मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लहान आणि कोवळ्या मुलांना आईच्या सहवासाची नितांत गरज असते. त्यांचा सर्वांगीण विकास आणि कल्याणासाठी नैसगिकरीत्या मुलाचा ताबा हा आईकडेच देणे योग्य असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन,जे, जमादार यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा देताना टीव्ही अभिनेत्याला मुलाचा ताबा देण्यास नकार दिला.
टीव्ही अभिनेता आणि अभिनेत्री असलेल्या दाम्पत्याने विभक्त होण्याचा निर्णय घेेतला. मात्र अभिनेत्याने मुलाचा ताबा आपल्यालाच मिळावा म्हणून उच्च न्यायालयात धाव घेत पत्नीने मुलाला बेकायदेशीरपणे आपल्यापासून दूर ठेवल्याचा दावा करत याचिका दाखल केली.
त्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली.यावेळी याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. स्वप्ना कोदे यांनी बाजू मांडताना दाम्पत्याने विभक्त राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर याचिकाकर्त्याने पाच वर्षांच्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी अभिनय क्षेत्राचा त्याग केला आहे, तर त्या मुलाची आई आणि याचिकाकर्त्याची विभक्त पत्नी व्यावसायिक वचनबद्धतेमुळे तसेच कामातील व्यग्रतेमुळे मुलाच्या गरजा आणि कल्याणाकडे लक्ष देऊ शकत नसल्याने मुलाचा सांभाळ करण्यासाठी वडिलांकडे त्याचा ताब्यात देण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली.
अभिनेत्रीच्या वतीने हृषिकेश मुंदरगी यांनी याला जोरदार आक्षेप घेतला. कोणतेही मूल त्याच्या आईच्या सान्निध्यातच आनंदी राहू शकत असल्याने या प्रकऱणात मुलाचा ताबा याचिकाकर्त्याकडे दिल्यास ते मुलाच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरेल, असा दाव करून मुलाचा हितासाठी त्याचा ताबा आईकडेच असायला हवा, असा दावा केला. याची खंडपीठाने गंभीर दखल घेतली.
वैवाहिक कलहामुळे या दाम्पत्यांमध्ये तीव्र वैमनस्य निर्माण झाले आहे. मात्र, मुलाच्या संगोपनाचा मापदंड हा सर्वस्वी आई-वडिलांच्या कामाचे स्वरूप आणि वेळेची उपलब्धता यावर बेतला जाऊ शकत नाही. अभिनेत्री कामात व्यग्र आहे म्हणून ती तिच्या मुलाच्या संगोपणासाठी योग्य नाही, असे मत व्यक्त केले.
तसेच प्रथमदर्शनी मुलाचे संगोपण करण्यास असमर्थ आहे, असा कोणताही पुरावे नाही. त्यामुळे मुलाचा ताबा आईकडे असल्यास ते त्यांच्या संगोपनासाठी हानिकारक असल्याचे सिद्ध होऊ शकेल, असे स्पष्ट करत खंडपीठाने मुलाचा ताबा मिळावा म्हणनू दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.
मात्र, मुलाला दोन्ही पालकांच्या प्रेम आणि आपुलकीची गरज आहे, खंडपीठाने याचिकाकर्त्याला दररोज दिवसातून अर्धा तास आणि आठवड्यातून दोनदा भेटण्याची परवानगी दिली.
मुलाचे वय पाहता त्या वयातील प्रत्येक मुलाला आईकडून मिळणारे प्रेम, माया, काळजी आणि सुरक्षा हे वडील किंवा अन्य कुठल्याही व्यक्तीकडून मिळू शकत नाही. कोवळ्या वयात मुलांना आईच्या सहवासाची गरज असते. त्यांच्या सर्वांगीण विकास आणि कल्याणासाठी नैसर्गिकरीत्या मुलांचा ताबा आईकडे असणेच योग्य असते.
तसेच दांपत्य हे अभिनय क्षेत्राशी निगडित असल्याने ज्याप्रमाणे पडद्यावर वेगवेगळ्या व्यक्तिरेखा सुंदररीत्या वठवतात. त्याचप्रमाणे वास्तविक आयुष्यातही ते आपल्या मुलाच्या सर्वोत्तम आणि सर्वांगीण विकासासाठी योग्य ती भूमिका वठवतील, अशी आशा आणि विश्वासही खंडपीठाने व्यक्त केला.