‘भेटेन माहेरा आपुलिया’ 
Latest

‘भेटेन माहेरा आपुलिया’

backup backup

खरं तर स्त्रियांना वारीत सहभागी होताना खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं. पण विठू माऊलीच्या भेटीची ओढ असते, त्यामुळे त्यांना या अडचणींचं काहीच वाटत नाही. एरवी घराचा उंबरा न ओलांडणार्‍या महिला वारीत मात्र 'मी जाणारच' असे म्हणत सामील होतात. कुठून मिळते ही ताकद, ही ऊर्जा? या विठ्ठल भेटीला आतुर झालेल्या भगिनींसाठी ही वारीची वाट सुकर केली, ती 'स्त्री'संतांनी..!

ज्येष्ठाचं मेघमंडल आकाशात जमायला लागलं की, अवघ्या महाराष्ट्राला वारीचे वेध लागायला लागतात. माऊलीचं प्रस्थान जवळ यायला लागलं की, आवराआवरीला गती येते. ज्याच्या घरी वारीचा कुळाचार आहे, ते तर वारी चुकवत नाहीतच. पण हल्ली 'एक तरी वारी अनुभवावी' असं म्हणत सगळ्या थरातून माणसं सामील होत आहेत. यात स्त्रियांचा वाढता सहभाग फार उल्लेखनीय बाब आहे. स्त्री संसारात जास्त गुरफटलेली असते, असा समज आहे. म्हणूनच स्त्रीचं वारीला जाणं म्हणजे 'आवा चालली पंढरपुरा। वेशीपासून फिरे माघारा॥' असं असतं, असे म्हणतात. याचा अर्थ, स्त्री अजूनही पारंपरिक व्यवस्थेतच गुंतलेली आहे. पण मग जेव्हा वारीचं प्रस्थान जवळ यायला लागतं तेव्हा स्त्रिया संसाराचे मोहपाश ठामपणे बाजूला सारून वारीला जायची तयारी करायला लागतात.

खरं तर स्त्रियांना वारीत सहभागी होताना खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं. पण विठू माऊलीच्या भेटीची ओढ असते, त्यामुळे त्यांना या अडचणींचं काहीच वाटत नाही. एरवी घराचा उंबरा न ओलांडणार्‍या महिला वारीत मात्र 'मी जाणारच' असे म्हणत सामील होतात. कुठून मिळते ही ताकद, ही ऊर्जा? वर्षभराच्या संसार-तापात पोळून निघाल्यावर त्यांना माहेराची ओढ लागलेली असते. 'जाईन गे माये तया पंढरपुरा। भेटेन माहेरा आपुलिया॥' असा निश्चय करून विठू माऊलीच्या भेटीसाठी आतुर झालेल्या असतात. त्यांची ही विठू माऊलीसुद्धा त्यांना भेटण्यासाठी तितकीच आतुर झालेली असते. या विठ्ठल भेटीला आतुर झालेल्या भगिनींसाठी ही वारीची वाट सुकर केली, ती 'स्त्री' संतांनी…!

भागवत धर्माच्या स्थापनेपूर्वी समाजात जातिभेद होते. स्त्रिया आणि शूद्रादिकांना वेदपठणाचे, ज्ञान ग्रहण करण्याचे अधिकार नव्हते. तेव्हा समतेचे तत्त्व स्वीकारत भागवत धर्माची पताका फडकली. त्यानं समाजातील सर्व लोकांना ज्ञानाची कवाडं खुली केली. 'सर्वांना आहे येथ अधिकार' असं सांगत भगव्या पताकेखाली सकल वैष्णव एकत्र आले. इथं स्त्रियांनीसुद्धा फार अलौकिक कामगिरी केली आहे. 'मुक्ताबाई', 'जनाबाई', 'सोयराबाई', 'निर्मळा', 'कान्होपात्रा', 'बहिणाबाई'… अशा अनेक संत स्त्रियांची आध्यात्मिक कामगिरी फार उच्च पातळीवरची आहे. या सगळ्याजणी खूप वेगवेगळ्या थरातून आलेल्या होत्या; पण त्यांचं ध्येय, जीवितकार्य एकच होतं. 'काया वाचा मन रंगले चरणी। धरियेला मनी पांडुरंग॥'

ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण असणारी 'मुक्ता' आध्यात्मिक क्षेत्रात फार उंचीवर होती. आई-वडिलांविना ही पोरकी भावंडं एकमेकांच्या आधाराने जीवितार्थ चालवीत होती. काही प्रसंगात प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांची शांती ढळली, तिथं मुक्ताबाईंनी सावरलं. तिनं 'आई' होऊन भावंडांचा सांभाळ केला. दीर्घायुष्य लाभलेल्या चांगदेवांचा अहंकार मोडून काढला. चांगदेवांनी मुक्ताबाईला आपले गुरू केले. अशी ही मुक्ताबाई लहान वयात आध्यात्मिक क्षेत्रात फार वरच्या पातळीवर होती. मुक्ताबाईप्रमाणे 'जनाबाईं'चा अधिकारही फार मोठा आहे. तिने आपल्या भक्तिपाशात प्रत्यक्ष परमात्म्याला बद्ध केलं. मोठमोठ्या तपस्वी, ज्ञानी माणसांना न सापडणारा परमात्मा तिला सहज प्राप्त झाला. जनाबाई मराठवाड्यातल्या गंगाखेड इथली. देवाच्या द़ृष्टांतामुळे तिला तिच्या आई-वडिलांनी ती लहान असताना पंढरपूरला नामदेवांच्या घरी सोडलं. त्यामुळे तिच्यावर लहानपणापासून नामदेवांच्या भजन-कीर्तन-प्रवचनाचे संस्कार झाले. ती त्यांच्या घरी घरकाम करत असे.

आई-वडिलांचे प्रेम तिनं विठ्ठलाच्या ठिकाणी पाहिलं. ती विठ्ठलाला आर्ततेने विनवीत असे. तिची व्याकुळता विठ्ठलाला कळाली. तो तिच्या हाकेला धावून येऊ लागला. तिला न्हाऊमाखू लागला. प्रत्येक कामात मदत करू लागला. 'झाडलोट करी जनी। केर भरी चक्रपाणी॥'
जनीनं विश्वव्यापी देवाला आपल्या हृदयात बंदिवान करून ठेवलं. जनाबाईने भक्तिव्यतिरिक्त काही केलं नाही. तिचं कर्मसुद्धा भक्तिमय होतं. तिचं विठ्ठलप्रेम इतकं उच्च दर्जाचं होतं की, विठ्ठलाच्या दर्शनाला येणार्‍या भक्तांची चरणधूळ सतत आपल्या मस्तकी पडावी म्हणून नामदेव महाराजांबरोबर त्यांच्या घरातील चौदा जणांसह तिने पंढरपूरला विठ्ठल मंदिराच्या पायरीजवळ समाधी घेतली.

'चोखामेळा' शूद्र जातीत जन्माला आला. धर्मग्रंथ न वाचताही त्याने उत्कट भक्तीने परमेश्वराला प्राप्त केले. त्या चोखामेळ्याची पत्नी 'सोयराबाई' आणि बहीण 'निर्मळा' याही विठ्ठल भक्तीमुळे संतपदाला पोहोचल्या. त्यांची उपलब्ध अभंग रचना फार थोडी आहे. पण जी आहे, ती अत्यंत उत्कट आहे. त्यांनाही विठ्ठलाने अनेकदा अडचणीत मदत केली आहे. 'अवघा रंग एक झाला। रंगी रंगला श्रीरंग॥' हा एकच अभंग सोयराबाईचं आध्यात्मिक कार्य सिद्ध करतो. त्यांच्या घरी भोजनासाठी सार्‍या देवीदेवता आल्या होत्या. त्यांची हेटाळणी करणार्‍या लोकांना हे द़ृश्य पाहून उपरती झाली. त्यांनी चोखोबा-सोयराबाई-निर्मळा यांचा अधिकार मान्य केला.

असंच काहीसं 'कान्होपात्रा'च्या बाबतीत घडलं. कान्होपात्रा ही मंगळवेढ्याच्या श्यामा गणिकेची मुलगी. अतिशय सुंदर होती. गोड गळा लाभला होता. बिदरच्या बादशहाला तिच्याविषयी लोभ उत्पन्न झाला. तिचे मन विठ्ठलामध्ये गुंतले होते. लहान असताना पंढरपूरला जाणारी दिंडी तिनं पाहिली आणि तिच्या मनात विठ्ठलाविषयी ओढ निर्माण झाली. विठ्ठलाच्या भेटीसाठी तिची तळमळ होऊ लागली. बिदरच्या बादशहाने तिला जबरदस्तीने मिळवण्याचे ठरवल्यावर ती पंढरपूरला आली. तिनं विठ्ठलाचा आर्त धावा केला. 'नको देवराया अंत आता पाहू। प्राण हा सर्वथा जाऊ पाहे॥' असं म्हणत त्याच्या चरणावर आपले प्राण अर्पण केले. पंढरपूरला विठ्ठल मंदिरातच तिची समाधी आहे. या समाधीवर दगडातून एक झाड उगवलं आहे. त्याला 'तरटीचं झाड' असं म्हणतात. ते झाड कित्येक शतकं तिथं उभं आहे. पृथ्वीच्या पाठीवर हे एक आणि मंगळवेढ्याला तिच्या जन्मभूमीत एक, अशी दोनच या प्रकारची झाडं आहेत. वनस्पतिशास्त्रात हे एक आश्चर्य समजलं जातं. कान्होपात्राचे अभंग थोडेच आहेत; पण ते अतिशय आर्त आणि व्याकूळ आहेत. संत परंपरेत तिच्या निस्सीम भक्ती-भावनेला आणि करुणार्ततेला तोड नाही.

'स्त्री'संत परंपरेतील आणखी एक ठळक नाव म्हणजे 'बहिणाबाई.' तिने 'संतकृपा झाली। इमारत फळा आली॥' या अभंगात वारकरी संप्रदायातील संतांनी या भक्ती-मंदिराच्या उभारणीसाठी जी कामगिरी केली, तिचं सुंदर वर्णन केलं आहे. ही संत तुकाराम महाराजांची शिष्या होती. तिचं कुटुंब मूळचं मराठवाड्यातलं. पण नंतर ते कोल्हापूरला स्थिरावले. बहिणाबाईंना लहानपणापासून भक्तिमार्गाची ओढ होती. कीर्तन-प्रवचनाची आवड होती. त्यामुळे कुटुंबीयांकडून, विशेषतः पतीकडून खूप मानहानी सोसावी लागली. जयराम स्वामींच्याकडून तुकाराम महाराज, त्यांचं कार्य, अभंगवाणी यांचा परिचय झाला. त्यामुळे तुकारामांच्या भेटीबद्दल ओढ निर्माण झाली.

तुकाराम महाराजांना भेटल्यानंतर साक्षात्कार झाला. त्यांना गुरू मानून त्यांच्या सहवासात बहिणाबाई उद्धरून गेल्या. काव्यरचना, अभंग करू लागल्या. भक्तीच्या बळावर त्यांचा नावलौकिक झाला. वरील अभंग हा वारकरी संप्रदायातील फार महत्त्वाचा अभंग आहे. यामध्ये मंदिराच्या रूपकाचा वापर करून प्रत्येक संतांचे कार्य अत्यंत मार्मिकपणे सांगितले आहे. या अभंगाला 'संतांचा अभंग' असे म्हणतात. या आणि यांसारख्या अनेक 'माऊली' विठ्ठल भक्तीत रंगून गेल्या. आजही वारीसाठी, विठू माऊलीच्या भेटीसाठी आजच्या माऊली आतुर आहेत. संसाराचा व्यापताप काही काळाकरता बाजूला सारत,

'जाईन गे माये तया पंढरपुरा। भेटेन माहेरा आपुलिया॥'
असं म्हणत पंढरीची वाट चालू लागल्या आहेत…

  • शर्मिष्ठा ताशी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT