जोहान्सबर्ग; वृत्तसंस्था : ब्रिटनच्या ताब्यात असलेला भारतीय 'कोहिनूर' हिरा भारताला परत करावा, या भारतीयांच्या एकमुखी मागणीपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतील जनतेलाही 'त्यांचा कोहिनूर' परत हवा आहे. ब्रिटनकडे असलेल्या मूळ दक्षिण आफ्रिकेतील या हिर्याचे नाव 'ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका' असून, हा हिरा 500 कॅरेटचा आहे. तो परत मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत ऑनलाईन याचिकेवर या क्षणापर्यंत 6 हजारांवर नागरिकांनी सह्या केल्या आहेत.
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचे निधन झाल्यानंतर तत्कालीन ब्रिटिश साम्राज्याने राजवटीखालील इतर देशांमधून बळकावलेले हिरे परत करण्याची मागणी जोर धरत आहे. 'ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका' हा हिरा 'कुलीनन' म्हणूनही प्रसिद्ध आहे. तो 1905 साली दक्षिण आफ्रिकेत उत्खननात सापडलेल्या एका दागिन्यातून वेगळा करण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेतील ब्रिटिश राजवटीने हा हिरा ब्रिटिश राजघराण्याच्या ताब्यात दिला होता. दक्षिण आफ्रिकेचा ग्रेट स्टार हिरा परवापरवापर्यंत महाराणीच्या शाही राजदंडाची शोभा वाढवत होता.