Latest

मुंबई : दाऊदचा भाचा निसटला!

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मुंबई आणि ठाण्यातील 29 ठिकाणांवर एनआयएचे छापे पडण्यापूर्वीच या कारवाईची गंधवार्ता आधीच लागल्याने दाऊदची मृत बहीण हसीना पारकर हिचा मुलगा अलीशाह कुटुंबासह मुंबई सोडून दुबईत स्थायिक झाल्याचे वृत्त आहे.

एनआयए आपल्यापर्यंत पोहोचणार याचे संकेत अलीशाहला गेल्या फेब्रुवारीतच मिळाले होते. दाऊद टोळीशी संबंध असलेल्या अनेकांवर ईडीने मनीलाँड्रींगचा गुन्हा दाखल करुन चौकशी सुरू केली तेव्हा दाऊदचा भाचा अलीशाहची देखील चार तास चौकशी करण्यात आली होती. त्याला खास करून दाऊद विषयीचेच प्रश्‍न विचारले गेले होते.

2017 मध्ये इक्बाल कासकरला झालेली अटक आणि 2019 मध्ये इक्बालचा मुलगा रिझवानला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ठोकलेल्या बेड्या लक्षात ठेवून अलीशाहने या चौकशीचा रोख ओळखला असावा. आपल्याही मागे चौकशीचा फेरा लागणार हे ओळखून अलीशाह पत्नी व मुलीसह मुंबईतून निसटला.

दुबईहून तो उमराहसाठी सौदी अरेबियाला गेला. पूढे तुर्कीला जाऊन तो पुन्हा दुबईला परतला. सध्या तो दुबईमध्येच स्थायिक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आई हसीना पारकर, मामा दाऊद इब्राहिम आणि इक्बाल कासकरविरोधात गुन्हे दाखल असले तरी अलीशाहविरोधात एकाही गुन्ह्याची नोंद नाही. तरीही त्याने मुंबई सोडणे पसंत केले.

* अलीशाहने दुबईत आसरा घेतल्याने मुंबईत खंडणीराज चालवणार्‍या दाऊद टोळीला हा मोठा हादरा मानला जातो.

* दाऊदचा विश्वासू शकील शेख उर्फ छोटा शकील याचा साडू सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट आणि बांधकाम व्यावसायिक सोहेल खंडवानी यांच्यासह एकूण पाच जण सलग चौथ्या दिवशी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कार्यालयात गेले होते. एनआयएच्या अधिकार्‍यांनी रात्री उशिरापर्यंत या पाच जणांकडे कसून चौकशी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT