सांगली ः पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागात फाईलची अडवणूक, रात्री उशिरापर्यंत कारभार चालणे, जाणीवपूर्वक शिक्षकांची कामे थांबविण्यात येणे, अशा तक्रारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी डुडी यांनी सायंकाळी माध्यमिक विभागाला अचानक भेट दिली. यावेळी संपूर्ण कामकाजाची झाडाझडती घेतली. त्यामुळे विभागात खळबळ उडाली होती. शिक्षण विभागात काही कर्मचारी आणि अधिकारी जाणीवपूर्वक फाईल अडवून ठेवत आहेत. तसेच शिक्षकांची कामे मुद्दाम थांबविण्यात येत आहेत,
अशा अनेक तक्रारी मुख्य कार्यकारी डुडी यांच्याकडे शिक्षक आणि शिक्षण संघटनांकडून आल्या होत्या. त्यानुसार ही झाडाझडती घेण्यात आल्याची माहिती मिळाली. अचानक भेटीमुळे कर्मचार्यांची खळबळ उडाली होती. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड उपस्थित होते. सीईओ डुडी यांनी तपासणीवेळी शिक्षणाधिकारी यांच्या दालनात सर्व कर्मचारी, अधीक्षक, कक्षअधिकारी, विस्तार अधिकार्यांना बोलावून घेतले. प्रलंबित फाईलची माहिती घेतली. तसेच माध्यमिक शिक्षण विभागातील गैरकारभाराबद्दल वारंवार का तक्रारी येत आहेत, असा सवाल केला. फाईल थांबवल्याबद्दल त्यांनी अधिकारी आणि कर्मचार्यांना चांगलेच फैलावर घेतले. प्रलंबित फायली व इतर कामे तातडीने निकालात काढा, अशा सूचना दिल्या. तसेच पुन्हा तक्रार आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
माध्यमिक विभागातील कारभारात महिन्यात सुधारणा झाली नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डुडी यांनी दिला. तसेच फायली प्रलंबित का ठेवल्या जात आहे ? तुम्हाला शासन पगार देत असतानाही कामासाठी कुणीही गैरप्रकार करण्याची काय गरज आहे, असा सवालही त्यांनी कर्मचार्यांना यावेळी केला.