वॉशिंग्टन : मंगळावर एके काळी वाहते पाणी होते हे सिद्ध झालेले आहे. या पाण्याचा माग काढण्यासाठी तसेच त्याच्या अनुषंगाने एके काळी तिथे जीवसृष्टीचे अस्तित्व होते का हे पाहण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात.
मंगळभूमीवर निळसर रंगाचे लाखो गोलाकार दगड आहेत. त्यांना संशोधक 'ब्लूबेरी' म्हणून संबोधतात. या 'ब्लूबेरी' म्हणजेच 'ब्लूबेरी' फळाची आठवण करून देणार्या दगडांमध्ये तेथील पाण्याचे संकेत लपलेले असू शकतात असे संशोधकांना वाटते.
या दगडांपैकी अनेकांचा व्यास 2.5 मिलीमीटरचा आहे. या तांबड्या ग्रहावरील हे चिमुकले निळे खडक संशोधकांचे लक्ष वेधून घेणारे आहेत. 2004 मध्ये त्यांची छायाचित्रे 'नासा'ला मिळाली होती व त्यावेळेपासूनच त्यांना 'ब्लूबेरी' हे नाव पडले आहे. वास्तवात ही रसाळ फळे नसून ती 'हेमॅटाईट' आहेत. आयर्न (लोह) आणि ऑक्सिजनपासून बनलेले हे एक खनिज संयुग आहे. पृथ्वीवरील अशाच काही खनिजांचा संशोधकांनी अभ्यास केला आहे.
त्यावरून त्यांना हे दिसून आले की अशी खनिजे याच स्थितीत सुरुवातीपासून नसतील. मंगळावर ब्लूबेरी दगडही आधी हायड्रोहेमॅटाईट असू शकतात. त्यांच्यामध्ये पाण्याचा सूक्ष्म अंश असू शकतो. तसे असेल तर हे दगड म्हणजे मंगळावरील पाण्याचा एकप्रकारे साठाही ठरू शकतो. त्यामुळे मंगळावर एके काळी पाणी होते याचा आणखी एक पुरावा मिळू शकतो.