Latest

महिलांवरील हल्ल्याच्या बाबतीत ओडिशा पहिल्या क्रमांकावर

Arun Patil

कोल्हापूर ; सुनील कदम : महाराष्ट्रातील 4937 महिला 2020 मध्ये बलात्कारासह अन्य स्वरूपाच्या लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे महिलांविषयक सुरक्षेच्या द़ृष्टिकोनातून ओडिशा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान ही राज्ये सर्वाधिक धोकादायक असल्याची बाबही या अहवालातून अधोरेखित झाली आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या अहवालानुसार सन 2020 मध्ये देशात महिलांवरील हल्ल्याच्या एकूण 49 हजार 133 घटना घडलेल्या आहेत; तर महिलांच्या लैंगिक छळाच्या 17 हजार 102 घटना घडलेल्या आहेत. महिलांवरील हल्ल्याच्या सर्वाधिक घटना या ओडिशामध्ये घडल्या आहेत, तर लैंगिक छळाच्या सर्वाधिक घटना उत्तर प्रदेशात चव्हाट्यावर आलेल्या आहेत.

असे असले तरी पुरोगामी समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रातही या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. देशातील 12 राज्ये महिलांविषयक सुरक्षेच्या बाबतीत धोकादायक पातळीवर असल्याचे दिसते. या राज्यांमध्ये एका वर्षात महिलांवरील हल्ल्याच्या एक हजारहून अधिक घटना घडलेल्या दिसून येतात.

महिलांवरील हल्ल्याच्या बाबतीत ओडिशा पहिल्या क्रमांकावर असून 2020 मध्ये तिथे अशा स्वरूपाच्या 7533 घटना घडलेल्या आहेत. यानंतर अनुक्रमे राजस्थान 6898, महाराष्ट्र 4498 घटना, उत्तर प्रदेश 3836, कर्नाटक 3610 आणि मध्य प्रदेश 2884 घटना यांचा क्रम लागतो. महिलांच्या लैंगिक छळाच्या बाबतीत उत्तर प्रदेश अधिक बदनाम असून 2020 मध्ये तिथे अशा स्वरूपाच्या 3894 घटना घडलेल्या आहेत. अर्थात यानंतर महाराष्ट्र 2872, मध्य प्रदेश 1471, ओडिशा 1407 आणि आंध्र प्रदेश 1009 यांचा क्रमांक लागतो.

महिलावरील हल्ल्यांच्या आणि लैंगिक छळाच्या बहुतेक घटना या राहत्या घरी, प्रवासा दरम्यान किंवा कामाच्या ठिकाणी घडल्याचेही अहवालातून स्पष्ट झालेले आहे. केंद्रशासित प्रदेशांपैकी जम्मू-काश्मीरमध्ये महिलांवरील हल्ल्याच्या सर्वाधिक म्हणजे 1639 आणि लैंगिक छळाच्या 15 घटना घडलेल्या आहेत. राजधानी दिल्लीमध्ये महिलांवरील हल्ल्यांच्या 974 आणि लैंगिक छळाच्या 326 घटना घडल्याचे अहवालातून चव्हाट्यावर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT