Latest

मुंबई : पोलिसाला थप्पड म्हणजेच कायदा व सुव्यवस्थेवर थप्पड

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकार्‍याला मारलेली थप्पड ही सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर मारलेली थप्पड आहे, असे निरीक्षण नोंदवत पोलिसाच्या कानशिलात मारणार्‍या आरोपीला सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश डॉ.यू.जे. मोरे यांनी चार वर्षे कारावासाची आणि 11 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

या प्रकरणातील आरोपी अनिल हनुमंत घोलप हा तब्बल अकरा वर्षांनंतर विविध गुन्ह्यांत दोषी ठरवण्यात आला असून, त्याला या दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. सायन रेल्वे स्टेशनजवळील बँकेच्या एका एटीएममध्ये 10 मार्च 2011 रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दोघांचे भांडण सुरू असताना गस्तीवरील पोलीस हवालदार कल्पेश मोकल आणि आणि पोलीस शिपाई कांबळे यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र आरोपी अनिल घोलपने उलट पेालिसांशीच हुज्जत घालत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि पोलिसाच्या कानशिलात मारली. घोलप आणि त्याचा साथीदार महेश चिन्नपाई यांच्याविरोधात सायन पोलीस ठाण्यात भादंवि कलम 353 ,332 , 323 ,504,34 अन्वेश गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यानच्या काळात एक आरोपी महेश चिन्नपाईचे निधन झाले. आरोपी घोलपच्या विरोधात अतिरिक्त न्यायाधीश डॉ. मोरे यांच्या समोर खटला चालला असता पोलिसांनी सादर केलेंले साक्षी पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने घोलपला दोषी ठरवले. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी काही महिन्यांची शिक्षा तसेच दंडाची रक्कम भरल्यास ती रक्कम तक्रारदार पोलीस हवालदार कल्पेश मोकल यांना द्यावी, असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले .

न्यायालय म्हणते

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस करतात.मात्र गेल्या काही वर्षांत 2011 ते 2015 या कालावधीत सरकारी कर्मचार्‍यांवर झालेल्या हल्ल्यांचे सुमारे 17 हजार 682 खटले दाखल आहेत. अलीकडच्या काळात दिवसेंदिवस अशा घटना वाढत आहेत, ही गंभीर बाब आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करणार्‍या पोलिसांवर होणारा हल्ला म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेवर होणारा हल्ला होय. अशा प्रकारे हल्ले करण्याची हिंमत होत असेल तर ती न्यायाची थट्टा होईल. अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून आरोपीला शिक्षा ठोठावणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT