किव : डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप म्हटले जाते. नुकताच याचा प्रत्यय युद्धग्रस्त युक्रेनमध्ये आला. रशियन लष्करांकडून हल्ला सुरू असतानाच युक्रेनमधील काही डॉक्टर लहान मुलाचा जीव वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते. ते सुद्धा अंधारात.
एका महिलेने या घटनेसंदर्भात व्हिडीओ शेअर करून या घटनेची माहिती दिली. तिने दिलेल्या माहितीनुसार ही घटना 24 नोव्हेंबर रोजीची आहे. या दिवशी रशियाने किववर क्षेपणास्त्र हल्ला केला. यामुळे किव येथील हार्ट इनस्टिट्यूटमधील वीज गुल झाली. नेमक्या याचवेळी या हॉस्पिटलमध्ये एक लहान मुलावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात येत होती.
ऑपरेशन करतानाच वीज गेली तरी डॉक्टरांच्या पथकाने हार मानली नाही. इमरजन्सी लाईटच्या मदतीने त्यांनी शस्त्रक्रिया पार पाडली.
एका डॉक्टरने यासंदर्भात बोलताना सांगितले की, ऑपरेशन सुरू असतानाच अचानक वीज गेली. सर्वत्र अंधार झाला. तरीही आम्ही ऑपरेशन थांबवू शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही इमरजन्सी लाईटचा वापर करून हे ऑपरेशन पूर्ण केले. या डॉक्टरने रशियावर टीकाही केली. फेब्रुवारी महिन्यापासून सुरू असलेले युद्ध संपण्याची अद्यात कोणतीच चिन्हे दिसेनात.
यातच रशियन क्षेपणास्त्रांनी युक्रेनमधील ऊर्जा पुरवठा जवळ जवळ पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. यामुळे सुमारे एक कोटी लोकांना विजेेविना अंधारात राहावे लागत आहे. याशिवाय अनेक शहरात पाण्याचीही टंचाई जाणवत आहे. रक्त गोठविणार्या थंडीचा सामना करत युक्रेनी लोक युद्धाचा सामना करत आहेत. अशा बिकट स्थितीतही तेथील डॉक्टर लोक आजारी लोकांवर उपचार करत आहेत.