भिवंडी; पुढारी वृत्तसेवा : शासन शिक्षणबाह्य मुलांना शालेय वातावरणात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवित असतानाही अनेक स्थलांतरीत मजुरांची मुले शाळेपासून दूर असल्याने महिला व बाल कल्याण विभाग व स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यातून रस्त्यावरील बालकांसाठी फिरते पथक शाळा सुरू करण्यात आली आहे.
भिवंडीत शहरातील कामतघर अंजुरफाटा रस्त्यावरील झोपडपट्टीत श्री साई सेवा संस्था अध्यक्षा डॉ. स्वाती सिंह यांच्या सहकार्यातून सुरू करण्यात आलेल्या शाळेचा शुभारंभ नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा महिला विकास व संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, समाजसेवक विराज पवार, श्री साई सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. स्वाती सिंह, बिहार झारखंड सेवा समिती मुंब्राचे एम आय खान, गायत्री परिवारचे उपेंद्र जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्थलांतरीत मजुरांच्या वस्तीतील मुलांचे भविष्य घडवायचे असेल तर त्यांना सर्वप्रथम समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षण गरजेचे असून शासन योजना बनवीत असली तरी त्यासाठी सेवाभावी संस्थांनी समाजाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी केले. रस्त्यावरील शाळा बाह्य मुलांची जिल्ह्यात शासना तर्फे शोधमोहीम घेतली. त्यांमध्ये जिल्ह्यात १९७६ तर भिवंडी शहरात सुमारे ४५० मुले आढळून आल्याने महिला व बालविकास विभागाने ही संकल्पना जिल्ह्यात राबविली आहे.
मुंब्रा, ठाणे व भिवंडी शहरात बसमध्ये बनविण्यात आलेल्या फिरते पथक या वर्गखोलीत शिक्षण दिले जाणार आहे. भिवंडीत गुरुवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी सकाळी १० ते ५ या वेळेत झोपडपट्टीत येऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे.
– रामकृष्ण रेड्डी, जिल्हा महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी