Latest

रघुवीर घाटात दरड कोसळली

Arun Patil

खेड ; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणार्‍या खेडमधील रघुवीर घाटात सहा ते सात ठिकाणी दरड कोसळल्याची बाब निदर्शनास आली असून, त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून कंदाटी खोर्‍यातील 16 गावांचा जगाशी संपर्क तुटला आहे.

एका बाजूला कोयना धरणाचा विराट जलाशय तर दुसरीकडे रघुवीर घाटात कोसळलेली दरड यामुळे या सोळा गावांत कोणाला वैद्यकीय मदतीची गरज भासली तर ती पोहोचवण्याची मोठी अडचण निर्माण होणार आहे. दरम्यान, ही घटना घडून चार दिवस उलटले तरी अद्याप या घटनेकडे राज्य सरकारने गंभीरपणे पाहिलेले नसल्याची बाब समोर येत आहे.

राज्य सरकारने तातडीने 'त्या' सोळा गावांत संपर्क प्रस्थापित करून तेथे अडकलेल्या शेकडो लोकांना मदतीचा हात तातडीने देण्याची गरज आहे. सातारा जिल्ह्याच्या नकाशात समावेश असलेल्या कांदाटी खोर्‍याचा संपर्क कोयना धरणाच्या जलसाठ्यामुळे तुटला. या खोर्‍यात 16 गावे असून संपर्कासाठी आणि दळणवळणासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील खोपी येथून सुरू होणारा रघुवीर घाट हा एकमेव मार्ग आहे.

मात्र, 22 जुलैच्या अतिवृष्टीत रघुवीर घाटाचे मोठे नुकसान झाले आहे. घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळून दगड व मातीचे ढिगारे रस्त्यावर आले आहेत.

काही ठिकाणी शंभर ते तीनशे मीटर अंतरात दरड कोसळली आहे तर काही ठिकाणी रस्त्याचाच भाग दरीत कोसळला असल्याने पुढील पंधरा ते वीस दिवस घाटातून वाहतुक सुरू होणे कठीण आहे.

कंदाटी खोर्‍यातील संपर्क तुलेल्या गावांमध्ये शिंदी, वळवण, आरव, मोरणी, परबत, म्हाळुंगे, चकदेव, उचाट, वाघावळे, लामज, निवळी, बन, अकल्पे, डोडानी, कंदाट व साळोशी या गावांचा समावेश आहे.

ही सर्व गावे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात असली तरी तेथील रहिवाशांना खेड तालुक्यातून सर्व दैनंदिन व्यवहार करावे लागतात.

कंदाटी खोर्‍यातील 16 गावांचा केवळ रत्नागिरीशी सपर्क तुटला आहे, असे नाही तर या सोळा गावांना एकमेकांसोबत जोडणारे पूल व रस्तेही अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याचे तेथील रहिवशांसोबत ज्यांचा दूरध्वनीवरून सपर्क झाला त्यांनी सांगितले आहे.

दळणवळण ठप्प असल्याने कोणी आजारी पडला अथवा सर्पदंश, विंचूदंश होऊन तातडीची वैद्यकीय मदत आवश्यक असल्यास ती न मिळाल्याने एखाद्याला प्राण गमवावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

घाटात दरड कोसळल्याने कंदाटी खोर्‍यातून कोणालाही रुग्णालयात खेडकडे आणणे शक्य नसल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

बुधवारी 27 रोजी पर्यंत केवळ एक जेसीबी यंत्राच्या सहाय्याने घाटात कोसळलेली दरड काढून मार्ग वाहतुकीस खुला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, या वेगाने पंधरा ते वीस दिवसापेक्षा जास्त काळ कंदाटी खोर्‍यासोबत संपर्क प्रस्थापित होण्यास लागू शकतात.

राज्य सरकारने तातडीने हवाई मदत घेऊन या खोर्‍यातील सोळा गावांमध्ये किमान वैद्यकीय मदत व खाद्य पदार्थ पोहोचवण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT