Latest

रशिया-युक्रेन युद्धाच्या शेअर बाजाराला झळा

Arun Patil

गेल्या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्यात रशिया व युक्रेनमधील तणाव आणि वस्तू सेवा करावर जो उपकर लावला जातो तो 2026 पर्यंत कायम राहील अशी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी दिलेली ग्वाही यांचा समावेश करावा लागेल.

एका देशाच्या राजकारणात दुसर्‍या देशाच्या सरकारने काही निर्णय घ्यावेत हा एक विचित्र पायंडा आता पडू बघत आहे. पूर्व युक्रेनमधील दोन प्रांतांनी बंडाळी करून आपण स्वतंत्र झाल्याचे जाहीर केले. रशियाने त्यावर ताबा मिळवण्यासाठी आपले सैन्य पाठवले आहे. या आंतरराष्ट्रीय घटनेमुळे मोठ्या युद्धाचे ढग जमत आहेत की काय, अशी धास्ती वाटू लागली आहे. त्यामुळे शेअर बाजारातील निर्देशांक आणि निफ्टी सलग 5 दिवस घसरत होते. गुरुवारी 24 फेब्रुवारीला शेअरबाजार बंद होताना निर्देशांक 54,599 अंकांवर बंद झाला तर निफ्टी 16,247 वर स्थिरावला.

गुरुवारी 24 फेब्रुवारीला काही प्रमुख शेअर्सचे भाव शेअरबाजार बंद होताना खालीलप्रमाणे होते. हेग 1043 रुपये, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन 110 रुपये, अशोका बिल्डकॉन 81 रुपये, जिंदाल स्टेनलेस 176 रुपये, लार्सेन अँड टूब्रो 1757 रुपये, भारत पेट्रोलियम 333 रुपये, ग्राफाईट 425 रुपये, स्टेट बँक 472 रुपये, स्टील स्ट्रीप्स 712 रुपये, पिरामल एंटरप्राइझेस 1948 रुपये, सन फार्मा 818 रुपये, बजाज फिनसर्व्ह 19,245 रुपये, बजाज फायनान्स 6626 रुपये.

युक्रेन आणि रशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल व डिझेलचे भाव भडकण्याची शक्यता असून महागाईत तेल ओतले जाईल. या संघर्षामुळे ब्रेन्ट क्रूड (कच्चे तेल)चे भाव बॅरलला 95 डॉलरच्या वर गेले आहेत. तेलच्या मालाचा गेल्या 8 वर्षांतील हा उच्चांक ठरला आहे.

भारतात नजीकच्या काळात 5 राज्यांत निवडणुका होणार आहेत. त्यानंतर पेट्रोल व डिझेलचे भाव किमान 20 रुपयांनी वाढणार आहे. रस्त्यावरील मालवाहतुकीवर त्यांचा परिणाम होईल तसेच प्रवासी वाहतूकही महागेल. या संभाव्य युद्धाचा दणका सर्वाधिक पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर होईल. जगातील नैसर्गिक वायूच्या उत्पादनापैकी 17 टक्के उत्पादन केवळ रशियात होते.

अन्नाच्या बदल्यात पेट्रोल असा भारत -इराण, इराक यांच्यात करार आहे. त्यामुळे भारतावर तेलावरील किंमतवाढीचा परिणाम होऊ नये. पण आगामी काळात एलपीजी आणि सीएनजी यांच्या किमतीत प्रती किलो 10 ते 15 रुपयांची वाढ संभवते. भारतात मुंबईचा सागरी किनारा, हैदराबाद व राजस्थानमधील तेलविहिरी इथे भारतात तेल मिळाल्यामुळे भारतातील या कंपन्यांना नवीन उत्खननाचा विचार करावा लागेल.

बाजारात पुन्हा औषधी कंपन्यांना चांगले दिवस येणार आहेत. विशेषतः ज्या कंपन्यांच्या उत्पादनाचे कारखाने अमेरिका व युरोपमध्ये आहेत, त्यांची ऊर्जितावस्था वाढेल. औषधी कंपन्यांत टॉवंट फार्मा, सनफार्मा, फायझर, डॉ. रेडीज लॅबोरेटरीज या कंपन्यांना यापुढे चांगले दिवस आहेत. कोरोनाच्या संकटामुळे लसीकरण गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर वाढले.

शेअरबाजार 25 फेब्रुवारीला शुक्रवारी बंद होताना निर्देशांक 55,858 अंकावर बंद झाला तर निफ्टी 16,658 अंकावर स्थिरावला. गुरुवारची – 24 फेब्रुवारीची शेअर बाजाराची घसरण गेल्या दोन वर्षांतली सर्वात मोठी होती. खरं पाहिलं, तर रशिया व युक्रेन यांच्यातील युद्धाची झळ भारताला लागण्याची जरूरी नव्हती. यासंदर्भात सांगण्याची बाब म्हणजे, युक्रेनमध्ये आपले भारतीय 20000 नागरिक आहेत. त्यापैकी फक्त 4000 च लोक भारतात आले. जगातील राष्ट्रांनी मात्र या संघर्षाची दखल घेतली.

रशियातील पेट्रोलचे उत्पादन जगातील पेट्रोल उत्पादनाच्या पैकी 17 टक्के आहे. व्हेनिझुएला, मेक्सिको, नायजेरिया, इराक, इराण इतक्या देशांत उरलेले 83 टक्के उत्पादन होते.

गेल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातील कंपन्यांचे समभाग विक्रीला काढले. गेल्या 4 महिन्यांत समभाग विक्रीचे आकडे पुढीलप्रमाणे आहेत.

ऑक्टोबर 2021 – समभाग विक्री 25,572 कोटी रुपये. नोव्हेंबर 2021 – समभाग विक्री 39,901 कोटी रुपये. डिसेंबर 2021 – समभाग विक्री 35,494 कोटी रुपये. जानेवारी 2022 – समभाग विक्री 41,346 कोटी रुपये. बाजार सतत घसरत असताना निदेशकांनी सावध जरी इष्ट असले तरी हीच वेळ बाजारात थोड्या थोड्या प्रमाणात गुंतवण्याची आहे, असे समजायला हवे.

डॉ. वसंत पटवर्धन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT