Latest

रत्नागिरी, गुहागरमध्ये भूस्खलन

Arun Patil

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : गेले तीन दिवस पावसाच्या सातत्याने गुहागर तालुक्यात कारुळ येथे जमिनीला तडे गेल्याने 20 घरांचे स्थलांतर करण्यात आले आहे तर रत्नागिरी तालुक्यात शिळ धरणाजवळही भूस्खलन झाल्याने येथील लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, पुढील दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात तीव्र मुसळधार पावसाचे राहणार असून 'रेड अ‍ॅलर्ट' कायम करण्यात आला आहे.दरम्यान, बुधवारी संपलेल्या 24 तासांत 89.93 मि. मी.च्या सरासरीने 808.50 मि.मी. पावसाची नोंद झाली.

महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, तो पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कोकणात गडगडाटांसह विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गेल्या 24 तासांत रत्नागिरीत हलक्या ते मध्यम सरी सुरू होत्या. मंगळवारी रात्रीपासून पावसाचे सातत्य बुधवारीही कायम होते.

आठवडा सुरू झाल्यापासून गेले तीन दिवस पावसाचे सातत्य असल्याने अनेक तालुक्यात रस्ते बाधित होऊन वाहतूक विस्कळीत झाली. दापोली तालुक्यातील तामसतीर्थ येथे सागर सावली हॉटेलनजीक रस्त्यांवर दरड कोसळली. ही दरड येथील मुख्य मार्गावर कोसळली.
त्यामुळे महावितरणाचे नुकसान झाले आहे तर या मार्गावरील रस्ताही खचला आहे.

तालुक्यात गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने नदी-नाले तुडुंब वाहत आहेत. पावसामुळे दाभोळनंतर तामसतीर्थ येथे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. पणदेरी रस्त्यावरही दरड कोसळल्याने येथील वाहतूक विस्कळीत झाली.

गुहागर येथे सुरळ आणि पालशेत येथील घरांच्या पडझडीत सुमारे 80 हजाराचे नुकसान झाले. तर कारुळ येथे जमिनीला भेगा पडल्याने येथील 20 घरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गेले तीन दिवस पडणार्‍या पावसामुळे येथील घराजवळील जमिन खचल्याने प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.

रत्नागिरी तालुक्यातही शिळ धरणाजवळ जमीन खचण्याचा प्रकार घडला असून, त्यामुळे येथील लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे. मिरजोळे येथेही जमिनीला भेगा पडल्याने येथील शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण आहे.

आगामी काळात अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने दुर्गम भागात सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत तर किनारी गावांनाही सावधगिरी बाळगण्याचे आवाहान केले आहे.

दरम्यान बुधवारी संपलेल्या 24 तासात 89.93 मि. मीच्या सरासरीने 808.50 मि.मी पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड 53.70 मिमी, दापोली 59.10 मिमी, खेड 83.90, गुहागर 75.70 मिमी, चिपळूण 97.50 मि.मी., संगमेश्वर 124.90 मिमी, रत्नागिरी 98.20 मिमी, राजापूर 84.20 मिमी,लांजा131.30 मिमी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आता पर्यंत 2132 मि.मी.च्या सरासरीने 19 हजार 191 मि. मी. एकूण पावसाची नोंद झाली आहे.

रायगड, रत्नागिरीत 'रेड अ‍ॅलर्ट' कायम

मुंबईसह कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रायगड, रत्नागिरीमध्ये पुढील दोन दिवस तीव्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने दिला असून, या दोन्ही जिल्ह्यांत 'रेड अ‍ॅलर्ट' कायम करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT