Latest

मला जसे तडफडत मरावे लागते आहे, तशीच शिक्षा ‘त्याला’ ही द्या

Arun Patil

रांची ; वृत्तसंस्था : 'मला जिवंत जाळून मृत्यूपूर्वी जशा यातना शाहरुख हुसैन याने दिल्या, तशाच यातना त्यालाही व्हाव्यात, अशी शिक्षा त्याला द्यावी. मी मरणार आहे, हे मला ठाऊक आहे; पण तोही जिवंत राहायला नको', अशी मागणी मृत्यूपूर्वी एका रेकॉर्डेड जबाबातून अंकिता सिंह हिने सांगितल्याचे मंगळवारी समोर आले आहे.

अंकिताने आपली संपूर्ण व्यथा कॅमेर्‍यासमोर सांगितली. शाहरुख हुसैन याने तिला पेट्रोल टाकून जाळण्याच्या पहाटेपूर्वी रात्री 10 वाजता तिने वडिलांना शाहरुखच्या धमकीबद्दल सांगितले होते. सकाळी बघू, असे वडील म्हणाले होते. पण सकाळ होण्यापूर्वीच शाहरुखने अंकिताला पेटवून दिले. पहाटे चारच्या सुमारास शाहरुखने खिडकीतून पेट्रोल टाकून तिला पेटवले. शाहरुखसोबत छोटू नावाचा आणखी एक मुलगा होता.

एकतर्फी प्रेमाला नकार दिल्याने झारखंडमधील दुमका येथे 23 ऑगस्ट रोजी शाहरुख याने हे घृणास्पद कृत्य केले. पाच दिवस अंकिताने मृत्यूशी झुंज दिली. अखेर तिचा मृत्यू झाला. शाहरुख दोन वर्षांपासून अंकिताचा छळ करत होता. अंकिताने तिच्या वडिलांकडे तक्रारही केली होती. मात्र, बदनामीच्या भीतीने त्यांनी पुढचे पाऊल उचलले नाही. नंतर शाहरुख जास्तच त्रास देऊ लागल्यावर ते पोलिसांत गेले. पण, शाहरुखच्या मोठ्या भावाने माफी मागितल्याने तक्रार मागे घेतली. गेल्या 15 दिवसांपासून शाहरुख अंकिताला पुन्हा छळू लागला.

शाहरुख हुसैन याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शाहरुखला न्यायालयात हजर केले तेव्हा तो निर्लज्जपणे हसत हसतच छायाचित्रकारांना सामोरा गेला.

अंकिता सिंहच्या मृत्यूनंतर केवळ दुमकाच नाही तर रांची, गिरीडीहसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही निदर्शने झाली. दुमका येथे बजरंग दल, भाजपसह अनेक सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. त्याचवेळी रांचीतील फिरायालाल चौक आणि मोराबादीतील बापू वाटिकासमोरही सामाजिक संघटनांनी निदर्शने केली. माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी अंकिताच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
अंकिताच्या कुटुंबाला मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 10 लाख आणि राज्यपालांनी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

नईम खानलाही अटक

अंकिता हत्याकांडातील दुसरा आरोपी छोटू ऊर्फ नईम खान यालाही पोलिसांनी अटक केली आहे. दुमकाचे पोलिस अधीक्षक अंबर लकरा यांनी ही माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT