मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीच्या 'मल्ला'मुळेच राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला, असा आरोप करत मनसेने भाजपचे अयोध्येतील खासदार बृजभूषण सिंह आणि शरद पवार यांचा एका कुस्ती आखाड्यातील फोटो ट्विट केला आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये एका कुस्ती स्पर्धेतील हा फोटो आहे. या फोटोचा आधार घेत मनसेने राष्ट्रवादीवर भाजपशी जवळीक असल्याचा आरोप केला आहे. आज हा फोटो समोर आल्याने या कथानकामागचा निर्माता कोण हे महाराष्ट्राला आणि देशाला समजले.
अयोध्येतील ट्रॅपला महाराष्ट्रातून रसद पुरवली, असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता, त्यास या फोटोने पुष्टी दिली असे मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी हा फोटो ट्वीट करताना म्हटले आहे. दक्षिणेत एखाद्या नेत्याला असा विरोध केला गेला असता तर तेथील सर्व पक्षनेते एकत्र आले असते. दुर्दैवाने महाराष्ट्रात हे दिसत नाही असे ते म्हणतात.
तर राष्ट्रवादीने शरद पवार आणि राज ठाकरे यांचा पुण्यातील मुलाखतीच्या कार्यक्रमातील एकत्र फोटो ट्विट करत मनसेची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला आहे.
या वादावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अनेक वर्षांपासून कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आहेत. तर खासदार बृजभूषण हेसुद्धा सदस्य आहेत. मनसेने ट्विट केलेल्या फोटोचा राजकारणाशी काही संबंध लावू नये, असेही वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
बृजभूषण 5 वेळा खासदार आहेत. शरद पवार देखील खासदार आहेत. त्यामूळे कुठे ना कुठे त्यांची भेट झाली असणार. त्यामुळे फोटोवरून उगाचच चुकीचा अर्थ काढू नये असे मत राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.