Latest

‘या’ शहरात श्‍वास घेतल्यानेही होतो मृत्यू!

Arun Patil

सिडनी : जगाच्या पाठीवर अनेक विचित्र व धोकादायकही ठिकाणे आहेत. त्यामध्ये ऑस्ट्रेलियातील विटनूम पिलबरा नावाच्या ठिकाणाचा समावेश झालेला आहे. 'खाणींचे शहर' अशी ओळख असलेल्या याठिकाणी अनेक विषारी वायूंचे उत्सर्जन होत असते. आता तर ते इतके धोकादायक बनलेले आहे की तिथे केवळ श्‍वास घेतल्यानेच एखाद्याचा श्‍वास कायमचा थांबू शकतो. त्यामुळे याठिकाणी असलेल्या सर्व लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून हे शहर आता पूर्णपणे निर्मनुष्य व ओसाड बनले आहे.

हा संपूर्ण परिसर सरकारने 31 ऑगस्टला पूर्णपणे रिकामा केला आहे. ब्रिटनची न्यूज वेबसाईट 'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार याठिकाणी लोकांच्या जीवाला धोका असल्याने हा परिसर रिकामा केला आहे. आता हे शहर नकाशातूनही हटवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. याठिकाणी पहिली मनुष्य वस्ती सन 1943 मध्ये झाली. खाण क्षेत्र असल्याने येथे अनेक प्रकारचे विषारी वायू बाहेर पडतात. त्यामुळे हळूहळू लोकांचा मृत्यू होऊ लागला. अखेरीस ही विटनम खाण 1966 मध्ये आरोग्य समस्या व अनेकांच्या मृत्यूनंतर बंद करण्यात आली. येथील खाणकामावर पूर्ण बंदी असतानाही लोक हे ठिकाण सोडण्यास तयार नव्हते.

विटनूम क्लोजर कायद्यांतर्गत लोकांना 31 ऑगस्टपर्यंत जागा रिकामी करण्याची मुदत देण्यात आली होती. तुम्ही स्वतः हे शहर सोडावे, अन्यथा तुम्हाला जबरदस्तीने काढून टाकण्यात येईल, असा इशारा येथे देण्यात आला. त्यानंतरही लोकांनी परिसर सोडला नाही व त्याचा परिणाम असा झाला की येथे राहणारे सुमारे दोन हजार लोक या काळात मरण पावले. येथील दर दहापैकी एका माणसाचा मृत्यू झाला आहे. येथील खाणीत काम करण्यासाठी कुणीही उरलेले नाही.

2006 मध्ये ऑस्ट्रेलिया सरकारने निर्णय घेतला की टाऊनचे अधिकार विटनूमकडून काढून घेतले जातील. पुढच्या वर्षी 2007 मध्ये हे विधेयक मंजूर झाले व अखेर आता 31 ऑगस्ट रोजी या गावात राहणार्‍या शेवटच्या व्यक्‍तीनेही शहर सोडले आहे. त्यामुळे आता ही धोकादायक जागा पूर्णपणे निर्जन व ओसाड बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT