मिरज; जालिंदर हुलवान : मिरजेतील वॉन्लेस रूग्णालयाच्या मदतीसाठी शनिवारी दि. 26 जून रोजी इंग्लंडमध्ये असणार्या ऍप्टोन स्टील या क्रीडांगणावर क्रिकेटचा सामना झाला. दि. 23 ते 26 जून असे चार दिवस हा सामना चालला. भारत विरूद्ध इंग्लंडमधील कौंटी संघ लिस्टेशायर यांच्यामध्ये हा सामना झाला. ही मॅच मात्र ड्रॉ झाली. या सामन्यातून मिळणारा निधी हा युके वॉन्लेस फौंडेशनतर्फे वॉन्लेस रुग्णालयाच्या मदतीसाठी दिला जाणार आहे.
वॉन्लेस रुग्णालयाच्या नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी हा सामना होण्यासाठी पुढाकार घेतला होता. इंग्लंड येथे भारत विरूद्ध लिस्टेशायर संघामध्ये हा सामना चार दिवस रंगला. भारताचा सलामीवीर शुभमन गिल याने इंग्लंडच्या संघाकडून खेळून चांगली फलंदाजी केली. त्याने 62 धावा केल्या. भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याची गोलंदाजी चांगलीच चमकली. त्याने दोन विकेट आपल्या नावावर केल्या. गिल व इंग्लंडचा कर्णधार सॅम्यूएल या दोघांना त्याने बाद केले. प्रतिस्पर्धी हनुमा याला रवींद्र जडेजा याने 26 धावांवर बाद केले. मात्र फलंदाजी करताना रवींद्र जडेजा शुन्यावर बाद झाला. इंग्लंडच्या संघाला 290 धावांचे टार्गेट होते, ते त्यांना पूर्ण करता आले नाही. त्यामुळे हा सामना ड्रॉ झाला. भारताच्या संघामध्ये रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज यांचा समावेश होता. इंग्लंडच्या संघात भारताचे जसप्रित बुमराह, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, शुभमन गिल हे खेळले. शिवाय इंग्लंडचे एल.पी.जे कींबेर, सॅम्यूअल इवॉन्स, एवीसन, वॉकर, डेवीस, साकंडे, बॉवले हे खेळले. हा सामना बघण्यासाठी मिरजेतून 78 वर्षीय सुनालिनी कवठेकर या गेल्या होत्या.
दि. 9 जुलैरोजी मिरज वॉन्लेस हॉस्पिटलचा वर्धापनदिन इंग्लंडमध्ये साजरा करण्यात येणार आहे. या सामन्यातून आणि वर्धापनदिनातून मिळणारा निधी रुग्णालयासाठी देण्यात येणार आहे. या निधीची घोषणा सामन्याच्या संयोजकांकडून लवकरच करण्यात येणार आहे. युके फौंडेशनचे दिनकर मोरे, मायकल देवकुळे, संजय सातपुते, प्रवीण होळकर, प्रवीण अही, प्रवीण थॉमस, नितीन शिंदे, अतुल व्यंकटेश, नितीन दाभाडे यांनी याकामी पुढाकार घेतला.