Latest

‘मास्टरब्लास्टर’ने घेतला कोल्हापुरी पाहुणचार!

Arun Patil

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : क्रिकेट खेळातील देव, मास्टरब्लास्टर, विक्रमवीर अशा अनेक बिरुदावल्या असणार्‍या सचिन तेंडुलकर यांनी कोणालाही न कळता आपल्या प्रवासादरम्यान क्रीडानगरी कोल्हापूरला रविवारी रात्री अचानक भेट दिली. कोल्हापुरातील घाटगे कुटुंबीयांच्या गडमुडशिंगी येथील फार्महाऊसवर मुक्काम करून अस्सल कोल्हापुरी मटण व तांबडा-पांढरा रश्श्याचा आस्वाद घेतला.

उद्योजक तथा क्रिकेटपटू तेज घाटगे यांनी 'फेसबुक'च्या माध्यमातून या 'ग्रेट भेटीचा' वृत्तांत छायाचित्रासह व्हायरल केल्यानंतर तमाम कोल्हापूरकरांना या भेटीची माहिती मिळाली. आपल्या लाडक्या सचिनला पाहता न आल्याने क्रिकेटप्रेमी कोल्हापूरकर मात्र चांगलेच हळहळले. तेज घाटगे यांचे बंधू गौरव घाटगे यांनी सचिन यांच्या कोल्हापूर भेटीबद्दल कमालीची गोपनीयता सचिन कोल्हापूरमध्ये येईपर्यंत
पाळली होती. एक खास पाहुणा आपल्या फार्महाऊसवर येणार आहे, अशी माहिती गौरव यांनी तेज यांना दिली होती. मात्र, रात्री दहा वाजता अचानक सचिन यांना बघून तेज घाटगे आणि कुटुंबीय अवाक् झाले.

ही धावती भेट सदैव स्मरणात राहील

आजची संध्याकाळ एक जबरदस्त सरप्राईज देणारी ठरली. माझे बंधू गौरव यांनी मला फोन करून सांगितले की, त्यांचे जवळचे आणि खूप मोठे मित्र त्यांच्या प्रवासादरम्यान कोल्हापुरात थांबणार आहेत. त्यांचा पाहुणचार करावा. त्याप्रमाणे आम्ही आमच्या शेतावर या पाहुण्यांची वाट पाहत थांबलो. जेव्हा पाहुणे आमच्याकडे पोहोचले, तेव्हा आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ज्यांना आपण अनेक वर्षे क्रिकेटच्या मैदानात बघितले, ज्यांनी आपल्या खेळाने जागतिक विक्रम केले आणि आपल्या वागण्यातून कोट्यवधी चाहत्यांना जिंकले, असे मास्टरब्लास्टर विक्रमवीर सचिन तेंडुलकर आमच्या फार्महाऊसवर आले होते. क्षणभर आम्हापैकी कोणाला विश्वास वाटला नाही; पण हे खरे होते. साक्षात सचिन तेंडुलकर यांचा पाहुणचार करायला आम्हाला मिळाला हीच खूप मोठी गोष्ट होती. त्यांची ही धावती भेट आमच्या सदैव स्मरणात राहील. अशा शब्दांत तेज घाटगे यांनी या भेटीचा वृत्तांत सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT