मुझको सजा दी प्यार की... 
Latest

व्यक्तिचित्र : मुझको सजा दी प्यार की…

backup backup

सचिन बनछोडे

लोकांना आवडतात म्हणून कुठलेही गाणे गाणार्‍या गायकांपैकी 'केके' नव्हता. त्याच्या प्रत्येक नव्या गाण्याची वाट पाहिली जायची व त्याबद्दल उत्सुकताही असायची. आता त्याचे नवे गाणे येणार नाही, ही हुरहुर त्याच्या प्रत्येक चाहत्याला लागून राहील. 'केके'च्या मृत्यूने आता किमान कलाकारांना जीव असतो. ही माणसंच आहेत, यंत्रमानव किंवा आधुनिक यंत्रं नाहीत, याचे भान येणे महत्त्वाचे आहे.

थेट काळजाला भिडणार्‍या गुलजार यांच्या गीतांसारखाच हृदयस्पर्शी स्वर लाभलेल्या कृष्णकुमार कुन्नथ उर्फ 'केके' या गायकाचं वयाच्या 53 व्या वर्षी अकालीच निधन झाल्यावर, त्याच्या लाखो चाहत्यांना धक्का बसणं साहजिकच होतं. त्याचं 'तडप तडप के इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी प्यार की, ऐसा क्या गुनाह किया तो लुट गएऽऽ, हाँ लुट गएऽ' हे गाणं ऐकलं आणि डोळ्यांत टचकन पाणी आलं नाही, असा माणूस विरळाच! कोलकात्यामधील आपल्या रसिक चाहत्यांना सुरांची मेजवानी देण्यासाठी आलेल्या 'केके'चा तो शेवटचाच कार्यक्रम ठरेल, असे कुणाला स्वप्नातही वाटले नसेल. मग हे का घडलं? असा आता प्रश्न निर्माण झाला आहे.

रसिक चाहत्यांवरील, कलेवरील आपल्या प्रेमामुळे विपरीत परिस्थितीशीही कलाकारांना तडजोड करावी लागते आणि ते असे त्यांच्या जीवावरही बेतू शकते, असे म्हणावे का? कलाकारांना प्रतिष्ठा असते, असे जुन्या जमान्यात ओरडून सांगण्याची वेळ आली होती तशी आता कलाकारांना जीवही असतो, हे ओरडून सांगावे लागणार आहे का? ही माणसंच आहेत, यंत्रमानव किंवा बटण दाबताच गाणं सुरू करणारी आधुनिक यंत्रं नाहीत, हे समजणे गरजेचे आहे.

कोलकात्याच्या उल्टाडांगामधील गुरुदास कॉलेजच्या नजरुल मंच या बंदिस्त सभागृहात दोन दिवस केकेच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या सभागृहाची जितकी प्रेक्षकक्षमता होती त्यापेक्षा तिप्पट अधिक प्रेक्षक आले होते, असे म्हटले जाते. सभागृहाच्या वातानुकूलन यंत्रणेतही बिघाड होता. शिवाय एका व्हिडीओमध्ये दिसते की, गर्दी हटवण्यासाठी फायर एक्सटिंग्विशरमधून फोमही सोडण्यात आला होता व लोकांची पळापळ सुरू होती. या सर्व घटनांनीच या उमद्या गायकाचा अक्षरशः गुदमरून जीव घेतला का?

पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमावेळीही 'केके' घामाघूम झाला होता. मात्र दुसर्‍या दिवशीही तशीच स्थिती होती. कोलकात्यातील भीषण उकाडा, गर्दी, सुविधांचा अभाव अशा स्थितीत जीव तोडून गाणार्‍या या गायकाच्या जीवाची पर्वा कुणी केली नसेल का? तसे कोलकाता आणि एकूणच प. बंगालमध्ये कलाकारांना मोठाच सन्मान मिळत असतो. 'साहित्यशिल्पी' म्हणजेच लेखक-कवी असोत किंवा शिल्पकार, चित्रकार, संगीतकार व गायक असोत. बंगाली लोक कला-साहित्य व कलाकारांवर मनापासून प्रेम करतात. अशा वंगभूमीत 'केके'चा हेळसांड झाल्याने मृत्यू झाला असेल, तर ते धक्कादायकच आहे.

जुन्या जमान्यात गाणं प्रतिष्ठेचं मानलं जात नसे. अशा काळात एका प्रख्यात शास्त्रीय गायिकेला गाण्याच्या कार्यक्रमांवेळी जी तुच्छतेची वागणूक मिळत असे, ती तिच्या लेकीने लहानपणापासून पाहिली होती. ही लेक पुढे स्वतः मोठी शास्त्रीय गायिका झाल्यावर तिने कार्यक्रम करीत असताना आपली कलाकार म्हणून प्रतिष्ठा काटेकोर जपली. कार्यक्रमाच्या आधी सर्व काही नीट आहे की नाही, हे पाहिल्याशिवाय त्या आपला कार्यक्रम सादर करीत नसत. प्रसंगी 'अहंकारी', 'फटकळ' अशी शेलकी विशेषणंही पत्करून त्या आपल्या भूमिकेवर ठाम राहात असत. एक कलाकार आधी माणूस असतो व त्यालाही स्वाभिमान तसेच जीवही असतो, हे समजून घ्यावे लागते. तसे समोरच्या लोकांना समजत नसेल, तर ते स्पष्टपणे समजून द्यावेच लागते.

या गोष्टीलाच हल्ली 'व्यावसायिकपणा' म्हटले जात असेल, तर तेही स्वीकारलेच पाहिजे. मानधनापासून ते कार्यक्रमाच्या सुव्यवस्थेपर्यंत सर्व काही समाधानकारक असले तरच आपली कला सादर करण्याचा या कलाकारांना हक्क आहेच. केवळ रसिकांच्या प्रेमापोटी, गळ घालून, अत्याग्रहाने त्यांच्याकडून कशाही प्रकारे कला सादर करवून घेणे हे कुणासाठीही भूषणावह नाही. सध्या काही गायक व अभिनेतेही आपले कार्यक्रम सादर करीत असताना आपल्या अटींची योग्य पूर्तता होते की नाही, हे पाहत असतात. त्याबाबत त्यांना दोष देणं हा एक प्रकारे त्यांच्यावर अन्यायच आहे. त्यांनाही काही वाईट पूर्वानुभव आलेले असू शकतात व ते टाळण्यासाठी ते अशा सुव्यवस्थेबाबत आग्रही असू शकतात, हे समजून घेतले पाहिजे. महाराष्ट्रातील काही ज्येष्ठ नाट्यकलाकारही नाटक सादर करण्यापूर्वी अशा काही गोष्टी पाहत असत. कलेच्या क्षेत्रातील अनमोल रत्नं रसिकांनीच जीवापाड जपायची असतात.

'ऊस गोड लागला म्हणून मुळासह खाऊ नये' याचेही भान ठेवणे गरजेचे असते. कोलकात्यातील कार्यक्रमावेळी असे भान राहिले होते का? हा खरा प्रश्न आहे. तसे भान असते, तर 'केके'सारख्या गुणी गायकाला आपण कायमचे मुकलो नसतो! 'केके'च्या चेहरा व डोक्यावर जखमांच्या खुणाही दिसून आल्याने पोलिसांनी त्याच्या मृत्यूची नोंद 'अनैसर्गिक मृत्यू' अशी केली. त्यामुळे त्याच्यावर हल्ला झाला होता की तो गर्दीत, धक्काबुक्कीत कोसळला होता? हॉटेलमध्ये चक्कर येऊन पडला होता की आणखी काय झाले होते? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात काहूर माजवून गेले. चाहत्यांना त्याच्या या अकाली एक्झिटने जर इतके शोकाकुल केले असेल, तर लहानपणापासूनची सोबती-सवंगडी असलेली त्याची पत्नी 'ज्योती कृष्णा' व त्याच्या 'नकुल' व 'तमारा' या दोन अपत्यांची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाही न केलेली बरी.

मल्याळी कुटुंबात जन्म घेतलेला 'केके' लहानाचा मोठा झाला तो राजधानी दिल्लीत. त्यामुळे दाक्षिणात्य भाषांबरोबरच हिंदीवरही त्याची पकड चांगली होती. सहावीत असतानाच त्याची ज्योतीशी ओळख झाली होती व पुढे तरुणवयात दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ज्योतीच्या वडिलांनी 'मुलाला नोकरी असेल तरच मुलगी देऊ', असे म्हटल्याने 'केके'ने सेल्समन म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली होती. पुढे तीन महिन्यांतच कंटाळून त्याने ही नोकरी सोडली व संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी दिल्लीतून मुंबई गाठली. चित्रपटसृष्टीत ब्रेक मिळण्यापूर्वी त्याने अकरा भाषांमध्ये तब्बल 3500 जिंगल्स गायिली होती. 'केके'ला पार्श्वगायक म्हणून पहिली संधी दिली ए. आर. रहमानने. त्याचे 'कल्लुरी साले' हे दक्षिणेतील पहिले गाणेही हिट झाले होते.

1996 मध्ये गुलजार यांच्या 'माचिस' चित्रपटातील 'छोड आए हम वो गलियाँ' या गाण्यातील काही ओळी 'केके'ने गायिल्या होत्या. मात्र त्याला हिंदीत पहिल्यांदा प्रसिद्धी मिळाली, ती 'हम दिल दे चुके सनम'च्या 'तडप तडप'नेच. या गाण्यातील आर्तता आणि सुरांचे भान अशी दुहेरी कसरत करण्याचे जे अफलातून कौशल्य त्याने दाखवले, ते पाहून सगळेच थक्क झाले. वरच्या पट्टीतील आवाज गाण्यातील दर्द व मार्दव सांभाळत कसा लावता येऊ शकतो, याचा नवा आविष्कारच त्याने घडवला होता. 'ओम शांती ओम'मधील 'आँखो में तेरी' गाण्यातील 'अजब'च्या 'अ'मधील त्याचा खर्ज आजही लख्ख आठवतो. लांबलचक ओळींमधून फिरणार्‍या ताना, हरकती घेत असताना व कुठेही कानाला त्रास न देता, 'सुकून'च देणारा त्याचा आवाज ही त्याची खासियत होती.

'गँगस्टर' मधील 'तूही मेरी शब है' हे त्याचे गाणे एकांतात बसून खिडकीबाहेरील पाऊस पाहत असताना जी गाणी ऐकावीशी वाटतात त्यापैकीच एक आहे. 'बचना ऐ हसिनो' चित्रपटातील 'खुदा जाने' गाण्यासाठी तर फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. त्याच्या 'पल'सारख्या अल्बममधील गाणीही लोकप्रियच आहेत. आपली गाणी लोकांना आवडतात म्हणून कुठलीही ढीगभर गाणी करणार्‍या गायकांपैकी 'केके' नव्हता. त्यामुळे त्याच्या प्रत्येक नव्या गाण्याची वाट पाहिली जायची व त्याबद्दल उत्सुकताही असायची. आता त्याचे नवे गाणे येणार नाही, ही हुरहुर त्याच्या प्रत्येक चाहत्याला आहेच. 'केके'च्या मृत्यूने कलेबरोबरच कलाकारांनाही जपणे किती गरजेचे आहे, याचे भान सर्वांनाच आले तर या गुणी गायकाला ती खरी श्रद्धांजली ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT