Latest

मिलिंद तेलतुंबडे महिला अंगरक्षकासह ठार

Arun Patil

गडचिरोली/मुंबई/ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : शनिवारी कोरची तालुका-छत्तीसगड राज्य सीमावर्ती भागातील बोटेझरी-मर्दिनटोला परिसरातील जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड झोनचा प्रमुख जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे सह त्याचे दोन अंगरक्षक मारले गेले. यामध्ये एका महिला अंगरक्षकाचा समावेश आहे.

शनिवारी चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाले. त्यापैकी 16 नक्षल्यांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये 20 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. पोलिस आणि नक्षली यांच्यात शनिवारी तब्बल 10 तास ही चकमक सुरू होती. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांत उच्छाद मांडणारा आणि पन्नास लाखांचे बक्षीस शिरावर असलेला जहाल नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडे अखेर ठार झाल्याचे सांगितले.

शनिवारी रात्री उशिरा ठार झालेल्या नक्षल्यांचे मृतदेह गडचिरोली येथे आणण्यात आले. त्यानंतर आत्मसमर्पित नक्षल्यांच्या मदतीने मृतांची ओळख पटविण्यात आली. मृतांमध्ये नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे, कंपनी क्रमांक 4 चा कमांडर तथा विभागीय समिती सदस्य लोकेश ऊर्फ मंगू पोडयाम/मडकाम, कसनसूर दलमचा विभागीय सदस्य महेश ऊर्फ शिवाजी रावजी गोटा, कसनसूर दलमचा कमांडर सन्नू ऊर्फ कोवाची व कोरची दलम कमांडर किशन ऊर्फ जैमन (रा. दरभा एरिया छत्तीसगड) या प्रमुख नक्षल्यांचा समावेश आहे. मृतांपैकी उर्वरित 10 नक्षल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे गोयल यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.

नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक 4 व कसनसूर दलमला मोठा झटका

चकमकीत ठार झालेले बहुतांश नक्षली हे कंपनी क्रमांक 4 आणि कसनसूर दलमचे आहेत. काही दिवसांपासून मिलिंद तेलतुंबडे हा अबुझमाड परिसरात गेला होता. तेथून चकमक झालेल्या परिसरात कडेकोट बंदोबस्तात मिलिंदला सोडण्यासाठी कसनसूर व कंपनी क्रमांक 4 चे सदस्य आले होते. मात्र, त्यांना प्राणास मुकावे लागले.

पोलिसांचे भेटून कौतुक करणार

जीवाची बाजी लावून पोलिसांनी यश मिळवले आहे. सध्या पोलिस अ‍ॅलर्ट असून, परिस्थिती सर्वसामान्य आहे. सध्या चिंतेचे, भीतीचे वातावरण नाहीय. यातील जखमी पोलिसांवर योग्य उपचार करण्यात येतील. लाखो रुपयांचे बक्षीस असणारे नक्षलवादी ठार झाले आहेत. पालकमंत्री म्हणून मी बक्षिसाची रक्कम पोलिसांना देण्याबाबत चर्चा करेन, असेही ते म्हणाले.

जखमी अवस्थेतही 9 ते 10 तास नक्षल्यांशी झुंजले पोलिस

जवान जखमी होऊनही 9 ते 10 तास ही चकमक सुरू होती. पोलिसांचे पथक गस्त घालत होते. तेव्हा नक्षल्यांनी समोरून गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी जीवाची बाजी लावून प्रत्युत्तर दिले. त्यात 26 नक्षलवादी मारले गेले. त्यांच्यावर खूप बक्षिसे होती. त्यांनी अनेकांची हत्या केली होती. शनिवारची ही विशेष कारवाई होती. या कारवाईची इतर नक्षलग्रस्त राज्यांनीही दखल घेतली आहे, असे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सांगितले.

मला धमक्या देणारा मारला की नाही माहीत नाही : शिंदे

आम्हाला गडचिरोलीचा विकास करायचा आहे. त्या भागाचा विकास आम्ही डोळ्यांसमोर ठेवला आहे. जिल्ह्यात विकासकामेही सुरू झाली आहेत, असे त्यांनी सांगितले. मला धमकी देणारा यात मारला गेलाय का याचा तपास पोलिस आणि गृह विभाग करेल. अशा अनेकवेळा धमक्या आल्या आहेत. त्याला मी घाबरलो नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.

कोण होता मिलिंद तेलतुंबडे?

मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील राजूर येथील रहिवासी असलेला मिलिंद तेलतुंबडे हा सह्याद्री, जीव ऊर्फ दीपक इत्यादी टोपण नावांनी नक्षल चळवळीत ओळखला जात होता. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला मिलिंद तेलतुंबडे हा मागील 30 वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय होता. प्रतिबंधित माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा राज्य सचिव होता. त्याच्यावर राज्य पोलिसांनी 50 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तीन-चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) झोन स्थापन करण्यात मिलिंदने महत्त्वाची भूमिका पार पाडली.

या झोनचा तो सर्वोच्च नेता होता. चालू आठवड्यात राज्याचे आपत्ती निवारणमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात सुरजागड खाणीविरोधातील आंदोलनासंदर्भात टीका करणारे एक पत्र जारी झाले होते. त्यावर नक्षल्यांच्या दक्षिण झोनचा प्रवक्ता श्रीनिवास याची स्वाक्षरी होती. मात्र, पत्रातील भाषेवरून ते पत्र सह्याद्री यानेच लिहिल्याचे स्पष्ट झाले होते.

नक्षलवाद्यांविरोधात आजवरची देशातील मोठी कारवाई : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 जवानांच्या पथकासोबत झालेल्या चकमकीत जे नक्षलवादी ठार झाले, त्यामध्ये जहाल नक्षलवादी नेता आणि सेंट्रल समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे हादेखील ठार झाला आहे. त्यामुळे नक्षल्यांना मोठा हादरा बसला असून, ही राज्यातीलच नाही, तर देशातील अलीकडची सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी रविवारी केला.

या कारवाईनंतर नक्षलवाद्यांना मोठा झटका बसला असून, या कारवाईचा सूड घेण्यासाठी त्यांच्याकडून घातपात घडवून आणण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याबाबत गृहमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, पोलिस दल सतर्क आहे. सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कुठेही घातपाताची घटना घडू नये म्हणून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाईल. तसेच या चकमकीनंतर गडचिरोलीत शांतता असल्याचेही वळसे-पाटील म्हणाले.

मोठा शस्त्रसाठा जप्त

शनिवारी कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 5 एके-47, 1 यूजीबीएलसह एके-47, 9 एसएलआर, 1 इंसास, 3 थ्री नॉट थ्री रायफल्स, 9 बारा बोर पिस्तूल या शस्त्रांसह अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT