Latest

मुंबई : बारा गिरण्या राज्य बँकेच्या दावणीला

Arun Patil

मुंबई; चंदन शिरवाळे : गिरणी उभारण्यास लागलेल्या विलंबामुळे कर्जाचा वाढलेला डोंगर, आधुनिकीकरणाचा अभाव, वस्त्रोद्योग व्यवसायात असलेली मंदी आणि इतर आर्थिक भारांमुळे मागील काही वर्षांपासून गिरण्यांना घरघर लागली आहे. कर्जाचे हप्ते नियमित न आल्याने थकबाकीच्या वसुलीसाठी राज्य बँकेने आतापर्यंत 12 गिरण्यांची विक्री केली असून अद्यापही 12 गिरण्या या बँकेच्या दावणीला आहेत.

भारताचा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन वगळता वर्षभर या गिरण्यांची चक्रे सुरूच असतात. सुमारे दीड लाख कर्मचारी या गिरण्यांमध्ये काम करीत आहेत. साखर कारखान्यांच्या तुलनेने ग्रामीण भागात सर्वात मोठा रोजगार उपलब्ध करणार्‍या या उद्योगाचा कणा मागील काही वर्षांपासून आर्थिक भाराने झिजू लागला आहे.

राज्यातील कापूस राज्यात वापरला जात नाही. शेजारची राज्ये महाराष्ट्रातील कापूस नेतात. इतकेच नाही तर परदेशातही येथून कापूस जातो. तेथे गिरण्या चांगल्या प्रकारे चालतात. राज्यात व्यावसायिक पद्धतीने गिरण्या चालविल्या जात नाहीत. कापूस पिकत असलेल्या भागांमध्ये सूत व कापड गिरण्यांचे प्रमाण फार कमी असले तरी पश्‍चिम महाराष्ट्रात तुलनेने जास्त आहेत. तेथील गिरण्या चांगल्या चालतात. पण व्यावसायिक द‍ृष्टिकोनाचा अभाव व इतर कारणांमुळे राज्यातील सहकारी सूत व कापड गिरण्यांवर सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा कर्जाचा हिमालय उभा आहे. गिरण्या सुरळीत चालत नसल्याने भाग भांडवलापोटी राज्य शासनाचे एक हजार 910 कोटी रुपये अडकले आहेत.

राज्यातील गिरण्या बंद पडू नयेत, याकरिता शासनाने वेळीच लक्ष केंद्रित केले पाहिजे. अन्यथा कुशल कामगार कर्नाटक, गुजरातमधील अहमदाबाद आणि सूरत या शहरांमध्ये स्थलांतरित होतील.

तसेच गिरण्यांच्या संचालकांनी अनावश्यक खर्च टाळला नाही, तर मुंबईप्रमाणे ग्रामीण भागातूनही गिरण व्यवसाय हद्दपार होईल, अशी शक्यता सहकार चळवळीतील एका नेत्याने व्यक्‍त केली. (समाप्‍त) थकबाकीपोटी राज्य बँकेच्या ताब्यात असलेल्या गिरण्या

जळगाव – नगरदेवळा (जळगाव), राहुरी- अहमदनगर, महाराष्ट्र – भुसावळ, नाशिक सहकारी – नाशिक, श्रीरामपूर- अहमदनगर, संत गाडगेबाबा – दर्यापूर (अमरावती), अकोला सहकारी- अकोला, दत्ताजीराव कदम – गडहिंग्लज, जय महाराष्ट्र – इस्लामपूर, शरद – सोलापूर, माऊली – गेवराई (बीड) योगेश्‍वरी – अंबाजोगाई (बीड).

राज्य सहकारी बँकेने थकबाकीपोटी विक्री केलेल्या गिरण्या

हेमावर्णा सहकारी सूत गिरणी – उस्मानाबाद, जालना सहकारी गिरणी – जालना, मार्कंडे – भोर (पुणे), सोलापूर विणकर – सोलापूर, यशवंत सहकारी – सोलापूर, रत्नागिरी – इन्सुली (सिंधुदुर्ग), जवाहर – लातूर, डेक्‍कन – इचलकरंजी, आगाशिव – कराड, महात्मा फुले – लातूर (उदगीर), गणेश – इचलकरंजी, शारदा यंत्रमाग – सोलापूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT