महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर-मेढा या मुख्य रस्त्यावर माचूतर गावानजीक चक्क धो धो पावसात रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू होते. हे काम सोमवारी सकाळी स्थानिक जागरूक नागरिकांनी थांबवले.
महाबळेश्वरसह तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. अशातच सार्वजनिक बांधकाम उपविभाग जावलीच्या वतीने धामणेर ता. कोरेगाव ते महाबळेश्वर या 72 कि.मी. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्याआधी हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न ठेकेदार करत होता. सोमवारी पहाटेपासूनच संबंधित ठेकेदाराने माचुतरनजीक रस्ता डांबरीकरणाचे काम मुसळधार पावसातही सुरूच ठेवले होते. अनेक कर्मचारी धो-धो बरसणार्या पावसात डांबरीकरणाचे काम करत होते. या परिसरातून ये जा करणार्या नागरिकांमधून भर पावसात सुरू असलेल्या या कामाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत होता. अनेकांनी कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले. काही जागरूक नागरिकांनी संबंधित ठेकेदाराच्या मुकादमावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यानंतर हे काम बंद करण्यात आले.