मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानात राज्यात सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसविषयी शिवसैनिकांची असलेली खदखद चव्हाट्यावर आली आहे. शिवसेना मंत्री आणि आमदारांच्या नाराजीनंतर आता स्थानिक पातळीवरही निधीवाटप आणि समित्यांमध्ये शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारींनंतर शिवसेना खासदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर तोंडसुख घेत, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू झालेला निधीवाटपाचा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
शिवसंपर्क अभियानात शिवसेना खासदार राज्यभर दौरे करून पक्षाच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या बैठका घेत आहेत. मात्र, या बैठकांमधून सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसविषयी तक्रारी आणि नाराजीचा सूर शिवसैनिकांनी लावला आहे. या तक्रारी एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यानेच शिवसेना खासदारांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळत राष्ट्रवादीवर तोंडसुख घेतले आहे. निधीवाटप आणि आम्ही स्थानिक ठिकाणी शिवसैनिकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत आता खासदार आपले अहवाल मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहेत.
काही दिवसांपूर्वी शिवसेना मंत्री आणि आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत निधीवाटपात राष्ट्रवादीकडून डावलले जात असल्याच्या तक्रारी केल्याने मुख्यमंत्र्यांनी अधिकार्यांसोबत मॅरेथॉन बैठका घेत निधीवाटपात राष्ट्रवादीने काय खेळ केला? याची माहिती घेतली आणि यापुढे कोणी काही सांगितले तरी समान निधीवाटप होईल, याकडे लक्ष देण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या. आता राज्यभरातून स्थानिक पातळीवरही शिवसैनिकांनी राष्ट्रवादीविरोधात सूर लावला असल्याने निधीवाटपाचा संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.
…काय म्हणाले शिवसेना खासदार?
अहमदनगरच्या दौर्यात खासदार गजानन कीर्तिकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना लक्ष्य केले. राज्यात महाविकास आघाडी करण्यात आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार यांचे मोलाचे योगदान आहे; पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर रोहित पवार यांनी दबाव टाकण्याचे धंदे आता बंद करावेत. शिवसेना पदाधिकार्यांनी ज्या तक्रारी केल्या आहेत, यावरून या ठिकाणी परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी आघाडीचा धर्म पाळावा; अन्यथा शिवसैनिकही बांधील राहणार नाहीत, असा इशारा खासदार कीर्तिकर यांनी रोहित पवार यांना दिला.
आघाडीचा धर्म पाळत मतदारसंघामध्ये शिवसैनिकांना आणि पदाधिकार्यांना विश्वासात घेऊन वाटचाल करावी. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये शिवसेनेला वाटा देण्यात यावा. त्याचप्रमाणे मतदारसंघामध्ये होणार्या विकासकामांमध्ये शिवसैनिकांना सहभागी करून घ्यावे, असे कीर्तिकर यांनी सांगितले आहे.
पुण्यात बोलताना शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी तर आधी भाजपने आमची ठोकली. आता आमचा मित्रपक्षच येथे आमची ठोकतोय, अशा शब्दांत खदखद व्यक्त केली. पक्षाकडून कार्यकर्त्यांना पाठबळ मिळत नाही, हे शिवसंपर्क अभियानातून समोर आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्हाला ताकद मिळाली नाही, अशा शब्दांत संजय जाधव यांनी आपला संताप व्यक्त केला.
शिवसेनेला हेतूपुरस्पर निधीवाटप आणि विविध समित्यांमध्ये डावलले जात आहे, हे मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या निकषांप्रमाणे आम्हाला आमचा शेअर द्यावा, अशी मागणीही संजय जाधव यांनी केली.
सातार्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनीही राष्ट्रवादीविरोधात संताप व्यक्त केला. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी-काँग्रेस सक्षम आहे त्या त्या ठिकाणी शिवसेनेचे राष्ट्रवादीकडून खच्चीकरण केले जात असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी होताना निधीवाटपाचे सूत्र ठरले होते. ज्या पक्षाचे पालकमंत्री असतील त्या पक्षाला 60 टक्के निधी आणि अन्य दोन पक्षांना 20-20 टक्के निधी असे सूत्र होते. मात्र, त्यामध्येही शिवसेनेला डावलले जात आहे. याविषयी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून, ही नाराजी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू, असा इशारा श्रीकांत शिंदे यांनी दिला.
संजय राऊतही संतापले!
कोल्हापूरच्या दौर्यावर गेलेले खासदार संजय राऊत हेदेखील हसन मुश्रीफ-सतेज पाटील युतीत शिवसेनेला डावलले जात असल्याने संताप व्यक्त केला. 'आमचं ठरलंय' हे चालणार नाही. कोल्हापूर महापालिकेत आता शिवसेनेच्या मदतीशिवाय महापौर होणार नाही. पडद्यामागचे राजकारण बंद करा, आमचे ठरले आहे, असे सांगत जर शिवसेनेला डावलून काही ठरवत असाल, तर खुर्च्या हलवू, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.