मिरज; स्वप्निल पाटील : रेल्वेतून होणार्या अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी व याचा छडा लावण्यासाठी आता रेल्वे सुरक्षा दलात बेल्जियम मॅलिनॉईस प्रजातीचा 'खंड्या' नामक श्वान दाखल झाला आहे.
मिरज रेल्वेस्थानक हे मध्य रेल्वेच्या पुणे आणि सोलापूर विभागाला तर दक्षिण -पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाला जोडणारे महत्त्वाचे शेवटचे जंक्शन आहे. यापूर्वी रेल्वेतून अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रकार घडत होता. रेल्वे स्थानकात आणि रेल्वेतून होणारी अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी रेल्वेकडून मिरज रेल्वे सुरक्षा दलास अत्यंत चाणाक्ष समजल्या जाणार्या बेल्जियम मॅलिनॉईस प्रजातीचा श्वान अमली पदार्थ शोधण्यासाठी दिला आहे. खंड्या नामक हा श्वान एक वर्षाचा असून पुणे येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या के ट्रेनिंग सेंटर मधून त्याने आठ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या श्वानाकडून मिरज रेल्वे स्थानकातील सर्व फलाट, प्रतीक्षालय, सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्या या ठिकाणी अंमली पदार्थांची शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.
मिरज रेल्वे सुरक्षा दलाकडे आता बॉम्ब शोधक व अंमली पदार्थ शोधक श्वान आहेत. परंतु रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत असतात. काही वेळा दरोडे देखील पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रेल्वेतील होणार्या चोर्यावर आळा घालण्यासाठी तसेच चोरट्यांचा शोध घेण्यासाठी मिरज रेल्वे सुरक्षा दलाला ट्रॅकर श्वानाची आवश्यकता असल्याचे पथक प्रमुख सहाय्यक उपनिरीक्षक राकेश कांबळे यांनी सांगितले.
कोल्हापूर ते सातारा दरम्यानच्या स्थानकांच्या सुरक्षेची जबाबदारी मिरज रेल्वे सुरक्षा दलाची आहे. कोल्हापूर ते सातारा दरम्यान असणार्या स्थानकावर बॉम्ब सदृश्य वस्तू शोधण्यासाठी बॉम्बशोधक श्वान आहेत. आता अंमली पदार्थ शोधणारा श्वान आल्याने त्याच्यावर कोल्हापूर ते सातारा दरम्यान असणार्या स्थानकावरील अंमली पदार्थ शोधण्याची जबाबदारी आहे.