विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 
Latest

‘युगे अठ्ठावीस’ म्हणजे काय?

अमृता चौगुले

श्रीराम ग. पचिंद्रे : श्रीविठ्ठलाच्या आरतीत 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा' असे आपण नेहमी म्हणतो; पण ही अठ्ठावीस युगे कोणती? ती कशी मोजली जातात? याची उत्तरे शोधणे महत्त्वाचे व मनोरंजक ठरेल.

श्रीविठ्ठलाच्या आरतीत संतकवी नामदेव 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा' असे वर्णन करतात; पण युगे अठ्ठावीस म्हणजे काय? या मागे काय गणित आणि काय तर्कशास्त्र आहे? हे शब्द काही संत नामदेवांच्या कल्पनेतून किंवा निव्वळ प्रतिभेतून किंवा उगीचच आलेले नाहीत. त्यामागे कालगणनेचा एक विचार आहे. 'युग' ही खास भारतीय संकल्पना आहे.

आपण छत्रपती शिवरायांना 'युगपुरुष' असे म्हणतो. युगातून एकदा जन्माला येणारा पुरुष, तो युगपुरुष होय. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे करून युगनिर्मिती केली, असे आपण म्हणतो. भागवत पुराणात मन्वंतर आणि युग याविषयी सविस्तर सांगितलेले आहे. भारतीय किंवा अधिक बरोबर सांगायचे, तर हिंदू संकल्पनेनुसार 'मनू' ही कालगणना आहे. ती कशी झाली आणि तिला मन्वंतर का म्हणतात? तर मनू हा एक क्षत्रिय राजा होता. त्याने कालगणना सुरू केली. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळलेली मनुस्मृती मनूनेच लिहिली). मनूने सुरू केलेली कालगणना म्हणून तिला 'मन्वंतर' असे म्हणतात.

हिंदू कालगणनेचा विचार केला, तर एकूण 14 मन्वंतरे आहेत. मनू हा एकच नाही, प्रत्येक मन्वंतराचा प्रमुख एक मनू असतो. या 14 मन्वंतरांची नावे अशी आहेत – 1. स्वायंभुव, 2. अग्‍निपुत्र स्वारोचिष, 3. प्रियव्रतपुत्र उत्तम, 4. उत्तमबंधू तामस, 5. तामसबंधू रैवत, 6. चाक्षुष, 7. श्राद्धदेव वैवस्वत, 8. सावर्णी, 9. दक्षसावर्णी, 10. ब्रह्मसावर्णी, 11. धर्मसावर्णी, 12. रुद्रसावर्णी, 13. देवसावर्णी आणि 14. इंद्रसावर्णी. काही पंचांगांत देवसावर्णी आणि इंद्रसावर्णी या नावांऐवजी रौच्य आणि भौत्य अशी नावे दिलेली असतात. यापैकी ज्या मन्वंतराची सुरुवात ज्या तिथीला झाली त्या तिथीला मनवादी (मनुवादी नव्हे) तिथी म्हणतात. पंचांगात या तिथीसमोर 'मन्वादि' असा स्पष्ट उल्लेख असतो.

आता या प्रत्येक मन्वंतरात एक महायुग असते. एका महायुगात चार युगे असतात. त्या युगांची नावे – सत्य किंवा कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग असे आहेत. एक मन्वंतराचा काळ हा 30 कोटी 67 लाख 20 हजार वर्षे आहेत. या वर्षांची विभागणी युगानुसार अनुक्रमे 4:3:2:1 अशी केलेली आहे. आता विचार केला, तर असे लक्षात येईल की, सध्या 7 व्या वैवस्वत मन्वंतरातील चौथे म्हणजे कलियुग चालू आहे; गणिताच्या भाषेत सांगायचे झाले तर 4 गुणिले 7 = 28, म्हणजे हिंदू कालगणनेनुसार सध्या अठ्ठाविसावे युग सुरू आहे. वैवस्वत मनू हा या मन्वंतराचा अधिपती आहे. हीच अठ्ठावीस युगे श्रीविठ्ठल विटेवर उभा आहे, असे संत नामदेव म्हणतात. वैवस्वत मन्वंतरापासून तो उभा आहे. 4 वेद, 18 पुराणे आणि 6 शास्त्रे यांची बेरीज 28 होते; म्हणून श्रीविठ्ठल 'युगे अठ्ठावीस' उभा आहे. कारण, हे सर्व (वेद, पुराणे आणि शास्त्रे) त्याचेच गुणगान करणारी आहेत.

वैश्‍विक संदर्भात बोलायचे झाले, तर काळ हा चक्राकार असतो. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. या कालावधीबाबत मतमतांतरे आहेत. महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा 43 लाख 20 हजार मानवी वर्षे इतका आहे. चार युगांचे मिळून एक महायुग बनते. त्याचा कालावधी 12 हजार दिव्य वर्षे होतो. एक दिव्य वर्ष म्हणजे मानवाची 360 वर्षे असल्यामुळे तो कालावधी 43 लक्ष 20 हजार मानवी वर्ष इतका होतो. यालाच चतुर्युग, महायुग किंवा दिव्ययुग अशी संज्ञा आहे. अशी एकसहस्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होय. त्याला कल्प असेही म्हणतात. त्या कालावधीत एकूण चौदा मनू असतात. म्हणजेच सुमारे 71 चतुर्युगे एवढा प्रत्येक मनूचा कालखंड होतो.

त्यालाच मन्वंतर असे नाव आहे. ब्रह्मदेवाचे आयुर्मान 100 ब्राह्मवर्षे एवढे असते. त्यातील 50 ब्राह्मवर्षे संपून 51 व्या वर्षातला पहिला श्‍वेतवाराह नामक कल्प सध्या सुरू आहे. त्याच्या प्रारंभी सृष्टी पुन्हा उत्पन्‍न झाली़ तेव्हापासून आजपर्यंत सहा मन्वंतरे पूर्ण झाली असून, सध्या सातवे वैवस्वत मन्वंतर चालू आहे. वैवस्वत मन्वंतरापासून एकूण युगे विचारात घेतली, तर आताचे कलियुग हे अठ्ठाविसावे युग आहे. चार युगांचा कालावधी समान नसतो, परंतु सर्व महायुगांचा कालावधी मात्र समान असतो. दुसर्‍या कल्पनेत चौदा मन्वंतरे येतात. प्रत्येक दोन मन्वंतरांमध्ये मोठे मध्यंतर असते. प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्‍वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू (आदिपुरुष) अधिराज्य करतो. प्रत्येक मन्वंतरात 71 महायुगे येतात. प्रत्येक महायुग हे चार युगांत (कालखंडात) विभागले जाते. सध्याची ही चार युगे म्हणजे कृत, त्रेता, द्वापर आणि कली. या युगांत अनुक्रमे 4800, 3600, 2400 आणि 1200 वर्षे येतात. मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी 360 ने गुणावे लागते. यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलियुगात आहोत आणि या युगाचा प्रारंभ इ.स.पूर्व 3102 मध्ये झाला असे मानले जाते.

कृतयुग किंवा सत्ययुग हे अत्यंत रमणीय होते. देव आणि प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णू आणि श्रीलक्ष्मी या युगात पृथ्वीवर नांदत होते. तो खराखुरा स्वर्गच होता असे मानले जाते. त्रेतायुग हे मानवकाळातील दुसरे युग होते. याच युगात वामन, परशुराम आणि श्रीराम हे तीन अवतार होऊन गेले. श्रीरामाच्या देहान्तानंतर त्रेतायुगाचा अंत झाला. त्रेतायुग 12 लाख 96 हजार वर्षांचे होते. द्वापारयुग हे तिसरेे युग आहे. हे 8 लाख 64 हजार वर्षांचे होते. याच युगात भगवान श्रीकृष्णांचा अवतार होऊन गेला. महाभारत याच युगात होऊन गेले, तसेच श्रीकृष्णाच्या अवतार समाप्तीनंतर द्वापारयुग समाप्त झाले. सध्या कलियुग सुरू आहे. हे 4 लाख 32 हजार वर्षांचे आहे. त्यापैकी 5 हजार 123 वर्षे संपलेली आहेत. विष्णूचा दहावा अवतार कल्की हा पृथ्वीवर पाप वाढल्यानंतर अधर्माचा नाश करण्यासाठी जन्म घेईल, असेही विष्णू पुराण सांगते. सत्ययुगात धर्म चारी पायांवर उभा होता. त्रेतायुगात तो तीन पायांवर उभा राहिला. त्यानंतरच्या द्वापारयुगात दोन पायांवर उभा राहिला आणि कलियुगात तो एका पायावर उभा आहे, असे मानले जाते.

संदर्भ ः भागवत पुराण, विष्णू पुराण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT