रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात अडीच हजारांची विक्रमी सरासरी गाठली आहे. पावसाळी हंगामात केवळ 60 दिवसांतच जिल्ह्यात 75 टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात पावसाने 1300 मि.मी.ची सरासरी ओलांडत केवळ 38 टक्क्यांपर्यंत मजल गाठली होती.
गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाने 1200 मि.मी. अतिरिक्त आघाडी घेतली आहे. सुमारे साडेतीन हजार मि. मी. पर्जन्यमान असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात दोन महिन्यांतच पावसाने 75 टक्के वाटचाल पूर्ण केली आहे.
जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा कोकणात दमदार आणि धमाकेदार सक्रियता दाखविली. काही भगात पावसाने अक्षरशः दाणादाण उडवली.
जुलैच्या दुसर्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील खरीप क्षेत्रात लावणी कामांचा उरक झाला. मात्र, जुलैच्या शेवटच्या पंधरावड्यात पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजवला. चिपळूण, खेेड, राजापूर आदी भागांत पूरस्थिती निर्माण झाली तर अतिवृष्टीने अनेक भागात पडझडही झाली.
रत्नागिरी तालुक्यातही नदीकाठची गावे पाण्याखाली गेली होती. तर, चिपळूण आणि खेड तालुक्यात आलेल्या पुराने आतोनात नुकसानही केले. या कालावधित खेडच्या जगबुडीने तर चिपळूणात वाशिष्ठीने रौद्ररुप धारण केले होते.
या स्थितीत अनेक भाग आपत्कालीन स्थितीत असल्याने अद्यापही मदत कार्य सुरू आहे. मात्र, काही भागात पावसाचा जोर ओसरल्याने जनजीवन पूर्वपदावऱ आले आहे.
गेले दोन दिवस मात्र, पावसाने उसंत घेतली आहे. काही भागात उघडीपही दिली. मंगळवारीही पावसाने विश्रांती घेतली होती. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 2548 मि.मी.च्या सरासरीने 23 हजार मि. मी. एकूण पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात झाला असून सर्वात कमी पावसाची नोंद दापोली तालुुक्यात झाली आहे.
ढगफुटी झालेल्या चिपळूण तालुक्यात आतापर्यंत पावसाने अडीच हजारा मि.मी.चा पल्ला गाठला आहे तर सर्वच तालुक्यात पावसाने अडीच हजाराचा टप्पा ओलांडला आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात 1303 मि.मी. च्या सरासरीने 11 हजार 732 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. गतवर्षीच्या तूलनेत जुलै महिन्या अखेरीस पावसाने जिल्ह्यात 1200 मि. मी. ची आघाडी घेतली आहे.