मुंबई ; पुढारी डेस्क : युक्रेनमध्ये भलेही भारताचे 24 हजार विद्यार्थी अडकून पडले असतील. हजारो नागरिकही युद्धाच्या खाईत सापडले असतील. महाराष्ट्राचाही जीव आपल्या 1200 मुलांसाठी टांगणीला लागला असेल… तरीही युक्रेन आपला म्हणजे भारताचा मित्र नव्हे ! युक्रेनने सतत भारताच्या शत्रूंशीच हातमिळवणी केली आहे. त्याची ही काही उदाहरणे…
1) युनोमध्ये काश्मीरच्या मुद्यावर झालेल्या मतदानात युक्रेनने भारताच्या विरुद्ध मतदान केले होते.
2) अणुचाचणीच्या मुद्यावरही युक्रेनने भारताविरुद्ध मतदान केले.
3) युक्रेन सतत पाकिस्तानला शस्त्रे पुरवत आला आहे.
4) सुरक्षा परिषदेत भारताला कायम सदस्यत्व देण्याच्या विरोधात युक्रेन सतत मतदान करत आला आहे.
5) जगभर दहशतवादाचे थैमान निर्माण करणार्या अल कायदालाही युक्रेनचा पाठिंबा आहे.
6) युक्रेनकडे यूरेनियमचा प्रचंड साठा आहे आणि भारत ऊर्जानिर्मितीसाठी युरेनियमच्या शोधात होता. मात्र, युक्रेनने युरेनियम देण्याबद्दल साधी चर्चाही केली नाही.
आज युक्रेनमधील भारतीय आणि युक्रेनचे नागरिक यांच्याबद्दल भारताला सहानुभूती आणि काळजी नक्कीच वाटते. मात्र, आंतरराष्ट्रीय राजकारणात युक्रेन हा भारताच्या शत्रू पक्षातच असल्याने भारतानेही या युद्धात स्पष्टपणे युक्रेनची बाजू घेतली नसावी.
का एकटा पडला युक्रेन?
युद्धाचा शनिवारी तिसरा दिवस होता. अद्याप अमेरिका वा नाटोकडून युद्धात युक्रेनला थेट मदत मिळाली नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी स्वत:च एकटे पडल्याची निराशाही बोलून दाखविली. भारतात सोशल मीडियावरही, 'ऐन धुलाईच्या वेळी साथ सोडणारे मित्र केवळ शाळेत नसतात, नाटोमध्येही असतात', असा एक मेसेज याबाबत फिरतो आहे.
'बीबीसी'च्या वृत्तानुसार, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी, आम्ही युक्रेनमध्ये लष्कर पाठविणार नाही, हे आधीच स्पष्ट केले होते. युक्रेन अमेरिकेचा शेजारी नाही, की युक्रेनमध्ये अमेरिकेचे मोठे असे लष्करी तळही नाही. तेलाचा व्यवहार वगळता दोन्ही देशांत अन्य फारसे काही नाही. युक्रेनमध्ये अमेरिकन हितसंबंध फारसे नाहीतच. कोरोनामुळे सारेच आर्थिक संकटात आहेत. अगदी युरोपियन देशही त्याला अपवाद नाहीत. त्यात युक्रेनच्या बाजूने युद्धात भाग घेतला म्हणून रशियाने या देशांवर हल्ला केला तर परिस्थिती आणखी बिघडेल, असे सगळे गणित यामागे आहे.