Latest

माऊली दर्शनाने वारकरी सुखावले; प्रदूषणामुळे इंद्रायणीच्या डोळ्यांत मात्र पाणी

अमृता चौगुले

आळंदी ः संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा आळंदीमध्ये उत्साहात झाला. माऊली नामाची जादू प्रत्येक माऊली भक्‍ताला आळंदीपर्यंत खेचून आणते. अलंकापुरी प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राला फार मोठा इतिहास आहे. मात्र, माऊली भक्‍तांच्या आरोग्याची चिंता ना आळंदी नगरपालिकेला आहे, ना देवस्थान समितीला, ना जिल्हा प्रशासनाला आहे. माऊलींच्या दर्शनाने वारकरी सुखावले; मात्र इंद्रायणी नदीतील अस्वच्छता आणि आळंदी शहरातील दुर्गंधीमुळे वारकरी दुखावले आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून येथे लाखो भाविक दाखल झाले आहेत. संत ज्ञानेश्‍वर महाराजांचे संजीवन समाधी मंदिर येथे आहे. मात्र, भक्‍तांसाठी पुरेशा सुविधा नसल्याचे गेल्या दोन दिवसांत अनुभवायला आले.

इंद्रायणीचे पात्र मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. नदीतील जलपर्णी काढण्याचे कष्टही पालिकेने घेतले नाही. पालिकेवर प्रशासक असले, तरी प्रशासनाच्या माध्यमातून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करता येतो; मात्र तसे चित्र दिसत नाही.

यावर्षी नदीतील पाण्याला हात लावण्याचे धाडसही झाले नाही. अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जिल्हाधिकारी, जि. प.चे सीईओ कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात. आळंदीला विशेष तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. त्यामुळे गावाला मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. त्यातून रस्ते चकाचक झाले आहेत; मात्र स्वच्छतेच्या कामासाठी एकतरी रुपया खर्च केला आहे की नाही, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा पत्ताही लागत नाही.

इंद्रायणीकाठी दोन्ही बाजूला पाणी साचून इतकी दुर्गंधी पसरली आहे की, तिथे उभे राहणेही अशक्य आहे. इंद्रायणीच्या अशा पाण्यात वारकरी आंघोळ करताहेत, हे पाहून माऊलींच्या डोळ्यांतूनही अश्रूधारा वाहिल्या असतील. या पाण्यात खरेतर शासकीय अधिकार्‍यांनी उतरून केवळ पाण्याला हात लावायचे धाडस करायला हवे होते. पुण्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी या ठिकाणी आले होते; मात्र त्यांना अस्वच्छता कशी दिसली नाही, याचे आश्‍चर्य वाटले.

आळंदीत फेरफटका मारताना कचर्‍याचे ढीग आणि तुंबलेली स्वच्छतागृहे पाहून वारकर्‍यांनी संतप्त भावना व्यक्‍त केल्या. इंद्रायणीच्या पुलावरून प्रवेश केल्यानंतर तेथील स्वच्छतागृहाची दुर्गंधी सहन करत लाखो वारकरी येथून पुढे जात होते. येथील स्वच्छतेसाठी जिल्हा प्रशासनाला वेळ का देता आला नाही? पालकमंत्री अजित पवार यांचेही या तीर्थक्षेत्राकडे लक्ष कसे गेले नाही? तालुक्यातील लोकप्रतिनिधींना आळंदी शहर स्वच्छ असावे, असे का वाटत नाही? वारकरी संवेदनशील आहे, सोशिक आहे, सहनशीलही आहे; मात्र कधीतरी तो तितकाच आक्रमक होतो. एखाद्या विषयावर आंदोलन करतो. आळंदीतील अस्वच्छतेबाबत असे आंदोलन होण्याची वेळ येऊ नये, अशी भाविकांची इच्छा आहे. असे म्हणतात की, आळंदी ते पंढरपूरदरम्यान माऊली वारीत सहभागी झालेले असतात. पंढरपूर यात्रेहून हा सोहळा एक महिन्यानी परत येतो. या काळात इंद्रायणी स्वच्छतेसाठी जिल्हा प्रशासन आणि पालिका प्रयत्न करेल का, असा सवाल केला जात आहे. इंद्रायणी स्वच्छतेच्या प्रश्‍नात उपमुख्यमंत्री पवार यांनी लक्ष घालावे, अशा भावनाही भाविकांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना व्यक्‍त केल्या.

फ्लेक्सवर खर्च झालेल्या पैशात स्वच्छता झाली असती

आळंदी ते पुणेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांचे, आजी-माजी नगरसेवक, आमदार, खासदारांनी भाविकांच्या स्वागताचे फ्लेक्स, होर्डिंग्ज लावले आहेत. ही संख्या पाहता कोटभर रुपये खर्च झाले असतील. एवढे पैसे कार्यकर्त्यांनी इंद्रायणीतील जलपर्णी काढण्यासाठी घातले असते, तर नदी नक्‍की स्वच्छ झाली असती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT