अल्पवयीन मुलीवर अत्याचार  
Latest

मुलीवर अत्याचार करण्यासाठी नराधमांचा ‘फ्रेंड्स’ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

अमृता चौगुले

डोंबिवली पूर्व येथील 15 वर्षांच्या मुलीवर तब्बल 8 महिने सामूहिक अत्याचार करणार्‍या 33 नराधमांचे समोर आलेले कारनामे ऐकून संपूर्ण मानवतेची मान खाली झुकावी. या पिसाटांनी पीडित मुलीला ब्लॅकमेल करण्यासाठी एक 'फ्रेंड्स' नावाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला होता. वाटेल तेव्हा तिला ते बाहेर येण्यास भाग पाडत.

डोंबिवलीच्या ग्रामीण भागात राहणार्‍या एका 15 वर्षीय मुलीवर 33 नराधमांनी 8 महिने लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकारामुळेे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 27 नराधमांना बेड्या ठोकल्या असून दोन अल्पवयीन मुलांना स्थानबद्ध केले आहे. फरार असलेल्या 4 जणांचा कसून शोध घेतला जात आहे.

थरकाप उडवणारा घटनाक्रम पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबातून समोर आला आहे. डिसेंबर 2020 मध्ये तिची ओळख मुख्य आरोपी विजय फुके (21, रा. सोनारपाडा, डोंबिवली) याच्याशी झाली. त्याने ओळख वाढवून मैत्री केली. 29 जानेवारी 2021 रोजी त्याने या मुलीला घर दाखवण्याचा बहाणा करून डोंबिवली पूर्वेला एका फ्लॅटवर नेले. पांढरी पावडर मिसळलेले शीतपेय तिला दिले. ते प्यायल्यानंतर ती बेशुद्ध पडली. त्यानंतर चार जणांनी तिच्यावर अत्याचार करून मोबाईलवर चित्रीकरण केले. इथून सुरू झाले ते भयंकर छळसत्र. विजय फुके व इतर आरोपी या मुलीला धमकी देऊन घराबाहेर बोलवायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मित्रांच्या ताब्यात द्यायचे. 21 फेब्रुवारी 2021 रोजी विजय फुके याने या मुलीला धमकावून एका मित्राच्या घरी नेले. तेथे पाच ते सहा जण आधीच हजर होते. फुकेने दिलेले अमली पावडर मिसळलेले शीतपेय पिण्यास नकार दिल्यानंतर त्याने मुलीचे कपडे काढून घेतले. शीतपेय न प्यायल्यास तिला विवस्त्र स्थितीत घरी पाठवण्याची धमकी त्याने दिली. तिच्यासमोर अन्य पर्याय नव्हता. सात नराधमांनी मग तिच्यावर अत्याचार केला.

पुढील आठ महिने डोंबिवली, बदलापूर, मुरबाड आणि रबाळे परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मित्रांना बोलावून अत्याचाराचे सत्र या नराधमाने सुरू ठेवले. पीडित मुलीने त्यांचे मोबाईल क्रमांक डिलीट करून त्यांच्याशी संपर्क तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी 'फ्रेंड्स' नावाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवला आणि त्यावर अत्याचाराचे व्हिडीओ टाकून ब्लॅकमेल करण्याचा मार्ग अवलंबला. हे व्हिडीओ तुझ्या घरच्या लोकांना दाखवू आणि व्हायरल करू, अशी धमकी ते देत. अखेर तिने मामीला हा प्रकार सांगितला आणि मानपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली.

डोंबिवली अत्याचार घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा; विविध संघटनांचा आक्रोश

साकीनाका पाठोपाठ डोंबिवली येथे उघडकीस आलेल्या बलात्काराच्या घटनांमुळे शुक्रवारी पुन्हा एकदा संतप्त पडसाद उमटले. या अत्याचारींना कठोरात कठोर शिक्षा करा, जलदगतीने पिडीतांना न्याय द्या अशी मागणी करीत विविध संघटनांनी आक्रोश केला.

राज्यात रोज घडणार्‍या महिला अत्याचारांच्या घटनांमुळे महिलांमध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे समाजमन सुन्न झाल्याचा निषेध करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी संताप व्यक्त केला. या घडामोडीत विद्यार्थी भारती संघटनेनेही मानपाडा पोलिसांची भेट घेऊन दोषींवर कारवाईची मागणी केली.

महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अभाविपच्या पवार म्हणाल्या. मुंबईतील साकीनाका, पुणे, अमरावती, उल्हासनगरात घडलेल्या घटनांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. त्यामुळे राज्यभर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न एरणीवर आला आहे. राज्याची राजधानी मुंबईतच महिला सुरक्षित नाहीत. डोंबिवलीत एका अल्पवयीन 15 वर्षाच्या मुलीवर अमानुषपणे नराधमांनी 8 महिने सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आल्याने समाजमन सुन्न झाले आहे. त्यामुळे त्वरीत उच्चस्तरीय चौकशी करावी.

समुपदेशन केंद्रे उघडावीत

विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी म्हणाल्या, या घटनेने माणूसकीलाच कलंक लावला आहे. एका 15 वर्षीय मुलीवरील अत्याचार करताना 30 नराधमांना जराही शरम आली नाही. पोलिसांनी यातून घडा घेत विविध ठिकाणी काउन्सिलिंग सेंटर उभे करावते. हे अत्याचार थांबविण्यासाठी संवेदनशील तरूणांनी पुढे येणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT