लंडन : काही काही विकार अतिशय विचित्र असतात. या विकारामुळे संबंधित व्यक्तीस शारीरिक आणि मानसिक त्रासही सहन करावा लागतो. अशा विकारांमध्ये 'पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम' (पीसीओएस) चा समावेश होतो. महिलांच्या अंडाशयाशी संबंधित हा एक विकार असून गेल्या काही वर्षांमध्ये या समस्येने ग्रस्त असलेल्या महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. या विकारामध्ये महिलांच्या शरीरात स्त्री हार्मोन्सऐवजी पुरुषांच्या हार्मोन्सचे प्रमाण वाढते. या विकाराबाबत जनजागृती करण्यासाठी अशाच विकाराने ग्रस्त असलेल्या व दाढी-मिशा असलेल्या एका महिलेने सार्वजनिक रूपात आपल्या दाढी-मिशा कापून निधी गोळा केला.
इंग्लंडच्या बकिंघमशायरमधील एलेसबरी येथे राहणार्या या महिलेचे नाव आहे अॅनेट. तिलाही 'पीसीओएस'चा त्रास असल्याने तिच्या चेहर्यावर अशी केसांची वाढ झाली आहे. हीच अडचण जगासमोर आणत तिने एका स्थानिक पबमध्ये दाढी-मिशा कापल्या आणि यामधून 2 हजार पौंडांचा निधी गोळा केला. हा निधी तिने समाजोपयोगी कार्यासाठी देऊन 'पीसीओएस'विषयी जनजागृती केली.
अनियमित मासिक पाळी, चेहर्यावर गडद रंगाचे व जाड केस येणे, चेहर्यावर काळे डाग अशा समस्यांचा सामना तिने केला. वयाच्या चौदाव्या वर्षापासून ती अशा समस्यांचा सामना करीत आहे. तिला गर्भधारणा करणेही जवळजवळ अशक्य झाले आहे. एक तर मूल न होणे किंवा गरोदरपणातील अडचणी, टाईप-2 मधुमेह, हायपरटेन्शन, कार्डियोव्हॅस्क्युलर डिसऑर्डर अशा समस्या यामधून निर्माण होतात. 'पीसीओएस' ग्रस्त महिलांमध्ये नैराश्य व अन्य मानसिक समस्याही वाढल्या आहेत.