मिरज ; पुढारी वृत्तसेवा : म्हैसाळ (ता. मिरज) येथील नऊ जणांच्या सामूहिक आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी म्हैसाळमधून एक सीसीटीव्ही कॅमेरा आणि डीव्हीआर मशिन जप्त केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली असून मांत्रिकांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सावकारी कर्जाला कंटाळून वनमोरे कुटुंबातील नऊ जणांनी एकाचवेळी विषारी द्रव्य प्राशन केले होते. सावकारी कर्जातून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु ग्रामस्थांच्या सांगण्यावरून यामध्ये गुप्तधन, मांत्रिक या दिशेनेदेखील पोलिस तपास करीत आहेत. दोन मांत्रिक वनमोरे यांच्या घराकडे येत असल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार पोलिस तपास करीत आहेत. परंतु त्या मांत्रिकांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
दरम्यान, पोलिसांकडून सर्व शक्यता पडताळून पाहण्यात येत आहेत. वनमोरे कुटुंबीयांच्या घराकडे कोणकोण येत होते. त्याची चाचपणी करण्यात येत आहे. त्यासाठी नरवाड रस्त्यावर लावण्यात आलेला एका दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा आणि त्याची डीव्हीआर मशिन पोलिसांनी जप्त केली आहे.
दरम्यान, चिठ्ठीतील नावामध्ये महादेव वसंत सकपाळ या पोलिस पाटीलचे देखील नाव आहे. पोलिस पाटील सकपाळ याने देखील वनमोरे यांना पैसे दिले होते. ते पैसे मागण्यासाठी सकपाळ याने वनमोरे यांना शिवीगाळ केली असल्याचे तपासात समोर आले आहे.
संशयितांचे 'हात' वर?
डॉ. माणिक वनमोरे आणि शिक्षक पोपट वनमोरे यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठीत 25 जणांची नावे लिहिली होती. त्यापैकी 18 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी केवळ दोघांकडे वनमोरे यांना पैसे दिल्याबाबतची नोंद सापडली आहे, तर एका एस.टी. कर्मचार्यांच्या खात्यावर कर्ज काढून पैसे दिल्याचे तपासात पुढे आले आहे. मात्र, इतरांकडे पैसे दिल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांच्या हाती अद्याप तरी लागलेले नाहीत. त्यामुळे इतरांकडून स्वत:चा बचाव करण्यासाठी पैसेच दिले नसल्याचा कांगावा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.