मुंबई; पुढारी वृत्तसेवा : देशाची आर्थिक राजधानी असलेली मायानगरी मुंबई दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असून प्रजासत्ताक दिनी मुंबईतील शिवाजीपार्क येथे दहशतवादी हवाई हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करुन शिवाजी पार्क परिसर नो फ्लाईंग झोन घोषित केला आहे. मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कायद्याच्या कलम १४४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन याबाबतचे आदेश जारी केले.
या आदेशानुसार, गुरुवारी २६ जानेवारीला शिवाजी पार्क, दादर येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या परेड समारंभावेळी दहशतवादी / समाजविरोधी घटक हवाई मार्गाचा वापर करून हल्ला करू शकतात. त्यामुळे मानवी जीवन, आरोग्य, सुरक्षितता आणि सार्वजनिक मालमत्तेला इजा होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊन सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.. तसेच या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याने मुंबईतील सर्व बारीकसारीक हालचालींवर नजर ठेवणे, महत्वाच्या, अतिसंवेदनशील ठिकाणांची तपासणी करणेही आवश्यक असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हवाई हल्ल्यासाठी अतिरेक्यांकडून ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्टचा वापर करून हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही उड्डाणक्रियांना प्रतिबंध (नो फ्लाईंग झोनचे) आदेश जारी करण्यात आले आहेत. हे आदेश २५ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून २६ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू रहाणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भादंवि कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.