नवी मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर येथे मंगळवारी झालेल्या ओबीसी मेळाव्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन 'काही महाराज आमच्या आरक्षणातून आरक्षण मागत आहेत. मात्र आमच्यातील काही मिळणार नाही. अन्यथा धनगरांची काठी घेऊ, असे आक्षेपार्ह विधान मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांचे नाव न घेता टीका केल्याने संतापाची लाट उसळली आहे.
दोन दिवसांत गुन्हा दाखल करून वडेट्टीवारांना अटक करा अन्यथा राज्यभर आंदोलन करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक अंकुश कदम यांनी बुधवारी दिला.
नवी मुंबईत वाशी पोलीसांना निवेदन देताना कदम यांनी वडेट्टीवारांच्या भाषणाची क्लिपदेखील सादर केली. वडेट्टीवारांच्या आक्षेपार्ह विधानामुळे मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
मंगळवारी 31 ऑगस्ट रोजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोलापूर येथे ओबीसी मेळाव्यात भाषण करताना खासदार श्री संभाजीराजे भोसले यांना उद्देशुन काठी चालविण्याची धमकी दिली असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक होऊ शकते. तर मग मंत्री विजय वडेट्टीवार यांना अटक करणार की नाही? या प्रकरणाची येत्या दोन दिवसात राज्य सरकारने दखल घेतली नाही, तर मुंबईत मातोश्रीसमोर आणि राज्यभरात सर्वत्र आंदोलन केले जाईल, असे अंकुश कदम यांनी पुढारीला सांगितले.
हे आंदोलन करावे लागल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक अंकुश कदम, बाळासाहेब शिंदे, मयूर धुमाळ,विनायक जाधव,शुभम पाटील,संकेत निवडुंगे,सुरेश सावंत व इतर पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.