निपाणी, मधुकर पाटील : श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथे महाराष्ट्र-कर्नाटकसह गोवा व आंध्र प्रदेशातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुवारी पहाटे नाथांची मुख्य भाकणूक झाली. वाघापूरचे प्रमुख मानकरी भगवान डोणे (महाराज) यांच्या उपस्थितीत त्यांचे पुत्र सिद्धार्थ डोणे महाराज यांनी नाथांच्या साक्षीने भाकणूक कथन केली.
गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे या यात्रेला मर्यादा आल्या होत्या. मात्र, यंदा यात्रा मोठ्या प्रमाणात भरली असून भाविकांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. शुक्रवार या यात्रेचा मुख्य दिवस असल्याने भाविकांनी दिवसभर नैवेद्य व श्रीफळ अर्पण करून आशीर्वाद घेतला. शनिवारी (दि.15) उत्सवस्थळी बसलेली पालखी सायंकाळी उठल्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे.
नाथांच्या भाकणुकीतून यंदा नवीन भविष्यवाणी कथन करताना सिद्धार्थ डोणे महाराज म्हणाले, महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प येईल, दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येऊन नंदनवन होईल. जाती-धर्म बिघडून जात वैरत्व वाढेल व हाणामार्या होतील. भारत-पाक सीमेवर रण धुमेल, यामध्ये मराठा सैनिक छातीची ढाल करून लढतील व पाकिस्तानचा चौथाही (कोना) भाग भारताच्या कब्जात येईल आणि भारत मातेचा जयजयकार होईल. सोयाबीन कडधान्य उदंड पिकेल, मेंढीचा भाव एक लाखाच्या घरात जाईल. देशात समान नागरी कायदा येईल.
आगामी वर्षाचा दिवस आनंदात दावीन, सोयाबीन कडधान्य उदंड पिकेल, दीड महिन्याचे पीक येईल, जगातील तापमानात उच्चांकी वाढ होऊन, जंगलांना आग लागून वन्यजीव व औषधी वनस्पती नष्ट होतील. वस्त्रोद्योग अडचणीत येईल, सुताचा दलाल दिवाळं काढील. गोरगरीब जनता आनंदात व सुखी राहील, ऋतुमानात बदल होईल. बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेल. काँग्रेस पक्षात फूट पडेल. राजकारणात भगवा फडकेल, चीनचा भारतावर हल्ला होईल, असे सांगत नाथांनी धोक्याचा इशारा देत नाथांनी काहीअंशी भक्तांना दिलासाही दिला.
नैसर्गिक आपत्तीत बदल होईल
कर्नाटकातील जलाशयाला भगदाड पडून चौथाई हिस्सा जलमय होईल. देशात जाती-धर्मात तेढ निर्माण होईल. कडधान्य उदंड पिकेल. देशातील पाऊसमान, पीक पाणी, व्यापारातील तेजी-मंदी, नैसर्गिक, आपत्तीमध्ये बदल होईल. जगाचं म्होरलं भविष्य कठीण बनत चाललंय. मेघयान माळा, आकाशाच्या फळा, मेघराजा उदंड हाय. कोल्हापूरचे राजघराणे क्षत्रीय वंशाचे आहे. भोंबेच्या पुणवेला माझा सोहळा निघतोय. वाडी-कुर्लीतील खडकाच्या माळाला फार वर्षांपूर्वी आसन टाकलंय. वाडी – कुर्लीच्या खडकावर फार वर्षांपूर्वी निशाण रोवलंय. माझी विटंबना कराल तर मातीत मिसळून जाल.
कुरली-आप्पाचीवाडी तीर्थक्षेत्र प्रतिशिर्डी होईल
पिवळ्या भस्माचा महिमा वाढत चाललाय. तिरूपती बालाजीचा येथे अवतार आहे. कुर्ली-आप्पाचीवाडी तीर्थक्षेत्र प्रति शिर्डी होईल. वाडी कुर्लीच्या आगारात नाथांचा दरबार भरलाय. हालसिद्धनाथांचा त्रिभुवनाथ जयजयकार चाललाय. वाडी – कुर्लीच्या सबिन्यात फूट पाडशीला तर यमपुरीला जाशीला. धर्माच्या गादीला रामराम करा. पिंजर्यातला राघू भाषण करंल. पहिला मोगरा धोपून जाईल, दुसरा मोगरा मध्यम राहील, उड्डाण मारल. तीनवा मोगरा राज्य करंल. तुम्ही बघाल. अश्विनी, भरणी, कात्या, कृतिका, रोहिणी, मृगाच्या बणी, सरती रोहिणी निघता मिरग. मिरवल, मिरवल कुरी कोकण भागात मिरवल.
रोहिणीची पेरणी हातक्याची पुरवणी
रोहिणीची पेरणी त्याला हातग्याची पुरवणी होईल. देवयान धान्य मध्यम पिकेल. राजयान धान्य उदंड पिकेल… खळ्याच्या काठी तीन मापटी म्हणता शेरावर येईल. शेर म्हणता मापट्या-चिपट्यावर येईल. खरीप बोरीप बहूत उदंड पिकेल. तांबडी रास मध्यम राहील. काळी रास सुफळ जाईल. पांढरी रास उदंड पिकेल. तांबडी कळी मध्यम पिकेल, ताजव्यातून विकेल. धान्य दारात वैरण कोन्यात होईल. वैरण सोन्याची होईल, सांभाळून रावा, सूर्य-चंद्राची टक्कर होऊन पृथ्वी गडप होईल.
निपाणी भागात अतिरेकी गोंधळ घालतील, जाळपोळ होईल सीमाप्रश्न राज्यकर्त्यांच्या चर्चेत राहील. सीमाभागात मोठा गोंधळ माजेल. निपाणी भागात अतिरेकी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालतील. होईल, होईल जाळपोळ होईल. दुधाच्या भांड्याने आणि उसाच्या कांड्याने गावोगावी, राज्या-राज्यांत, राजकारणाला कलाटणी मिळेल. राजकीय लोक सत्तेसाठी भांडून खेळतील. गायी-म्हशींचा भाव वाढत राहून गगनाला भिडेल. उसाचा भाव वाढत राहील. नदीकाठची जमीन ओसाड पडेल. बारा वर्षांची मुलगी आई होईल. नीतिमत्तेचा खेळ बिघडत चाललाय. उगवत्या सूर्यालाही संकट पडलंय.
मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल
सरकी फुकाची, मेंढी मोलाची होईल. मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल. मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद आहे. मेंढीपासून वेगळी पैदास निर्माण होईल. मेंढी सोन्यापेक्षा पिवळी होईल. आलम दुनियेचा चौथा कोना ओसाड पडेल. बैलाची किंमत बकर्याला येईल. बकर्याची किंमत कोंबड्याला येईल. कोंबडा मनुष्याच्या पाठी लागेल. मांसाहारापासून मनुष्याला रोग वाढत राहील.
सूर्य-चंद्राची टक्कर होईल
सूर्य-चंद्राची टक्कर होईल, पृथ्वीचा करार संपत आलाय, नदीबाईजवळ सत्पण आहे. वीजबाईचा मोठा कल्लाटा होईल. डोंगर, पर्वत वाफेने जातील. समुद्राची संपत्तीनाश पावेल. स्मगलर लोकांची हत्या होतील. भावाला बहीण तर सासर्याला सून ओळखेना. शेषाच्या फडीवर धरतीमाता डळमळू लागली आहे. पृथ्वीचा करार संपत आलाय. एक तारणारा कळप मारणार. दिवसाआड दिवस पाप वाढत चाललंय. पाण्याचा कप विकत मिळंल. पाळी लागंल. मनुष्याला अठरा तर्हेचा आजार होईल. डॉक्टर लोक हात टेकतील. लाकूड सोन्याचं होईल. ताजव्यातून विकल.
महागाईचा भस्मासुर सुटेल
शहराची वस्ती विरळ होईल, महागाईचा भस्मासुर सुटेल. गोरगरिबांना जगणे मुश्कील होईल. बॉम्बस्फोट होतील. वादळं, भूकंपामुळे समुद्र व देशाची उलथापालथ होईल. संपत्ती नाश पावेल. कृष्णेच्या काठावर नऊ लाख हजार बांगड्या फुटतील. रक्ताचे पाट वाहतील. दिल्लीच्या गादीला धक्का बसेल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद पडेल. मुस्लिम राष्ट्रे उद्ध्वस्त होतील. 10 सें. मी. कापड घालणारा मनुष्य देशात जन्माला येईल. शहराला लागून असलेली शहरे खेड्याप्रमाणे होतील. बारा कोसाला एक दिवा पेटंल. उसासाठी राज्या-राज्यांत आणि देशात मोठी आंदोलने होतील.
वांग्याच्या झाडाला शिडी लावशीला
तंबाखूची पेंडी मध्यम पिकेल. तंबाखूचा भाव गगनाला भिडेल. कळपातला बकरा कळपात लढेल. माईचे लेकरू माईला ओळखणार नाही. गायीचे वासरू गायीला भेटणार नाही. वांग्याच्या झाडाला शिडी लावशिला. चालता-बोलता मनुष्याचा प्राण जाईल. माझं, माझं म्हणू नका. हे भ्रांतीच ओझं आहे. घरातील लक्ष्मी दडून बसेल. रानातील लक्ष्मी पळून खेळेल. कोकणचा बसव्या, देशाचा बसव्या सरहद्दीवर येतील. दोघांची देशाच्या सरहद्दीवर टक्कर होईल.
राजकारणात भगवा फडकेल
जग दुनियेत तीन राजे आहेत, पहिला राजा मेघराजा, दोनवा बसव्या राजा, तीनवा कुणबी राजा. कुणब्याच्या बाळाला माझा आशीर्वाद हाय. पाऊस-पाऊस, पाणी-पाणी म्हणून कालवा करशीला. मेघराजाने पाप धुवून जाईल. मेघराजाची वाट बघशीला. उन्हाळ्याचा पावसाळा व पावसाळ्याचा उन्हाळा होईल. शिवाजी महाराजांचा जयजयकार करावा. शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्माला येतील.
भगवा झेंडा राज्य करेल.दिल्लीच्या गादीला धक्का बसेल. नऊखंड पृथ्वी, 10 वा खंड काशी आणि 10 व्या काशीत माझा दरबार हाय. करवीर काशी माझं ठिकाण हाय. कोल्हापूरच्या गादीवर इंगाळ पेटतील. कोल्हापूरच्या देवीला संकट पडलंय. रात्री बाराच्या सुमारास तिच्या नेत्रातून पाणी पडतंय. परमेश्वर त्याचा न्याय निवाडा करेल.
स्वतःच्या फायद्यासाठी काहीजण जाती धर्मातील तेढ निर्माण करतील त्याची तीव्रता इतकी वाढेल की यामुळे देशात खून, जातीय दंगली होऊन हाणामार्या घडतील.
गर्वाने वागशीला फसून जाशीला
सातारच्या गादीवर फुले पडतील. गोसाव्याची पांढर हाय. गोसाव्यांच्या पांढरीत तुम्ही एकीने वागावे, गर्वाने वागू नये. गर्वाने वागशीला तर फसून जाशीला. गर्वाचे घर खाली हाय. मी थोर, तू थोर म्हणू नका. करशीला सेवा
तर खाशीला मेवा, अशाप्रकारे डोणे महाराजांनी भाकणूक कथन केली.
नाथांच्या भाकणुकीची सत्यता
यापूर्वी नाथांनी चीनचा भारतावर हल्ला होईल, असे सांगितले होते. त्यानुसार गेल्या दोन वर्षांत कोरोनासारखी जैविक महामारी असो अथवा भूप्रदेश बळकावण्याचा वाद उकरून काढत चीन भारतासोबत युद्धाची भाषा आजही करतच आहे. यामध्ये चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरात महामारी आली. यामध्ये 2020 मध्ये नाथांनी आपल्या भाकणुकीत कोरोनाला पायात घेऊन गाडप करीन, असे सांगितले होते. अर्थात, सद्यस्थितीत कोरोनाचा कहर कमी झाला असून, नागरिकांत असणारी या आजाराविषयीची दहशत व भीती नाहीशी झाली असल्याने नाथांच्या भाकणुकीतील सत्यता भक्तांना केवळ वर्षभरातच अनुभवावयास मिळाली आहे.
चौथाई पाकिस्तान भारतात…
भारत-पाक सीमारेषेवर नेहमीप्रमाणे युद्ध होत राहिले तरी, येथून पुढील काळात त्याची तीव्रता वाढून पाकिस्तानचा चौथाई भाग भारत काबीज करेल, असेही नाथांनी यावेळी भाकीत करून भक्तांना दिलासा देत सैनिकांना प्रोत्साहित केले.
कोरोनानंतर उत्साह अगाध…
गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे नाथांची भाकणूक, यात्रा याला मर्यादा आल्या; परंतु या सर्वांची कसर यंदाच्या यात्रेने भरून काढली. यात्रेच्या सुरुवातीला दोन दिवस ढगफुटीसद़ृश पाऊस पडला असला तरी, या यात्रेचा उत्साह काय कमी झाला नाही हे उपस्थित भाविकांच्या उपस्थितीतून दिसून आले.