ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : ठाणे जिल्ह्यातील महापालिकांच्या निवडणुकीसाठी आघाडी करण्यावरून महाविकास आघाडीतील दोन मंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा रंगला होता. आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांनी महाविकास आघाडीची इच्छा व्यक्त केली आहे. शिंदे यांनी देखील आघाडीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने महाविकास आघाडीचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.
भाजपला रोखण्यासाठी आघाडीची गरज असल्याचे यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडी असल्याने स्थानिक पातळीवर आघाडी व्हावी, अशी भूमिका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती. तर, शिवसेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शिंदे यांच्या मनामध्ये नक्की काय आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यातच शनिवारी ठाण्यातील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या शिंदे आणि आव्हाड यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली.
महाविकास आघाडीचा निर्णय घेण्यासाठी आव्हाड यांच्या निवासस्थानी शनिवारी राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व अध्यक्षांची बैठक झाली. यावेळी ठाणे शहर-जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष दशरथ तिवरे, कल्याण-डोंबिवलीचे अध्यक्ष जगन्नाथअप्पा शिंदे, कल्याण-डोंबिवलीचे कार्याध्यक्ष वंडारशेठ पाटील, नवी मुंबई अध्यक्ष अशोक गावडे, उल्हासनगर अध्यक्ष पंचम कलानी, मीरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, अंबरनाथचे अध्यक्ष सदामामा पाटील उपस्थित होते. यापुढे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या विरोधात कोणीही बोलू नये, असे आपापसात ठरले असल्याचे त्यांनी
सांगितले.
महापौर नरेश म्हस्के यांनीही दिले आघाडीचे संकेत
* लोकमान्य नगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी देखील आघाडीचे संकेत दिले . एकनाथ शिंदे यांनी क्लस्टरसाठी योजना मार्गी लावली आहे.दोन वर्षे सरकारमध्ये आहोत. आघाडीत आहोत की नाही हे कधी पहिले नाही, असे म्हस्के म्हणाले.
समोरुन जरी कोणी बोलले तरी प्रत्युत्तर द्यायलाच हवे, असे नाही. आपला प्रमुख प्रतिस्पर्धी हा भाजप आहे. भाजप या शहरात, जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात वाढू द्यायची नसेल तर महाविकास आघाडी आवश्यक आहे. त्यासाठीच सर्व जिल्हाध्यक्षांनी महाविकास आघाडी करण्याबाबत आपले मत नोंदविले आहे.
– जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री