महाड-तळीये गावात दरड कोसळून ४९ जणांचा मृत्यू  
Latest

महाड-तळीये गावात दरड कोसळून ४९ जणांचा मृत्यू

रणजित गायकवाड

महाड-पोलादपूर; श्रीकृष्ण द बाळ/समीर बुटाला : महाड तालुक्यातील तळीये गावात गुरुवारी कोसळलेल्या दरडीमध्ये 49 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर पोलादपूर येथील पडलेल्या दरडीमध्ये 11 असा एकूण 60 जणांचा बळी गेला आहे. पोलादपूर येथील किरकोळ जखमींना महाड, पोलादपूर, माणगाव आणि एमजीएम येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

सकाळी सुरु झालेले बचाव कार्य सायंकाळी सहा वाजता थांबवण्यात आले आहे.

बचाव पथक, पोलिस यंत्रणा आणि डॉक्टर्स यांनी बचाव कार्य संपले असल्याचे सांगितले आहे, ढिगऱ्या खाली कोणी अडकले आहे का याची खात्री पुन्हा एकदा करण्यासाठी शनिवारी बचाव कार्य हाती घेण्यात येणार अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

तळीये गाव दरड प्रवण गावामध्ये नव्हते, जी गावे आहेत त्या गावातील नागरिकांना आधीच सर्तकतेच्या सुचना दिल्या होत्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीने रायगड जिल्ह्याला चांगलेच झाेडपले आहे. अतिवृष्टीने आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका हा महाड तालुक्याला बसला आहे.

गुरुवारी महाड आणि पाेलादपूर तालुक्यात दरडी पडण्याच्या घटना घडल्या. महाड तालुक्यातील तळीये या गावात गुरुवारी सांयकाळी चार वाजण्याचा सुमारास दरड कोसळली होती.

याची माहिती प्रशासना सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानंतर बचाव कार्य हाती घेण्यात आले.

परंतू पावसाचा जोर, पुराचे पाणी, मार्गात दरडी पडल्याने घटनास्थळी पोचण्यात अडचणी येत होत्या. पाचाड मार्गेही दरड कोसळली होती. त्यामुळे अडथळा निर्माण झाला होता.

रात्री हेलीकॉप्टरच्या सहायाने घटास्थळी बचाव पथकाला उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अतिवृष्टीमुळे ते शक्य झाले नाही.

त्यानंतर शु्क्रवारी सकाळी 11 वाजता मदत आणि बचाव कार्याला सुरुवात झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत 38 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात बचाव पथकाला यश आले.

त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता 49 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता खात्री झाल्यावर बचाव कार्य थांबवण्यात आले.

दरम्यान, पोलादपूर येथील केवनाळे येथे चार घरांवर दरड कोसळली. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुतारवाडी येथेही दरड पडल्याने पाच असा एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

दोन्ही गावातील 13 जखमींना महाड पोलादपूर, माणगाव आणि एमजीएम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एनडीआरएफ, एसडीआरएफ, नौदाल, कोस्टगार्ड यांची प्रत्येकी दाेन पथक तर स्थानिक पातळीवरील 12 बचाव पथकांचा रेस्क्यू ऑपरेशनमध्ये समावेश होता.

घटनास्थळी पालकमंत्री आदिती तटकरे, विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, भाजपा नेते गिरीश महाजन, स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी भेट दिली.

तब्बल 22 तासांनी मदत मिळाल्याने दरेकरांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

गुरुवारी सायंकाळी दरड कोसळली आणि मदत शुक्रवारी सुरु करण्यात आली. या कालावधीत प्रशासन का पोचले नाही असा सवाल दरेकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विचारला.

यावेळी त्यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या समोरच अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत नाराजी व्यक्त केली.

पुराचे पाणी आणि मार्गावर पडलेल्या दरडीमुळे घटनास्थळी पोचण्यात उशिर झाला. पाचाड मार्गे जाण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे ही दरडी पडल्याने रस्ता बंद होता.

असे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितेल, मात्र प्रशासनाने ठरवले असते तर चालत सुध्दा येथे पोचता आले असते. असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

जिल्हा प्रशासनाने बचावासाठी लागणारे साहित्य, अन्न पाकीटे, पाणी यांची व्यवस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT