Latest

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

सोनाली जाधव

औरंगाबाद/मुंबई : पुढारी वृत्तसेवा
1 मे रोजी महाराष्ट्रदिनी औरंगाबाद येथे सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर चिथावणीखोर आणि सामाजिक शांतता भंग करणारे भाषण दिल्याबद्दल तसेच पोलिसांनी घालून दिलेल्या अटी व शर्तींचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या एफआयआरमध्ये राज ठाकरे प्रमुख आरोपी असून, सभेचे आयोजक राजीव जावळीकर यांना सहआरोपी करण्यात आले आहे. तिसर्‍या क्रमांकावर इतरांना आरोपी करण्यात आले आहे. सभेचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या आधारावर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, राज ठाकरे यांच्याकडून शांतता भंग होईल, सार्वजनिक शांतताविरोधी अपराध घडेल अगर दंग्यासारखा अपराध घडेल हे माहीत असूनही बेछूट, चिथावणीखोर वक्‍तव्य करून पोलिस आयुक्‍त कार्यालयाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचा भंग केला आहे. या गुन्ह्यासाठी राज ठाकरे, संस्थापक अध्यक्ष मनसे, राजीव जावळीकर व इतर संयोजक यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 116, 117, 153 सह कलम 135 महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज ठाकरे यांच्याविरोधात दाखल झालेले हे गुन्हे जामीनपात्र आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्याकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याशिवाय पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांविरोधात न्यायालयात आव्हान देऊन ते रद्द करण्याची मागणी केली जाऊ शकते.

राज ठाकरेंविरोधात औरंगाबादेतील सिटी चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गजानन इंगळे यांनी फिर्याद नोंदवली असून, निरीक्षक अशोक गिरी हे तपास करत आहेत. राज ठाकरे यांच्या सभेसाठी अटी व शर्तींसह परवानगी देण्यात आली होती; मात्र सभेदरम्यान त्यांचे पालन झाले नाही आणि सभेबाबतचे अन्य नियमदेखील मोडले गेल्याचे फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांना अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य पोलिस दलातील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, राज्यातील महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. यासाठी राज्यातील पोलिसांच्या दिमतीला 87 'एसआरपीएफ' पथके, 30 हजार गृहरक्षक जवान (होमगार्ड) तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात महाराष्ट्र पोलिस सक्षम असल्याचा विश्‍वास रजनीश सेठ यांनी यावेळी व्यक्‍त केला. राज्यात शांतता कायम ठेवण्यासाठी आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी मोहल्ला समितींसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे पोलिस दल आता कोणत्याही कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्येला तोंड देण्यासाठी सक्षम आणि कोणत्याही प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असल्याचे सेठ यांनी सांगितले.

महाराष्ट्राबाहेरून गुंड मागवून राज्यात दंगलीचा प्रयत्न : संजय राऊत

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी महाराष्ट्राबाहेरील गुंडांची मदत घेण्याचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. गृह विभागाकडेदेखील अशाच प्रकारची माहिती असल्याने पोलिस यंत्रणा सतर्क असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्रात अशाप्रकारच्या सुपार्‍या चालणार नाहीत. ज्यांची राज्यात ताकद नाही, अशा लोकांकडून बाहेरून गुंड मागवून मुंबईत गडबड करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, राज्यातील पोलिस अशा प्रवृत्तींना हाताळण्यास सक्षम आहेत, असेही ते म्हणाले.

मनसेच्या महेंद्र भानुशालींना अटक

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू करत प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईत सर्वप्रथम भोंगा लावणार्‍या चांदिवली मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी अटक केली आहे. भानुशाली यांच्या कार्यालयातून भोंगे तसेच हनुमान चालिसा पठणासाठीचे साहित्यही जप्‍त करण्यात आले आहे.

15 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; 13 हजार जणांना नोटिसा

4 मेपर्यंत राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास मनसेचे कार्यकर्ते त्या मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण करतील, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत राज्यात 15 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत, 13 हजार जणांना 'सीआरपीसी'च्या कलम 149 अन्वये नोटिसा बजावल्या आहेत. राज्यात कोणत्याही प्रकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांना तोंड देण्यासाठी पोलिस सज्ज असल्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी मंगळवारी सांगितले. 465 कार्यकर्त्यांना मुंबई सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 86 जणांना न्यायालयात हजर करून त्यांच्यावर कारवाई केली आहे. मंगळवारी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस महासंचालक रजनीश सेठ आणि मुंबई पोलिस आयुक्‍त संंजय पांडे यांच्यासोबत एक बैठक घेतली. त्यानंतर पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

अल्टिमेटमवर राज्य चालत नाही. आमच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. काही जण हे राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतील; तर ती सर्वात मोठी चूक ठरेल व ते स्वत: उघडे पडतील. राज्याच्या पोलिसांची पावले योग्य दिशेने पडत आहेत.
– संजय राऊत, शिवसेना नेते
दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने राज्यात उद्रेक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा हा पक्ष दोन वर्षांपासून प्रयत्न करत आहे. राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची राज्य सरकार खबरदारी घेईलच; शिवाय कोणी कायदा हातात घेत असेल, तर त्यावर कायद्याप्रमाणे शासन व प्रशासन योग्य ती कारवाई करेल.
– नाना पटोले,
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

  • 'एसआरपीएफ'च्या 87 तुकड्या; 30 हजारांवर होमगार्ड तैनात
  • 15 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; 13 हजार कार्यकर्त्यांना नोटिसा
  • मनसेच्या महेंद्र भानुशालींना मुंबईतून अटक

    पोलिसांनी आदेशाची वाट पाहू नये; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मनसेकडून मशिदींवरील भोंग्यांविरोधात बुधवारी होणार्‍या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नये, असेही सांगितले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस अधिकार्‍यांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT