Latest

रब्बी हंगामातील किफायतशीर पीक : इसबगोल

Arun Patil

इसबगोलचे जगात सर्वात जास्त उत्पादन आणि निर्यात करणारा भारत हा प्रमुख देश आहे. भारतातील एकूण इसबगोल उत्पादनाच्या जवळजवळ 60 ते 90 टक्के उत्पादन निर्यात होते. इसबगोल बियांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खूप मागणी असून उत्पादन व व्यापार यामध्ये अजूनही भारतीय वर्चस्व आहे. भारतात इसबगोल हे गुजरात राज्याचे एक महत्त्वाचे पीक असून, गेल्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांमधील शेतकर्‍यांनीसुद्धा हे पीक घेण्यास सुरुवात केली आहे.

इसबगोल हे रब्बी हंगामातील पीक असून, याची झाडे 30 ते 40 सें.मी. वाढतात. झाडाला खोड नसून गव्हाप्रमाणे दांडे असतात. पाने 7.5 ते 20 सें.मी.पर्यंत लांब व 1 सें.मी.पर्यंत रुंद असतात. संपूर्ण झाडावर व पानावर पांढर्‍या केसांची लव असते. इसबगोलच्या झुडपास जमिनीपासून 5 ते 10 फांद्या येतात व 20 ते 45 फुटवे येऊन जवळजवळ प्रत्येक फुटव्याला गव्हासारखी परंतु लहान ओंबी येते. ओंब्यामध्ये पांढर्‍या रंगाचे परंतु तिळाएवढे बी असते. इसबगोलच्या बियांमध्ये साधारणपणे 30 टक्के कोंडा (भुशी) असते. या बियांवरचे आवरण म्हणजे औषधोपयोगी भुशी होय.

हे पीक हलक्या ते मध्यम प्रतीच्या वाळूमिश्रित किंवा लाल मातीच्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढते. या पिकासाठी उत्तम निचरा होणारी जमीन योग्य असते. खरीप हंगामातील पीक काढल्यानंतर नांगरणी करून कुळवाच्या 1 ते 2 पाळ्या द्याव्यात व जमीन भुसभुशीत करावी. पेरणीपूर्वी शेणखत जमिनीत मिसळावे. शेत तयार झाल्यावर जमिनीच्या उतारानुसार 5 ते 8 फूट लांबी व 4 फूट रंदीचे वाफे तयार करावेत. पेरणीअगोदर प्रतिकिलो बियाण्यास 4 ग्रॅम या प्रमाणात मेटॅलॅक्झील चोळून बीजप्रक्रिया करावी. पिकाची पेरणी 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत करावी. एक हेक्टर क्षेत्र पेरण्याकरिता साधारणतः 8 ते 10 किलो बी पुरेसे होते.

बियांची पेरणी वाफ्यांमध्ये बी फोकून करावी. बी शक्यतो मातीत मिसळून फोकावे म्हणजे सर्वत्र सारखे पडेल. बी लहान असल्याने ते समप्रमाणात पडेल तसेच खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी. बी फोकून झाल्यावर हलक्या हाताने किंवा झाडूने बी झाकावे, त्याचप्रमाणे 30 सें.मी. अंतरावर काकर्‍या पाडून घ्याव्यात व त्यामध्ये बी पेरून नंतर मातीने झाकून घ्यावे. अशा पद्धतीने पेरणी केल्यास हेक्टरी 4 ते 5 किलो बी पुरेसे होते. पेरणी झाल्यावर एक हलके पाणी द्यावे. बियांची उगवण 8 ते 10 दिवसांनी सुरू होते. बियाणे उपलब्धतेसाठी महात्मा फुले कृषा विद्यापीठ, राहुरी फोन नं. (02426) 2432292 येथे संपर्क साधावा.

इसबगोलची रासायनिक खताची गरज कमी असली तरी 50 किलो नत्र, 30 किलो स्फुरद व 30 किलो पालाश प्रतिहेक्टरी द्यावे. अर्धे नत्र, पूर्ण स्फुरद व पूर्ण पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेले नत्र पेरणीनंतर एक महिन्याने द्यावे. जमिनीच्या पोतानुसार 10 ते 15 दिवसांच्या अंराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 1 ते 2 वेळा निंदणी करून पीक तणविरहित ठेवावे. पेरणीनंतर 50 ते 60 दिवसांनी पीक फुलोर्‍यात येते. प्रत्येकी 20 ते 25 फुटवे निघतात. साधारणतः 110 ते 130 दिवसांनी म्हणजेच मार्च-एप्रिलमध्ये पीक काढणीस तयार होते. या वेळी पिकाचा रंग पिवळसर होऊन ओंब्या तपकिरी दिसतात. त्याचप्रमाणे ओंब्या दाबल्यास त्यातून बी बाहेर पडते. ओंब्यातील बी गळून पडण्याचे टाळण्यासाठी पिकाची काढणी सकाळी करावी. कापणी जमिनीलगत झुडपाच्या बुंध्याजवळ करावी व लगेच गोळा करून 1-2 दिवस गंजी मारून कापलेले पीक उन्हात वाळवावे. नंतर मळणी व उफणणी करून भुश्यामधून बी अलग करावे.

साधारणतः 1 हेक्टर क्षेत्रामधून 10 ते 12 क्विंटल इसबगोलचे बियाणे मिळते. गुजरात राज्याच्या सीमेवरील धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांतील कोरडवाहू शेतकर्‍यांनी इसबगोलचे उत्पादन करणे विक्रीच्या द़ृष्टिकोनातून सोईस्कर राहील. या पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. याचा बंदोबस्त करण्याकरिता गंधकयुक्त (कॅराथेन अथवा सल्फेक्स) औषधाची 2 ते 3 वेळा फवारणी करावी. इसबगोलची भुशी तयार करणे. इसबगोलची बी कांडून त्यातील भुशी वेगळी केली जाते. प्रत्येक कांडणीबरोबर भुशी कमी होत जाते. कांडणीकरिता विशिष्ट प्रकारच्या चक्कीचा उपयोग केला जातो. निरनिराळ्या प्रकारच्या 6 चाळण्यांमधून बियांपासून भुशी काढतात. दुसर्‍या आणि तिसर्‍या कांडणीपासून मिळालेली भुशी चांगल्या प्रकारची असते. भुशी व बियाणे यांचे गुणोत्तर 25ः75 या प्रमाणात असते.

इसबगोलची भुशी बुद्धकोष्ठता, अल्सर, आमांश, मूळव्याध, अतिसार, आंतरसूज, लठ्ठपणा, प्रदररोग, पित्त, संधिवात इत्यादी रोगांवर उपोयगी आहे. याव्यतिरिक्त इसबगोलची भुशी खाद्यपदार्थांमध्ये आईस्क्रीम, जेली अशा अनेक ठिकाणी वापरतात. इसबगोल भुशीमध्ये प्रोटिन, सेल्युलोज, स्टार्च, म्युसीलेज व तेल हे मुख्य घटक आहेत. तेलात स्टेरिक, लिग्नोसेटिक आणि पालमीटिक आम्ल हे घटक आहेत तर बियांमध्ये लिनोलिक आम्ल असते.

– विलास कदम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT