पुणे ; वृत्तसंस्था : महिला टी-20 लीग (Women's T20 League) चॅलेंज स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हाज संघाने सलग तिसर्यांदा विजेतेपद मिळवून हॅट्ट्रिक साधली. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर सुपरनोव्हाज आणि व्हेलॉसिटी यांच्यातील अंतिम सामना कमालीचा चुरशीचा झाला. 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना व्हेलॉसिटीचा निम्मा संघ 64 धावांत माघारी परतला होता. सुपरनोव्हाज संघाचा विजय निश्चित मानला जात होता. पण, व्हेलॉसिटीच्या लॉरा वोलव्हार्ड आणि सिमरन बहादूर यांनी अखेरच्या षटकापर्यंत सामना नेला. पण, त्यांना विजयापासून 4 धावा दूर राहावे लागले.
नाणेफेक जिंकून व्हेलॉसिटीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रिया पुनिया, डिएंड्रा डॉटिन यांनी पहिल्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. अखेरच्या 5 षटकांत व्हेलॉसिटीने चांगले कमबॅक केले. त्यांनी पटापट विकेट घेतल्या. हरमनप्रीत 29 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 43 धावा करून बाद झाली. सुपरनोव्हाजने 7 बाद 165 धावा कुटल्या. (Women's T20 League)
प्रत्युत्तरात व्हेलॉसिटीची सुरुवात खराब झाली आणि त्यांचा निम्मा संघ 64 धावांत माघारी परतला. व्हेलॉसिटीला 6 चेंडूंत 17 धावा करायच्या होत्या. सोफी एकलेस्टनच्या पहिल्याच चेंडूवर वोलव्हार्डने खणखणीत षटकार खेचला. 2 चेंडूंत 7 धावा एवढा हा सामना चुरशीचा झाला. वोलव्हार्डला पाचव्या चेंडूवर 1 धाव करता आली. 1 चेंडूत 6 धावा हव्या असताना एकलेस्टनने सुरेख चेंडू टाकला आणि सिमरनला 1 धावेवर समाधान मानण्यास भाग पाडले. व्हेलॉसिटीला 161 धावाच करता आल्या आणि सुपरनोव्हाजने 4 धावांनी हा सामना जिंकला. वोलव्हार्ड व सिमरन यांनी 19 चेंडूंत नाबाद 44 धावांची भागीदारी केली.