नवी दिल्ली , पुढारी वृत्तसेवा : महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने 4 मे रोजी रेपो दरात 0.40 टक्के वाढ केली. याचा परिणाम म्हणून देशातील 17 बँकांनी त्यांची गृहकर्जे महाग केली आहेत. तर केवळ 11 बँकांनी ठेवींच्या दरात वाढ केली आहे. यामध्येही बँकांनी प्रामुख्याने कर्ज दरात 0.50 ते 0.90 टक्के वाढ केली आहे. तर मुदत ठेवींचे दर केवळ 0.10 ते 0.35 टक्क्यांनी वाढले आहेत.
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने गृहकर्ज दरात 0.40 टक्के वाढ केली आहे. परंतु, मुदत ठेवींच्या दरात 0.20 टक्के वाढ केली आहे. खासगी बँकांमध्ये हा फरक अधिक आहे. गृहकर्जांमध्ये अॅक्सिस बँक 0.95 टक्के, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँक 0.90 टक्के आणि एचडीएफसीने 0.85 टक्के वाढ केली आहे. तर या बँकांनी फिक्स डिपॉझिटच्या दरात केवळ 0.15 टक्के किंवा
0.20 टक्के वाढ केली आहे.
एक वर्ष ते 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज दर 4.40 ते 5.60 च्या पातळीवर स्थिर आहेत. बहुतेक ठिकाणी मार्चच्या तुलनेत 10-25 बेसिस पॉईंटस्ची वाढ झाली आहे.