पुणे : पुढारी वृत्तसेवा
मराठा आरक्षण : मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका आतापर्यंत सामंजस्याची आहे. दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो. पण, आपल्याला ते करायचे नाही.
ही लढाई संयमानेच लढली जाईल, अशी भूमिका मराठा आरक्षण लढ्याचे नेते खा. संभाजीराजे यांनी सोमवारी मांडली.
मराठा आरक्षणाबाबत केंद्र आणि राज्य सरकार जबाबदारी ढकलत असून इतर मागण्यांबाबतही गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे यापुढे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा लढा पुन्हा सुरू करण्यात येईल.
त्याची सुरुवात नांदेड येथून मूक आंदोलनाने करण्याचा निर्णय पुणे येथे सोमवारी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत झालेल्या चर्चेची आणि झालेल्या निर्णयाची माहिती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी आंदोलनामागील भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, औरंगाबाद येथे दि. 19 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी बैठकही घेण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्ह्याच्या वतीने राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये खासदार संभाजीराजे यांच्यासह राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर, विकास पासलकर, धनंजय जाधव, रघुनाथ चित्रे पाटील, सचिन आडेकर, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन फोलाने, प्राची दुधाने, दीपाली पाडाळे, सारिका जगताप, पूजा झोळे, गणेश मापारी, युवराज दिसले, बाळासाहेब आमराळे, जितेंद्र कोंढरे यांच्यासह 175 तालुक्यांतील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.
कोंढरे म्हणाले की, मराठा आरक्षणासह मराठा समाजाच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही.
त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत शासनाने नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यामध्ये 20 ऑगस्ट रोजी मूक आंदोलन करण्यात येणार आहे.
तसेच, 19 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे राज्यव्यापी बैठकही होणार असून, तेथे आंदोलनाची पुढील भूमिका ठरवली जाणार आहे.
त्या दिवशी समाजकार्य सोडून देईन…
चहा प्यायला म्हणजे विषय संपला, असे होत नाही. अजित पवार कोल्हापूरला घरी जाऊन भेटले. त्या वेळी अनेक जणांच्या महाराज मॅनेज झाले वगैरे चर्चा सुरू झाल्या.
पण, ज्या दिवशी मॅनेज होईन, त्या दिवशी घरी बसेन. समाजकार्य सोडून देईन. छत्रपती असे मॅनेज होणार नाहीत.
माझ्यावर विश्वास ठेवा, अशा शब्दांमध्ये संभाजीराजेंनी टीका करणार्यांना सुनावले.
आता जीआर काढून दाखवा
सामाजिक मागासपण सिद्ध केल्याशिवाय तुम्ही आरक्षणात काहीही करू शकणार नाही.
ज्या लोकांना समाजाबद्दल काही माहिती आहे, असेच लोक सदस्य पाहिजेत. माझी बाजू मांडण्याची भूमिका मी घेत आहे. आरक्षण अनेक दिवस चालेल.
पण आपल्या मागण्यांचे काय? आता सरकारने वसतिगृहाबाबत जीआर काढून दाखवावा. आता दोन महिने झालेत, असेही संभाजीराजे म्हणाले.
आझाद मैदानावर उपोषणाची तयारी
मराठा आरक्षणासाठी आता थेट मुंबईतील आझाद मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषण करण्याची घोषणा संभाजीराजेंनी केली.
माझी एकट्याची आझाद मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषणास बसण्याची तयारी आहे.
आतापर्यंत तुम्ही सर्वांनी आंदोलने केली आहेत. तुम्हीच ठरवा आणि सांगा, असे ते म्हणाले.
नीरज चोप्राचा सत्कार करणार
मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याचा सत्कार करण्याचा ठराव मांडण्यात आला.
हरियाणास्थित मराठा समाजात जन्मलेल्या नीरज चोप्रा याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अभिनंदनाचे फलक बैठकीत लावण्यात आले होते.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य सरकारने नीरज चोप्रा याचा सत्कार करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रात त्याचा जाहीर सत्कारही करण्यात येणार असून, खासदार संभाजीराजे नीरजच्या घरी जाऊन त्याचा सन्मान करणार आहेत.
त्याचबरोबर हॉकी संघाचा उपकर्णधार सुरेंद्रसिंग याच्यासह सर्व पदकविजेत्यांचाही सन्मान करण्याचे संभाजीराजे यांनी जाहीर केले.
संभाजीराजेंच्या समोरच समन्वयकांचा गोंधळ…
मराठा क्रांती मोर्चाच्या या बैठकीत संभाजीराजे बोलायला उभे राहिल्यावर त्यांच्यासमोरच समन्वयकांचा गोंधळ पाहायला मिळाला.
बोलू न दिल्याचा आरोप करीत औरंगाबादेतील एका समन्वयकाने गोंधळ घातला.
संभाजीराजे यांनी सगळ्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आल्याचे सांगत, त्या समन्वयकांची समजूत काढून वातावरण शांत केले.