मुंबई; पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. दोन डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना लोकल प्रवासाचे तिकीट देण्याचे निर्देश रेल्वेला देण्यात आले आहेत. हा निर्णय तत्काळ लागू झाला असून, रविवारपासून मध्य आणि पश्चिम मार्गांवर तिकीट देण्यास सुरुवातही झाली आहे.
या आधी राज्य सरकारने लोकलची तिकीट विक्री बंद करून युनिव्हर्सल पास असणार्या प्रवाशांना मासिक, त्रैमासिक, सहामाही पास देण्याचे आदेश मध्य-पश्चिम रेल्वेला दिले होते. दैनंदिन तिकीट सुविधा मात्र सुरू केली नव्हती. त्यामुळे संपूर्ण लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवास करता येत नसल्याने मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली होती. रेल्वेने ही बाब राज्य सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर राज्य सरकारने पुन्हा शनिवारी एक पत्र मध्य आणि पश्चिम रेल्वेला पाठवले.
कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे दोन डोस घेतलेल्यांना लोकलचे तिकीट द्यावे, अशी मागणी प्रवासी संघटनांनी लावून धरली होती. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकांना लोकल प्रवासात सवलत देण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार रेल्वे प्रशासनाला राज्य सरकारने पत्राद्वारे निर्देश दिले आहेत.
ज्यांची दुसरी लस घेऊन 14 दिवस पूर्ण झाले आहेत, अशा सर्व प्रवाशांसाठी सर्व प्रकारच्या तिकीटसेवा खुल्या करण्यात याव्यात. त्यात तिकीट खिडकीवर पूर्वीप्रमाणे तिकीटही उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती या पत्रात केली आहे. लोकल तसेच पॅसेंजर ट्रेनने प्रवास करण्यासाठी सर्व प्रकारची तिकीट सेवा खुली करताना जी नियमावली आखून देण्यात आली आहे त्याचेही पालन केले जावे, असे पत्रात नमूद केले आहे.
ही मुभा देताना ज्याचे संपूर्ण लसीकरण झालेले नाही, अशा व्यक्तीला लोकल प्रवासास मनाई राहील व याची खबरदारी रेल्वेने घ्यायची आहे. त्यासाठी रेल्वेने आपली संबंधित यंत्रणा राबवावी, असेही सूचित केले आहे.