मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी संयम आणि नियम पाळून गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा ,मोर्चे त्वरित स्थगित करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
केरळमध्ये रोज 30 हजार नवे रुग्ण सापडत असून हे गांभीर्याने घेतले नाही, तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान गणेशोत्सव काळात कठोर निर्बंध लावले जाऊ शकतात, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रावर कोरोनाच्या तिसर्या लाटेचे संकट घोंगावू लागले असतानाच सरकारी पातळीवरही खबरदारीच्या उपाययोजनांसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेतली.
कोरोनाच्या तिसर्या लाटेचा धोका टाळायचा असेल, तर जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले असून शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना व जनतेला संयम व नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.
हे उघडा ते उघडा अशा मागण्यांमुळे धोका वाढला असून प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. आपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जिवाचे रक्षण करावे.
सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, आज मात्र घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काही निर्बंध नव्याने लागण्याचे स्पष्ट केले. मुंबई आणि पुणे या शहरांसह काही भागात कोरोनाचे रुग्ण परत एकदा वाढताना दिसत असून ऐन सणासुदीच्या तोंडावर होत असलेली ही रुग्णवाढ पाहता लोकांनी गर्दी टाळली पाहिजे.
काही नवे नियम तसेच निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून एक-दोन दिवसांत घेतला जाईल, विशेषतः गणेशोत्सव काळात निर्बंध कडक केले जाण्याचे संकेतही वडेट्टीवार यांनी दिले. केंद्र सरकारने महाराष्ट्र, केरळ या राज्यांना नाइट कर्फ्यू लावण्याचा विचार करण्यास सांगितले असले, तरी राज्यात नाइट कर्फ्यू लावला जाणार नाही आणि याबाबत कोणतीही चर्चा या बैठकीत झालेली नाही, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
कोरोना संक्रमणाची तिसरी लाट दारात उभी ठाकली आहे. गेल्या काही दिवसांपासून उपराजधानी नागपुरात नव्याने कोरोनाबाधित होणार्यांची संख्या दोन आकड्यापार होत आहे. कोव्हिडच्या दुसर्या लाटेची सुरुवातही अशीच झाली होती. त्यामुळे तिसरी लाट याच वेगाने पसरू नये, यासाठी नव्याने कडक निर्बंध लागू होणार असल्याचे संकेत, राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी येथे दिले. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राऊत यांनी यावेळी केले.
दरम्यान मुंबईतही गेल्या काही दिवसांपासून सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये तुडुंब गर्दी वाढली आहे. त्यात लोकलचे प्रवासीही वाढले आहेत. त्यामुळे उपराजधानीच्या धर्तीवर मुंबईतही लॉकडाऊन लागण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये याची काळजी मुंबईकरांनी घेणे गरजेचे झाले आहे.