कोरोनामुळे ठप्प झालेल्या भारतीय रेल्वेचा गाडा रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने रेल्वे प्रशासनाने रेल्वेचे वेळापत्रक पूर्ववत नेण्यासाठी हालचालींना प्रारंभ केला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, कोरोना काळात रेल्वे तिकिटांवर लावलेला अधिभार कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने देशातील सुमारे 1,700 गाड्यांच्या प्रवासी तिकिटांचे दर कमी होणार आहेत.
कोल्हापूर रेल्वे स्थानकातून दररोज 28 गाड्यांची ये-जा होते. यापैकी 10 गाड्यांची चाके सध्या धावत असली, तरी 14 गाड्यांचे मार्ग सध्या बंद होते. यापैकी कोल्हापूर-सातारा पॅसेंजरला मंगळवारी हिरवा झेंडा दाखविला गेला. येत्या 15 दिवसांत कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्याचे नियोजन आहे. ही गाडी सुरू झाली की, सोलापूर-कुर्डुवाडी-हैदराबाद मार्गावर धावणार्या गाड्याही पूर्ववत होतील. यामुळे रेल्वेने प्रवास करणार्या सर्वसामान्य नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
कोल्हापूर रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या प्रमुख रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. दररोज हजारो प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करीत असतात. कोरोना सुरू झाला आणि रेल्वेची गती मंदावत गेली. संसर्ग टिपेला पोहोचताच रेल्वे स्थानकाचे दरवाजेही बंद झाले. कोल्हापुरात काम करणार्या परप्रांतीय मजुरांसाठी त्या काळातही एक महिना श्रमिक एक्स्प्रेस धावत होती. परप्रांतीयांना आपल्या गावात सुखरूप पोहोचविण्यासाठी रेल्वेने योगदान दिले. त्यानंतर मात्र दीर्घकाळ रेल्वे बंद राहिली. सध्या कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस, कोल्हापूर-धनबाद, कोल्हापूर-दिल्ली या मार्गांसह ये-जा करणार्या 10 गाड्या सुरू आहेत. उर्वरित गाड्या सुरू करण्यासाठी नियोजन करण्यात येते आहे. कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात राहिली, तर महिनाअखेरपर्यंत रेल्वेचे काम पूर्ववत सुरू होईल.
कोरोना काळात धावणार्या रेल्वेंतील प्रवाशांची कमी संख्या आणि रेल्वेला येणारा एकूण खर्च यांचा हिशेब घालत केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने प्रवासी भाड्यामध्ये वाढ केली होती. या गाड्यांना 'विशेष रेल्वे'चा दर्जा देण्यात आला होता. अशा 1,700 गाड्यांवरील आता 'विशेष रेल्वे' हा दर्जा काढून टाकण्यात येईल. त्यामुळे आकारण्यात येणारे अधिभाराचे शुल्कही कमी होईल. याखेरीज रेल्वेमधील भोजन, स्टेशनवरील तिकीट विक्री आणि स्वस्त प्लॅटफॉर्म तिकीट या सुविधाही लवकरच सुरू करण्यात येत आहेत.
कोरोना काळात भारतीय रेल्वेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मोठा आर्थिक फटका बसूनही रेल्वे बोगीज् कोरोना रुग्णांच्या उपचाराच्या यंत्रणेत सहभागी झाल्या होत्या. हा तोटा दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वेचा कारभार पूर्ववत केव्हा होतो, याकडे प्रवाशांबरोबरच प्रशासनाचेही लक्ष लागून राहिले होते. भारतात कोरोना स्थिती दिलासादायक वळणावर आल्यानंतर मात्र आता रेल्वेला समाधानकारक दिवस दिसताहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या 118 कोटींवर पोहोचली आहे. गेल्या आर्थिक वर्षात हीच संख्या 6 कोटी 99 लाखांवर होती. या काळात रेल्वेचा महसूल 1,258 कोटी रुपयांवर होता. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत हा महसूल 15 हजार 434 कोटींवर पोहोचला आहे.