राज्यातील 6 कोटींहून अधिक नागरिकांनी कोरोना लसीचा किमान पहिला डोस घेतला. तर, अडीच कोटींच्या घरात नागरिकांनी दुसरा डोस घेतला. मुंबई आणि पुणे ही शहरे लसीकरणात आघाडीवर आहेत. सोलापूर वगळले तर पश्चिम महाराष्ट्राचे लसीकरणातील योगदान लक्षणीय ठरले. मात्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत लसीकरणाचा टक्का घटला आहे.
कोरोना लशीचे उत्पादन वाढल्याने केंद्र सरकार राज्यांना मोठ्या प्रमाणात लशीचे डोस देत आहे. सप्टेंबर महिन्यात राज्याला 1 कोटी 70 लाख डोस मिळाले. त्यामुळे राज्यात लसीकरणाला वेग मिळाला आहे.
महाराष्ट्रात 18 वर्षावरील 9 कोटी 15 लाख नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यानुसार 18 कोटी 30 लाख डोस लागणार आहेत. केंद्राने राज्याला आतापर्यंत साडेसात कोटी डोस उपलब्ध करून दिले आहेत. तर खासगी रुग्णालयांनी 1 कोटी 10 लाख डोस दिले आहेत. त्यामुळे राज्यात 8 कोटी 60 लाख 72 हजार इतके डोस नागरिकांना मिळाले. यात कोविशिल्डचे 7 कोटी 20 लाख, कोवॅक्सिनचे 1 कोटी 5 लाख तर स्फुटनिकसह इतर 35 लाख डोसेसचा समावेश आहे. लसीकरणासाठी पात्र 65 टक्के नागरिकांना किमान पहिला डोस मिळाला. तर 45+ वयोगटातील प्रमाण 70 टक्केपेक्षा अधिक आहे.
कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत वेग वाढवा : उद्धव ठाकरे
राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे 36 लाख डोस शिल्लक आहेत. ज्या जिल्ह्यांत कमी लसीकरण झाले तेथील लसीकरणाचा वेग वाढवावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता. 22) मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य विभागाला दिल्या. लसीकरण केल्यानंतर कोरोना संसर्ग झाल्यानंतपही रोगाची तीव्रता कमी राहते. लसीकरणानंतर मृत्यू होण्याची जोखीमही घटते. त्यामुळे राज्यात केंद्राकडून जसे डोस येतील तसे तातडीने लसीकरण करून घ्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला सांगितले.