Latest

यशोगाथा : सोलर ड्रायरमुळे पालटले दिवस! ९ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न

अमृता चौगुले

चिकू हे अत्यंत नाशवंत फळ आहे. त्यामुळे ताज्या चिकूची विक्री झाली नाही, तर शेतकर्‍यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. त्याचबरोबर उन्हात पिके वाळवताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. चिकू सोलर ड्रायरने सहज सुकवले जातात आणि विविध पदार्थ तयार करण्यासाठी ते वापरता येतात.

महाराष्ट्रातील डहाणू येथील लतिका पाटील यांचे कुटुंब वर्षांनुवर्षे चिकूची लागवड करीत होते. ते त्यांच्या चार एकर शेतात चिकूचे पीक घेत असत. त्यांच्या शेतातील चिकू जवळच्या शहरांत विक्रीसाठी जात असत. मात्र अनेकदा फळे खराब झाल्यामुळे त्यांना योग्य भाव मिळू शकत नसे. लतिका यांचे पती अच्युत पाटील यांनी 20 वर्षांपूर्वी चिकू उन्हात वाळवून त्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. त्या काळात लतिका या शाळेत शिकवत असत. त्यांना शेतीतसुद्धा रस होता; परंतु 2015 मध्ये निवृत्त झाल्यानंतरच त्यांना शेतीसाठी जास्त वेळ देता येऊ लागला. त्यानंतर त्यांनी चिकूवर वेगवेगळे प्रयोग केले. वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांना हजेरी लावल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या संकल्पनांवर काम करण्याची प्रेरणा मिळाली. यानंतर त्यांनी चिकूवरील प्रक्रियेकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. प्रक्रियेसाठी बराच वेळ आणि मेहनत खर्ची पडली; परंतु किमान पिकाची नासाडी थांबवणे त्यांना शक्य झाले आणि त्यानंतर सहा वर्षांपूर्वी त्यांच्या प्रक्रिया व्यवसायात मोठा बदल झाला.

20 वर्षांपासून त्या चिकूवर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार करत होत्या; परंतु गुणवत्तेच्या बाबतीत त्यांना फारसे यश मिळत नव्हते. सहा वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा निनाद याने त्यांना सोलर ड्रायर मशीनबद्दल सांगितले. लतिका यांना ते खूप फायदेशीर वाटले आणि त्यांनी मुलाला ते मशीन घेण्यास सांगितले. एका मशीनवर काम करून खूपच चांगला परिणाम मिळू लागल्याने त्यांनी हळूहळू आणखी मशीन्स विकत घेतल्या. आज त्यांच्याकडे 20 सोलर ड्रायर मशीन आहेत. एका मशीनची किंमत सुमारे 40 हजार रुपये आहे. आजूबाजूच्या अनेक शेतकर्‍यांनाही त्यांनी हे यंत्र दिले आहे. यासोबतच महिलांना त्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. आता गावातील इतर अनेक शेतकरी त्यांच्या शेतात चिकू सुकवून लतिका यांना इतर पदार्थ तयार करण्यासाठी देतात.

या सोलर ड्रायर मशीनमध्ये चिकूसह कांदा, केळी आणि अन्य पिकेही सुकवता येतात. त्यामुळे सुक्या भाज्या आणि फळांचा रंग आणि चव दीर्घकाळ चांगली राहते. त्यांनी ही उत्पादने देशभरात ऑनलाइन पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. तेथेही लोक त्यांची उत्पादने खरेदी करू शकतात. चिकू हे अत्यंत नाशवंत फळ आहे. त्यामुळे ताज्या चिकूची विक्री झाली नाही, तर शेतकर्‍यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. त्याचबरोबर उन्हात पिके वाळवताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. चिकू या ड्रायरने सहज सुकवले जातात आणि विविध पदार्थ तयार करण्यासाठी ते वापरता येतात.

चिकू चिप्स तयार करण्यासाठी पाटील कुटुंबीय सौरऊर्जेचाच वापर करत आहेत. त्यांच्या मते चिकू चॉकलेट्स आणि चिकूची लोणची लोकांना खूप आवडतात. सोलर ड्रायरने प्रक्रिया करण्यास प्रारंभ केल्यानंतर त्यांच्या नफ्यात सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या त्यांच्या प्रक्रिया केलेल्या उत्पादनांपासून नऊ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न त्यांना मिळते. लतिका या इतर शेतकर्‍यांनाही सोलर ड्रायर वापरण्याचा आणि पिकांवर प्रक्रिया करण्याचा सल्ला देतात. या मशीनवर सरकारने अनुदान दिल्यास अनेक शेतकर्‍यांना याचा फायदा होऊ शकतो, असे लतिका पाटील यांचे म्हणणे आहे.
– कीर्ती कदम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT