या राजकीय प्रवासात चिकाटी आणि आशेचे दर्शन घडवू लागले आहेत. राजकीयदृष्ट्या ही यात्रा गेमचेंजर ठरेल की नाही, हे सांगता येत नाही; पण राहुल यांना जनतेत मिसळणारा, चर्चेत राहू शकणारा तसेच एम. के. स्टॅलिन, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, फारुख अब्दुल्ला यांच्यापासून रघुराम राजन, ए. एस. दुलत, स्वरा भास्कर आणि कमल हसन यांच्यापर्यंत अनेकांचा पाठिंबा मिळवू शकणारा एक विश्वासार्ह राजकारणी म्हणून प्रस्थापित करण्यात या यात्रेमुळे निश्चित यश आले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, भाजपची कडक टीका, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांची कोव्हिडमुळे यात्रा स्थगित करण्याची विनंती आणि चीनने कथितपणे भारतीय हद्दीत प्रवेश केल्याबद्दल राहुल यांनी केलेल्या टिपण्णीबद्दल दिसून आलेला संताप यामुळे असंतोषाचा एकमेव आवाज म्हणून राहुल यांना या यात्रेने प्रस्थापित केले आहे.

कन्याकुमारी येथून यात्रेला सुरुवात झाली तेव्हा राहुल यांची लोकप्रियता नीचांकी स्तरावर होती आणि काँग्रेसच्या नेतृत्वाचा प्रश्न सुटणे तर खूपच दूर होते. यात्रा केरळ आणि कर्नाटकच्या सीमेवर असताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पुढील अध्यक्ष होतील, असे संकेत मिळत होते. असे झाल्यास देवराज अर्स, अर्जुनसिंह यांच्या काळापर्यंत पक्षाची पीछेहाट होईल, अशी शंका मित्रांना आणि शत्रूंनाही वाटत होती. परंतु काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहून राहुल यांनी यात्रेवर लक्ष केंद्रित केले. हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने हिमाचल प्रदेश जिंकल्यामुळे संमिश्र यश मिळाले. काँग्रेसच्या मृत्यूचे भाकित करणार्‍यांना हा आश्चर्याचा धक्का होता. त्यांच्या दृष्टीने निश्चल झालेला काँग्रेस पक्ष वास्तवात केवळ जिवंतच नव्हे तर कार्यक्षमही असल्याचे दिसून आले. यावर्षी कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची लिटमस टेस्ट आहे. ही राज्ये जिंकल्यास 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत हा सर्वांत जुना पक्ष एक गंभीर आव्हान निर्माण करणारा पक्ष म्हणून उदयास येऊ शकेल.

आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, काँग्रेस आणि इतर बिगरभाजप पक्षांचे नशीब किंवा भवितव्य 2024 च्या लोकसभा निवडणुकीशी जोडले गेले आहे. या निवडणुकीत काँग्रेस-यूपीए भागीदारांना निम्म्या जागा जिंकण्याचे म्हणजे लोकसभेच्या 272 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवावे लागेल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी हे लक्ष्य अवघड निश्चित असेल; पण अशक्य नक्कीच नसेल. पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटक ही चार राज्ये महत्त्वाची आहेत. या राज्यांत 2019 मध्ये भाजप आणि एनडीएने खूप चांगली कामगिरी केली होती; परंतु त्यानंतरच्या राजकीय घडामोडींनी एक वेगळीच परिस्थिती निर्माण केली. उदाहरणार्थ, पश्चिम बंगालमध्ये भाजपने लोकसभेच्या 42 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या. कर्नाटकमध्ये भाजपने 28 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या. तर महाराष्ट्रात अविभाजित शिवसेना-भाजप आणि एनडीए मित्रपक्षांनी 48 पैकी 42 जागा जिंकल्या होत्या. या चार राज्यांमधील भाजपचे संख्याबळ निम्म्यावर आले तर काय होईल, याची कल्पना करा. 272 जागांचे साधे बहुमत हे एक दूरचे स्वप्न राहील आणि खिचडी सरकारची शक्यता प्रत्यक्षात येईल.

काँग्रेसला सत्तेसाठी दावेदार होण्यासाठी केरळ, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, कर्नाटक, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि इतर काही राज्यांमधून लोकसभेच्या शंभर किंवा त्याहून अधिक जागा जिंकाव्या लागणार आहेत. पक्षाची थेट लढत भाजपशी आहे आणि भाजपची स्थिती तुलनेने मजबूत आहे. पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुका परस्परविरोधी शैलीत लढविल्या जाणार आहेत. एकीकडे टीम मोदी पंतप्रधानांची वैयक्तिक लोकप्रियता, मोठे प्रकल्प, कोव्हिड काळात मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण आणि अन्य मदत, राजनैतिक आघाडीवर मिळालेले यश आणि राममंदिरासारख्या भावनिक मुद्द्यांवर भिस्त ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. दुसरीकडे, ज्या राज्यांत प्रादेशिक पक्षांचा दबदबा अपेक्षित आहे, अशा राज्यांमध्ये लढाई अधिक तीव— करण्यास काँग्रेस आणि त्यांचे संभाव्य सहकारी पक्ष तयार असतील.

म्हणूनच ममता बॅनर्जी, नितीशकुमार, उद्धव ठाकरे, शरद पवार, एम. के. स्टॅलिन, नवीन पटनायक, एच. डी. कुमारस्वामी, चंद्राबाबू नायडू आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील पक्षांनी मिळून संसदेच्या काही जागा राखून ठेवल्या तर काँग्रेसला विजय मिळू शकेल. बहुतेक हिंदी पट्ट्यांतील राज्ये आणि ईशान्येत चांगले काम करण्याचे आव्हान काँग्रेससमोर असेल.

भारतातील निवडणुकीच्या राजकारणात कमकुवतपणाच्या नव्हे तर ताकदीच्या आधारावर आघाडी तयार केली जाते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या प्रभावळीने त्यांना निर्णायक भूमिका बजावण्याचे नैतिक अधिकार प्रदान केले आहेत. शिवाय, सोनिया गांधी आणि राहुल यांच्याकडे डाव्यांसह बिगर एनडीए अनेक पक्षांचे बळ आधीपासूनच आहे आणि त्यामुळे महाआघाडी कायम राहण्यासाठी ते सर्व पक्षांशी संवाद साधू शकतात.

रशिद किडवई
ज्येष्ठ पत्रकार, विश्लेषक, नवी दिल्ली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT