मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्याचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करीत मुंबईने अन्य महानगरांना मागे टाकले.
मुंबईने लसीकरणात दिल्ली, चेन्नई, बंगळूरु या शहरांनाही मागे टाकले आहे. दिल्लीत आतापर्यंत 91 टक्के दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. 81 टक्के लसीकरण पूर्ण करुन चेन्नई तिसर्या क्रमांकावर आहे. तर, बंगळुरुत 93 टक्के लसीकरण झाले आहे. मुंबईने मात्र अठरा वर्षांवरील 100 टक्के डोस पूर्ण केले.
15 महिन्यांपूर्वी कोविड 19 विरोधातील राष्ट्रीय लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली होती. मुंबईत प्रौढ पात्र लाभार्थ्यांची संख्या 92.36 लाख एवढी आहे. या सर्व मुंबईकरांचा मंगळवारी दुसरा डोस पूर्ण झाला. 18 वर्षावरील नागरिकांचा मुंबई तील पहिल्या डोसचा टप्पा 13 नोव्हेंबर 2021 या दिवशी पूर्ण झाला होता. वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तिसरी लाट थोपवण्यात लसीकरणामुळे सर्वाधिक यश आले असल्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
मुंबईकरांनी लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने 18 वषार्ंहून अधिक वयोगटातील नागरिकांनी लसीकरणाला उत्तम प्रतिसाद दिला. आता ज्यांचा बुस्टर डोस राहिला आहे त्यांनी तो घेऊन कोविड 19 पासून सुरक्षित व्हावे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले.